Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
कोविड पार्श्वभूमीवर
बंद असलेल्या शाळा जवळपास दीड वर्षानंतर आजपासून सुरू झाल्या. ग्रामीण भागात इयत्ता
चौथी ते बारावी, तर शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग, प्रत्यक्ष सुरु झाले.
जालना जिल्ह्यातल्या
दोन हजार ४०० शाळा कोविड नियमांचे पालन करत आजपासून सुरु झाल्या. पहिल्याच दिवशी शाळांमध्ये
येताना विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला. अनेक शाळांममध्ये विद्यार्थ्यांचं गुलाब
पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं.
नाशिक शहरातील
४८९ शाळा, तसंच ६६ कनिष्ठ महाविद्यालयं सुरू झाले आहेत. बहुतांशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं
स्वागत करण्यात आलं, तसंच आरोग्य तपासणी करण्यात आली. शाळा सुरू करतांना राज्य शासनाने
मास्क, सॅनिटायझर तसंच स्वतःची पाण्याची बाटली वापरणं, अशा अनेक सूचना केल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून शाळेमध्ये स्वच्छता करण्यात आली तसंच निर्जंतुकीकरण करण्यात
आले आहे.
धुळे शहरातल्या
१३२ आणि ग्रामीण भागातल्या ६६५ शाळा सुरु झाल्या. धुळे जिल्ह्यातल्या शंभर टक्के शिक्षकांचं
लसीकरण पूर्ण झालं आहे.
रत्नागिरी
जिल्ह्यातल्या दोन हजार ९० शाळा सुरू झाल्या. कोविड प्रतिबंधाच्या आवश्यक त्या सर्व
सूचनांची अंमलबजावणी प्रत्येक शाळेत केली जात आहे. शाळेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक
विद्यार्थ्याचं तापमान तपासलं जात असून, सॅनिटायझर लावल्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश
दिला जात आहे.
मुंबई, नवी
मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्गसह जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमधल्या शाळा आजपासून सुरु
झाल्या.
दरम्यान,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातल्या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधत आहेत.
****
देशव्यापी
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ९० कोटींचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात २३
लाख ४६ हजारांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या ९० कोटी
७९ लाख ३२ हजार ८६१ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या २० हजार ७९९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १८० रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ३८ लाख ३४
हजार ७०२ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ४८ हजार ९९७ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. काल २६ हजार ७१८ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३१ लाख २१ हजार
२४७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ६४ हजार ४५८ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
राज्यातल्या
काही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या
१४ गटासाठी ६८, आणि २४ पंचायत समिती गणांसाठी ११९ उमेदवार निवडणुलीच्या रिंगणात आहेत.
नंदुरबार
जिल्ह्या परिषदेच्या ११ गट आणि तीन पंचायत समितीच्या १४ गणांसाठी उद्या मतदान होणार
आहे. या निवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला.
****
काळी बुरशी
अर्थात म्युकरमायकोसिस या आजाराचे राज्यात आजवर दहा हजारापेक्षा जास्त रुग्ण असून,
सर्वाधिक रुग्ण नागपूर आणि पुणे जिल्ह्यात आहेत. या आजारामुळे आतापर्यंत एक हजार ३५०
रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक हजार ३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या डोंगरकडा इथं नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या
विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलन करण्यात
आलं. ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट पिक विमा देण्यात यावा, सोयाबीनचे दर पाडणाऱ्यांवर
कारवाई व्हावी, केळी पिकासंदर्भात टेंपरेचर वरील त्रुटी दाखवून पिक विमा नाकारणाऱ्यांवर
कारवाई करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा द्यावा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन
करण्यात आलं. यामुळे या रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली आहे.
****
स्वातंत्र्याच्या
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने महात्मा गांधी जयंतीदिनी नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना
मोफत डिजिटल साक्षर सातबारा उताऱ्याच्या वितरणाला सुरुवात झाली. जिल्ह्यात आतापर्यंत
६६७ गावांमध्ये, २८ हजार ५६७ शेतकऱ्यांना अशा प्रकारचा सातबारा वितरित करण्यात आला
आहे. नऊ ऑक्टोबरपर्यंत मोफत सातबारा वाटप सुरू राहणार आहे.
****
नाशिक जिल्ह्यात
ई पीक पाहणीला प्रतिसाद वाढत असून, आतापर्यंत ४० टक्के शेतकऱ्यांनी पीक पाहणी करून
घेतली आहे. शेतकऱ्यांचा आणखी प्रतिसाद वाढवा यासाठी कृषी विभागाच्या वतीनं नोंदणी करण्याचं
आवाहन करण्यात आलं आहे.
****
भारत आणि
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांत झालेला पहिला दिवस-रात्र क्रिकेट कसोटी सामना काल अनिर्णित
राहिला. भारतानं आपला पहिला डाव ८ बाद ३७७ धावांवर घोषित केल्यानंतर, ऑस्ट्रेलियाचा
पहिला डाव गडगडला आणि त्यांनी ९ बाद २४१ वर डाव घोषित केला. त्यानंतर भारतानं ३ बाद
१३५ धावा करून डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २७२ धावांचं आव्हान दिलं.
खेळ संपतेवेळी ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात २ बाद ३६ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात
शतक झळकवणाऱ्या स्मृती मानधनाला सामन्यातल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
****
No comments:
Post a Comment