Thursday, 7 October 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 October 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 October 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** लखीमपुर प्रकरणी उद्यापर्यंत अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर प्रदेश सरकारला निर्देश

** कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी उद्यापासून कवच कुंडल अभियान- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

** सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन

आणि

** हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा इथल्या प्राणवायू प्रकल्पांचं लोकार्पण

****

उत्तर प्रदेश सरकारला लखीमपुर खिरी घटने प्रकरणी उद्या पर्यंत वस्तूस्थिती अहवाल सादर करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे.सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील पीठानं लखीमपुर खिरीमधल्या शेतकऱ्यांच्या हत्ये प्रकरणी कारवाईची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना हे निर्देश दिले. राज्य सरकारनं या प्रकरणी आतापर्यंत केलेल्या कारवाईवर अहवाल द्यावा असं यात म्हटलं आहे. गेल्या रविवारी लखीमपुर खिरी इथं केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या दौऱ्याविरुद्ध निदर्शनांदरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला होता.

****

राज्यातल्या कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी उद्यापासून सात दिवस `कवच कुंडल अभियान` राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं या संदर्भातल्या बैठकीत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले...

आपल्या राज्याला एकूण नऊ कोटी १५ लाख एव्हढं आपल्याला 1st डोस आणि 2nd  डोस दोन्ही करायचे आहेत. तर यापैकी सहा कोटी लस पहिली डोस झालेली आहे. याचा अर्थ 1st डोस मध्ये आपल्याला आणखीन तीन कोटी वीस लाख एव्हढे लसीकरणाचं उद्दीष्ट आहे. 2nd  डोस किती झालेले आहेत तर अडीच कोटी झालेले आहेत. आता आपल्याला 1st डोसला अधिक प्राधान्य देवून तिसऱ्या वेव्हच्या अनुषंगानं खुप मोठ्या पद्धतीनं जी आम्हाला सगळ्यांना जी भिती वाटत होती ती निश्चित प्रकारे कमी होण्यास मदत होईल.

****

राज्यातल्या शेतकरी, वंचित, सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असं आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अठ्ठावीस हजार कोटी रूपयांचा पंधरावा वित्त आयोग असून यामध्ये ऐंशी टक्के ग्रामपंचायत, दहा टक्के जिल्हा परिषद आणि दहा टक्के पंचायत समिती असा निधी देण्याचा निर्णय शासनानं घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. महाआवास योजनेच्या माध्यमातून सहा लाख घरं ग्रामविकास विभागानं बांधली असून राहिलेली दोन लाख बासष्ट हजार घरंही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

****

वेतनासाठी कामगारांची पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देश कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कामगार विभागाला दिले आहेत. त्यांनी आज अमरावती इथं कामगारांच्या कामकाजाचा आढावा घेतला, त्या वेळी ते बोलत होते. बाह्य यंत्रणेद्वारे काम करणाऱ्या कामगारांच्या वेतन विषयक समस्या सोडवण्यासाठी कंपनीनं सकारात्मक असावं तसंच त्यांना येणाऱ्या समस्या प्राथमिकतेनं सोडवण्याला प्राधान्य द्यावं, असे निर्देशही कडू यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात पंतप्रधान सहाय्यता निधीतून प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं `ऑनलाईन` लोकार्पण करण्यात आलं. कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते या प्रकल्पाचं फित कापून उद्घाटन करण्यात आलं. या प्राणवायू निर्मिती प्रकल्पात प्रति सेकंद शंभर लिटर प्राणवायूची निर्मिती क्षमता असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा उपजिल्हा रुग्णालयातही पंतप्रधान सहाय्यता निधीतून प्राणवायू प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचं लोकार्पणही आज करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते या प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं.

****

शारदीय नवरात्रोत्सवाला आज घटस्थापनेपासून प्रारंभ होत आहे. त्यासोबतच कोविड पार्श्वभूमीवर बंद असलेली राज्यातली धार्मिक स्थळं आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुली झाली आहेत. जालना जिल्ह्यातही सर्व धार्मिक स्थळे आजपासून नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. नागरिकांनी मंदिर तसंच अन्य धार्मिक स्थळी जाताना कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगानं लागू नियमांचं पालन करावं. त्याचबरोबर यात्रा, उत्सवाला परवानगी नसल्यानं नागरिकांनी धार्मिक स्थळी गर्दी करू नये, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केलं आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथलं प्रसिद्ध आठवं ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी आज सकाळी सहा वाजल्यापासून खुलं करण्यात आलं आहे.

****

औरंगाबादमध्ये आज संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागानं मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

****

वन्यजीव सप्ताहा अंतर्गत आज औरंगाबाद शहरातल्या सिद्धार्थ उद्यानातल्या प्राणीसंग्रहालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आलं. या शिबीरात ७६ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे. एक ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या या वन्यजीव सप्ताहाचा आज समारोप झाला.

//********//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...