Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 October 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०९ ऑक्टोबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव
आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका.
कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे
दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा,
हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात
जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड
-१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय
मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू
शकता.
****
** पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा
देणार; चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
** पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या
मदतीसाठी पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावं - माजी खासदार
राजू शेट्टी यांची टीका
** कोविड नियंत्रणासाठी लसीकरणाबाबत
प्रभावी जनजागृती करावी - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन
आणि
** नवरात्र महोत्सवाच्या आजच्या
तिसऱ्या माळेला तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा
****
राज्याच्या विकासकामात सरकार
पक्षभेद करत नाही, यापुढील काळात पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील
चिपी विमानतळाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याहस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे
झेंडा दाखवून लोकार्पण
झालं,
त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. विमानतळावरच्या कोनशिलेच अनावरण मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते झालं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री शिंदे यांनी
यावेळी मराठीतून संवाद साधत, सिंधुदुर्ग विमानतळच्या सुरुवातीने कोकणच्या विकासाचा
एक नवा अध्याय लिहिला जात असल्याचं सांगितलं. गेल्या तीन दशकांचं हे स्वप्न आज साकार
होतंय, पुढच्या पाच वर्षात २० ते २५ नवीन उड्डाण सुरु होतील असा विश्वास शिंदे यांनी
यावेळी व्यक्त केला.
****
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी
पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावं, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी
खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात वाघोली इथं आयोजित ऊस परिषदेला
जाण्यापूर्वी शेट्टी यांनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते माध्यमांशी
बोलत होते. जनतेचा प्रश्न निर्माण झाला की, केंद्र आणि राज्य सरकार खोटं खोटं भांडण
करून जनतेची दिशाभूल करतात, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला. राजकीय सूड घेण्यासाठी
सरकारी संस्थांचा वापर केला जातो, असंही शेट्टी यांनी नमूद केलं.
****
कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी
सर्वसामान्य नागरिक, दिव्यांग तसेच असंघटित कामगारांमध्ये लसीकरणाबाबत प्रभावी जनजागृती
करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. अमेरिकन इंडियन फाउंडेशनच्यावतीनं
जालना जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या 'मिशन कोरोना विजय' या उपक्रमाचा शुभारंभ आज जालन
जिल्हाधिकारी कार्यालयात टोपे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अमेरिकन
इंडियन फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं राज्यात जालना, औरंगाबाद, पुणे आणि नंदुरबार
या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी 'मिशन कोरोना विजय' हा उपक्रम सुरू
केला आहे. येत्या दसरा महोत्सवापर्यंत संपूर्ण देशभरात शंभर कोटी नागरिकांचं लसीकरण
करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यही या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये मागे
राहू नये यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात मिशन कवच कुंडल ही मोहीम राबवण्यात येत
आहे. या मोहिमेत दिवशी पंधरा ते वीस लक्ष नागरिकांचे लसीकरण होईल, असे नियोजन आरोग्य
विभागामार्फत करण्यात आल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं.
****
मिशन कवचकुंडल या मोहिमेअंतर्गत
उस्मानाबाद जिल्ह्यात लसीकरणाने वेग घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
६ लाख ८० हजार नागरिकांना कोविड लसीची पहिली मात्रा देण्यात आली असून दोन लाख ७२ हजार
नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. उर्वरित सहा लाख तीस हजार नागरिकांना
पहिली मात्रा देण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात तुळजापूर
इथल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरात तसंच येरमाळा इथल्या येडेश्वरी मंदिराच्या
परिसरात विशेष विशेष लसीकरण सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, कवच कुंडल अभियानाअंतर्गत
अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज
बी.पी. यांनी केलं आहे. जिल्ह्यात काल लसीकरणाची २४४ सत्रं घेण्यात आली, यामध्ये १०
हजार २३५ लाभार्थ्यांना लसीची मात्रा देण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यात आलं आहे.
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत
७० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यामध्ये ग्रामीण ६७ टक्के आणि शहरात
८३ टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती लसीकरण समन्वयक डॉ. अनिरूध्द पिंपळे
यांनी दिली.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू
बाधित दोन रुग्ण आढळून आले तर दोन रुग्णांना आज बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात
आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ९० हजार ३३६ रूग्ण आढळून आले असून त्यापैकी ८७ हजार ६७० रुग्ण
कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले आहेत. तर आजपर्यंत २ हजार ६५२ रुग्ण या आजारामुळे
मरण पावले आहेत.
****
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या
आजच्या तिसऱ्या माळेला, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी
देवीची रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. भगवान सूर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी
आपला रथ तुळजाभवानी मातेस दिला, अशी आखायिका सांगण्यात येते. त्यामुळे आजच्या दिवशी रथ अलंकार महापूजा पूजा बांधण्यात
येते.
****
नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या
पुष्पक जलदगती रेल्वेगाडीत शिरुन दरोडेखोरांनी प्रवाशांना लुटण्याची घटना काल रात्री
घडली. लखनऊ मुंबई पुष्पक गाडी नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी स्थानकातून सुटल्यानंतर
७ ते ८ दरोडेखोरांनी गाडीत घुसून लूटमार केली. एका महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
केला. कसारा रेल्वे स्थानक येताच या दरोडेखोरांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
यापैकी सहा दरोडेखोर पसार झाले, मात्र दोन दरोडेखोरांना प्रवाशांनी पकडून ठेवलं. या
दोघांना कल्याण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.
****
परभणी तालुक्यातील पेडगाव
महसूल मंडळात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची २९ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे
भरपाई द्यावी या मागणीसाठी परभणी तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज परभणी -
मानवत राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
//********//
No comments:
Post a Comment