Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 October 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ ऑक्टोबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
देशात
१०० कोटी कोविड प्रतिबंधक लस देण्याचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होत आहे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यामध्ये
योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा
धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर
घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी
मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या.
मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार
स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६
१२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** मध्य गोदावरी उपखोऱ्यातलं १९ पूर्णांक
२९ अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी वापराला मान्यता देण्याचा राज्य शासनाचा निर्णय
** अल्पसंख्याक विकास विभाग विद्यार्थ्यांना
आहाराकरता रोख रक्कम देणार
** राज्यात नऊ कोटी सात लाखाहून अधिक लसमात्रांचं
वितरण
आणि
** अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर मदत
तुटपुंजी- पंकजा मुंडे यांची टीका
****
मध्य गोदावरी उपखोऱ्यातलं १९ पूर्णांक २९
अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी वापराला मान्यता देण्याचा निर्णय राज्य शासनानं आज घेतला.
जलसंपदा विभागानं पूर्वीच्या मंजूर पाणी वापरातल्या त्रुटी आता दूर केल्या असून मध्य
मराठवाड्यासाठी ही दसऱ्याची भेट असल्याचं जलसंपदा आणि लाभविकास क्षेत्र मंत्री जयंत
पाटील यांनी या निमित्त नमुद केलं आहे. बीड, हिंगोली, नांदेड या भागातल्या पाण्याचे
प्रश्न तसंच प्रकल्पांतले अडथळे आता दूर होतील आणि या भागातल्या सिंचन क्षमतेत वाढ
होण्यास मदत मिळेल असं पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले..
गोदावरी
खोऱ्यात जे १९७५ आधी पाणी वापर आपण केलेला होता. त्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या
होत्या. त्या त्रुटी दुरुस्त करुन आणि आता १९ पूर्णांक २९ टीएमसी हा अतिरिक्त पाणी
वापर आपल्याला आता मंजूर झालेला आहे. त्याचा अर्थ १२१ पूर्णांक २९ टीएमसी पाणी वापर
आता गोदावरी खोऱ्यात, मराठवाड्यात आता आपल्याला करता येणार आहे. जे प्रकल्प पाण्यावाचून
थांबलेले होते. आता हे प्रकल्प आता आपल्याला करता येतील.
****
अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात
सुरु करण्यात आलेल्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक
विद्यार्थ्यांना त्यांच्या आहाराकरता आता रोख रक्कम देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक
विकास मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक
खात्यात जमा करण्यात येणार आहे. अ, ब आणि क वर्ग महापालिका तसंच विभागीय शहरातल्या
वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम ३ हजार ५०० रुपये तर जिल्हा आणि तालुकास्तरावरच्या
वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम ३ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असून चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२२
पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं मलिक यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या
आज २७३व्या दिवशी देशभरात दुपारी एक वाजेपर्यंत ४ लाख ५९ हजाराहून अधिक लसमात्रा दिल्या
गेल्या आहेत. आत्तापर्यंत देशभरात ९७ कोटी ११ लाखाहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या
आहेत. महाराष्ट्रातही दुपारी एक वाजेपर्यंत १२ हजार ३३२ लस मात्रा दिल्या गेल्या आहेत.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण ९ कोटी ७ लाखाहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत.
****
अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना
सरकारनं घोषित केलेली मदत ही तुटपुंजी असून भरिव मदत द्यायला आपण सरकारला भाग पाडू
आणि त्याकरता वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीस
पंकजा मुंडे यांनी दिला आहे. त्या आज बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यात सावरगावघाट
इथं आयोजित भक्तीशक्ती दसरा मेळाव्यात बोलत होत्या. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून
शेतकऱ्यांना खूप अपेक्षा असुन त्यांनी त्या पूर्ण कराव्यात असं आवाहन त्यांनी यावेळी
केलं. बीड जिल्ह्य़ातली जनता सध्या कठिण परिस्थितीतून जात असल्याचं त्या म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देत असलेल्या दोन हजार रूपयांच्या व्यतिरिक्त एक पैसाही शेतकऱ्यांना
मिळत नसल्याचा आरोप मुंडे यांनी यावेळी केला.
****
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात विजया दशमी आणि
धम्मचक्र प्रवर्तन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी
दुर्गा महोत्सव मंडळात महापुजा आणि होमहवन करण्यात आलं. औरंगाबादमध्ये कर्णपुरा इथं
देवी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
मंदिर व्यवस्थापनानं कोरोना विषाणू संसर्गामुळे बालाजी रथाची मिरवणूक रद्द केल्याचं
कळवलं आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त औरंगाबाद बुद्ध लेणी इथं आणि चौका इथल्या
लोकुत्तरा महाविहारात सकाळपासून विविध कार्यक्रम घेण्यात आले. परित्राण पाठ आणि धम्मदेसना
यावेळी घेण्यात आली. बौद्ध उपासकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती.
****
विजयादशमी निमित्त परभणी इथं छत्रपती शिवाजी
महाराज चौकातून काढण्यात आलेल्या `श्री दुर्गामाता दौड`मध्ये शेकडो युवक, युवती सहभागी
झाले. परभणीच्या ग्रामीण भागात वैयक्तिक, परिसर आणि हाताची स्वच्छता अबाधित रहावी असा
स्वच्छतेचा संदेश देत ठिकठिकाणी `जागतिक हात धुवा दिन`ही आज उत्साहात साजरा करण्यात
आला.
****
जायकवाडी धरणाच्या सांडव्यावरुन सोडण्यात
येणारं पाणी आता कमी करण्यात आलं आहे. सध्या सोडण्यात येणाऱ्या १४६७२ घनफूट प्रती सेकंद
पाण्यापैकी ५२४० घनफूट प्रती सेकंद पाणी कमी करून ९४३२ घनफूट प्रती सेकंद पाणी सोडलं
जाणार आहे. यापुढच्या कालावधीत आवक बघून पाणी सोडनं कमी किंवा अधिक करण्याचा निर्णय
घेण्यात येणार आहे. यामुळं नदीकाठच्या नागरिकांनी अधिक सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य
करावं असं आवाहन जायकवाडी धरण प्रशासनानं केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा
एक नवा रुग्ण आज आढळला तर एका रुग्णाला उपचार घेऊन बरे झाल्यानंतर सुटी देण्यात आली.
जिल्ह्यातली या संसर्गाच्या रुग्णांची संख्या आता आता ९० हजार ३५२ झाली आहे तर ८७ हजार
६७९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत २६५२ रूग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला असुन
उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या २१ आहे.
//********//
No comments:
Post a Comment