Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता
नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप
कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित
अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ
धुवा. तरीही कोविड-19ची लक्षणं आढळली तर लगेच
विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे
इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
कोविड
पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून
बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू
·
पश्चिम बंगाल विधान सभेच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
विजयी
·
देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता
पक्षाची शिवसेनेचे माजी
आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी
·
अतिवृष्टीग्रस्त
शेतकऱ्यांना राज्य मंत्रिमंडळाची बैठक
घेऊन मदतीचं पॅकेज घोषित करण्याची
भाजपची मागणी
·
राज्यात दोन हजार ६९२
नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात
दोन जणांचा मृत्यू तर
७९ बाधित
·
कोविड
रुग्ण संख्या
वाढत असल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये आजपासून टाळेबंदी
आणि
·
अंमली पदार्थ सेवन प्रकरणी अभिनेता शाहरुख
खानचा मुलगा आर्यन खानसह तिघांना एक दिवसाची
कोठडी
****
कोविड पार्श्वभूमीवर बंद
असलेल्या शाळा जवळपास दीड वर्षानंतर आजपासून सुरू होत आहेत. ग्रामीण
भागात इयत्ता चौथी ते बारावी, तर शहरी भागात इयत्ता आठवी ते
बारावीचे वर्ग, प्रत्यक्ष सुरु होत आहेत. शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांनी
या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करून,विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी,
तसंच पालक आणि विद्यार्थ्यांनीही आवश्यक ती दक्षता घ्यावी, असं आवाहन राज्याचे वैद्यकीय
शिक्षण मंत्री अमित
देशमुख यांनी केलं आहे.
दरम्यान,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी साडे बारा वाजता विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
आहेत. यावेळी ‘माझे विद्यार्थी, माझे जबाबदारी’ या बोधचिन्हाचं अनावरणही त्यांच्या
हस्ते होणार आहे. या संवादात विद्यार्थ्यांबरोबरच पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी
उपस्थित राहणार आहेत.
****
औरंगाबाद
शहरात महानगरपालिकेच्या तसंच खासगी संस्थांच्या एकूण ४१३ शाळांमधून, आठवी ते बारावीचे
वर्ग आजपासून सुरू होत आहेत.
मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार तसंच उपायुक्त डॉक्टर संतोष टेंगले
यांच्या मार्गदर्शनात, शाळा सुरू करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने
१०० टक्के शिक्षकांचं लसीकरण आवश्यक आहे. तसेच शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्व नियमांचं
काटेकोर पालन करण्याच्या सूचना सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आल्या असल्याचं, मनपा
शिक्षण अधिकारी रामनाथ थोरे आणि सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी सांगितलं.
ज्या
वर्गांच्या शाळ सुरु होणार नाही, त्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवावं, तसंच शिक्षकांनी
विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन भेटी द्याव्यात, त्यांना मर्गदर्शन करावं, असे आदेश नांदेडच्या
शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सर्व शाळांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमाचं पालन करावं,
अस आवाहन, त्यांनी केलं आहे.
****
आगामी
दहा वर्षात इंधन म्हणून पेट्रोलचा वापर अवघा दहा टक्के करण्याच्या, आणि पर्यायी इंधन
उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याची माहिती, केंद्रीय परिवहन आणि
रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नाशिक इथं महापालिकेच्यावतीनं
पंचवटीत साकारण्यात आलेल्या थीम पार्कचं उद्घाटन काल गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी
ते बोलत होते. इंधनात इथेनॉल- मिथेनॉल आणि अन्य साधनांचा अधिकाधिक वापर करून पेट्रोलचा
वापर कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, आगामी दहा वर्षांत त्याला बऱ्यापैकी यश आलेलं
दिसेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
****
पश्चिम
बंगाल विधान सभेच्या पोटनिवडणुकीत भवानीपूर मतदार संघातून, तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८
हजार ८३५ मतांनी पराभव केला. पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींचा
हा विजय आवश्यक होता. गेल्या मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत नंदीग्राम मतदार संघातून
भाजपचे सुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव केला होता. अन्य दोन समशेरजंग आणि जांगीपूर मतदारसंघातही तृणमूल
काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या अनुसूचित जातीसाठी राखीव देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी
भारतीय जनता पक्षानं, माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. साबणे
हे यापूर्वी शिवसेनेकडून तीनवेळा निवडून आले होते. २०१९ मध्ये ते या मतदारसंघातून काँग्रेसचे
उमेदवार रावसाहेब अंतापूरकर यांच्याकडून पराभूत झाले होते. अंतापूरकर यांच्या निधनानं
ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी येत्या तीस तारखेला मतदान होणार आहे.
****
शेतकऱ्यांना
हेक्टरी ५० हजाराची तातडीनं मदत राज्य शासनानं द्यावी, अन्यथा भारतीय जनता पक्षाच्यावतीनं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा, केंद्रीय रेल्वे
राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला आहे. दानवे यांनी काल परभणी जिल्ह्यात पालम,
तसंच गंगाखेड तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते. परभणी
तालुक्यात दैठणा, गंगाखेड तालुक्यात सायाळा, तसंच पालम शहराजवळच्या लेंडी नदीच्या परिसरातही
त्यांनी पाहणी केली.
****
विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर
यांनी काल संध्याकाळी लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात
वांजरवाडा इथं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.
त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी, यासंदर्भात
राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन
शेतकऱ्यांना मदतीचं पॅकेज घोषित करावं आणि दसऱ्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात
पैसे जमा करावेत अशी मागणी केली. आमच्या काळात आम्ही विमा कंपन्यांच्या माध्यमातून
भरीव मदत केली होती, परंतु हे सरकार विमा कंपन्यांना वठणीवर आणू
शकत नाही, असं सांगून फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करायचा इशाराही यावेळी दिला.
दरम्यान, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.यांनी काल जिल्ह्यातल्या मौजे हरंगूळ बुद्रुक
इथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची पाहणी केली.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्रांचं सरसकट सर्वेक्षण
होऊन नुकसानभरपाई मिळणार असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली. उस्मानाबाद
आणि कळंब तालुक्यासह जिल्ह्यात मागच्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे बत्तीस
मंडळात शेतीपिकांचं तसंच घरांचं अतोनात नुकसान झालं आहे. विमा कंपनीच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे वैयक्तिक पातळीवर पंचनामे
होणं शक्य होत नसल्यानं, रॅण्डम सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी
आदेश काढल्याची माहिती, त्यांनी दिली. हा निर्णय सर्वच पिकांसाठी लागू राहणार असून,
या सर्वेक्षणासाठी विमा कंपनी प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास महसूल आणि कृषी विभागानं
केलेलं सर्वेक्षण ग्राह्य धरणं कंपनीला बंधनकारक असेल, असंही आमदार पाटील यांनी सांगितलं.
****
राज्यात काल दोन हजार ६९२ नवे कोरोना
विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ५९ हजार, ३४९ झाली आहे. काल ४१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार २०७ झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल दोन हजार ७१६ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६३ लाख ८० हजार ६७० रुग्ण,
कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा
दर ९७ पूर्णांक २८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३५ हजार, ८८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ७९ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत दोघे जण औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत.
बीड जिल्ह्यात काल २२
नवे रुग्ण आढळले, उस्मानाबाद जिल्ह्यात २०, औरंगाबाद १९, परभणी आठ, लातूर सात, जालना दोन, तर नांदेड जिल्ह्यात
एक रुग्ण आढळला. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड
संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.
****
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
वाढती संख्या लक्षात घेत २०
पेक्षा जास्त सक्रीय रुग्ण असलेल्या ६१ गावांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आजपासून टाळेबंदी घोषित केली आहे. दररोज ५०० हून अधिक नव्या बाधितांची नोंद होतं असल्यामुळे जिल्ह्याचा बाधित दर पाच टक्क्यांपेक्षा जास्त झाला असल्यानं हा निर्णय
घेण्यात आला आहे. टाळेबंदी घोषित केलेल्या गावातली किराणा दुकाने सकाळी ८ ते ११ या वेळेत सुरू राहतील. शाळा आणि
धार्मिक प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंद असतील.
****
कोविड
महामारीच्या संकटात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून, प्रत्येकी पाच लाख
रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानुसार अशा बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये
जमा केले असल्याची माहिती, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी
दिली. कोरोनामुळे राज्यभरात सुमारे सहाशे बालकं अनाथ झाली असून, त्यापैकी
तीनशे सहा बालकांच्या खात्यात, सुमारे पंधरा कोटी तीस लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित बालकांच्या खात्यातही लवकरच
ही रक्कम जमा होणार असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं.
****
जालना
जिल्ह्यात कोवीड लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मिशन
कवच कुंडल मोहीम राबवण्यात येत असून, ग्रामीण भागात या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत
आहे. आजपर्यंत जिल्ह्यातल्या ५२ टक्के नागरिकांनी कोवीड लस टोचून घेतली आहे. लसीची
पहिली मात्रा घेणाऱ्या नागरिकांची संख्या आठ लाख ८९ हजार ७८५, तर दुसरी मात्रा घेणाऱ्यांची
संख्या, तीन लाख ३६ हजार ८७१ इतकी आहे. प्रत्येक नागरिकानं कोविड लस टोचून घ्यावी,
असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केलं आहे.
****
अंमली
पदार्थ सेवन प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह तिघां जणांना न्यायालयानं, एका दिवसाची एनएसीबी कोठडी सुनावली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजावर रेव्ह पार्टीत सहभागी होऊन अंमली
पदार्थांचा वापर केल्याबद्दल अंमली पदार्थ नियंत्रण मंडळ - एनएसीबीनं शनिवारी या सर्वांना अटक करून काल न्यायालयासमोर
हजर केलं. याच
प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच जणांना आज न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. या जहाजावर टाकलेल्या छाप्यात एनसीबीने प्रतिबंधित
अंमली पदार्थही ताब्यात घेतले आहेत.
****
राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, पंजाबमधल्या फलोत्पादन, शेती
आणि फळप्रक्रीया उद्योगांचा अभ्यास करण्यासाठी, कालपासून
पंजाब दौऱ्यावर गेले आहेत. राज्यातल्या फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना नव्या तंत्राची माहिती व्हावी, यासाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आलं आहे.
मराठवाड्यासह राज्यातलं
फलोत्पादन विकसित करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर या दौऱ्यात विशेष लक्ष
केंद्रीत करण्यात येणार आहे.
****
विविध मागण्यांसाठी राज्यातल्या निवासी डॉक्टरांचा सुरु असलेला संप आणखी
तीव्र करणार असल्याची माहिती, निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने दिली आहे.
सकारात्मक तोडगा न निघाल्यास राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या
अत्यावश्यक शस्त्रक्रिया, आणि गंभीर रुग्णांची रुग्णसेवा, आज
दुपारी साडे तीन वाजेपासून बंद करण्याचा
इशारा संघटनेनं दिला
आहे. औरंगाबाद इथल्या घाटी रुग्णालयातले मार्ड संघटनेचे अध्यक्ष
डॉ. अक्षय क्षीरसागर, डॉ. ऋषिकेश फडणीस यांनी ही
माहिती दिली. या संपात घाटी रुग्णालयातले ३०० निवासी डॉक्टर सहभागी झाले
आहेत.
****
आझादी
का अमृत महोत्सवानिमित्त परभणी इथं महानगरपालिका आणि केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राच्या
वतीनं, काल फिट इंडिया फ्रीडम दौड घेण्यात
आली. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या उपस्थितीत राजगोपालचारी उद्यानातून या दौडला प्रारंभ
झाला.
****
हवामान
-
येत्या ४८ तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल अशी, तर
मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment