Friday, 8 October 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 08.10.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 October 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०८ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. यानुसार, देशातला रेपो दर चार टक्क्यांवर, तर रिव्हर्स रेपो दर देखील तीन पूर्णांक ३५ टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. देशातला महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी, कोविड १९ चा अर्थव्यवस्थेवरील परिणाम नियंत्रित करण्यासाठी, आणि आर्थिक परिस्थिती पूर्ववत येईपर्यंत देशाचं पतधोरण सर्वसमावेशकच ठेवलं जाईल, असं दास यांनी सांगितलं. भारतीय अर्थव्यवस्था आता हळूहळू पूर्वपदावर येत असून, विकासदराच्या बाबतीत देखील सकारात्मक चिन्ह दिसत असल्याचं, त्यांनी नमूद केलं. सरकारने पुरवठा सुरळीत करण्यासंबंधी उचललेल्या पावलांमुळे भाज्यांच्या किंमतींतील अस्थिरता कमी होण्यास, तसंच खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्यास मदत झाली असल्याचं दास यांनी सांगितलं.

****

भारतीय हवाई दल कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी म्हटलं आहे. भारतीय हवाई दलाच्या ८९व्या वर्धापन दिनानिमित्त गाजियाबाद इथल्या हिंडन हवाई तळावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या आठ दशकात भारतीय वायुसेनेनं तंत्रज्ञानाच्या बाबतीत विकास केला असून, राष्ट्रासमोरच्या कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वत:ला सक्षम बनवलं असल्याचं, चौधरी यांनी म्हटलं आहे. लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे, नौदल प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंग यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही भारतीय हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत. हवाई दलानं युद्ध तसंच शांततेच्या काळातही देशासाठी अत्यंत सक्षम सेवा दिली असून, राष्ट्राला त्यांच्या कामगिरीचा अभिमान असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

****

देशातला कोरोना विषाणूचा संसर्ग आता नियंत्रणात येत असला, तरी आगामी सणासुदीच्या काळात कोरोना विषयक सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं केलं आहे. किमान डिसेंबरपर्यंत गर्दी टाळणं, अनावश्यक प्रवास न करणं, सण तसंच त्यासाठीची खरेदी घरी राहूनच ऑनलाईन पद्धतीनं करणं आवश्यक असल्याचं, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं आहे. देशात नऊ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोना संसर्गाचा दर अजूनही १० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

****

कोविड मुळे अनाथ झालेल्या मुलांची काळजी घेऊन त्यांचे योग्य संगोपन करण्यासाठी आखण्यात आलेल्या, लहान मुलांसाठीच्या पीएम केअर्स योजनेची मार्गदर्शक तत्व जाहीर झाली आहेत. या मुलाचं शिक्षण, आरोग्य याची काळजी घेण्याबरोबरच १८व्या वर्षांपासून छात्रवृत्ती देण्याची, आणि २३व्या वर्षी दहा लाख एकरकमी देण्याची तरतूद या योजनेत आहे. ११ मार्च २०२० ते या वर्षाअखेर पर्यंत, कोविड संसर्गामुळे ज्यांचे दोन्ही पालक किंवा कायदेशीर तसंच दत्तक पालक गमावलेल्या मुलांनाही, या योजनेचा लाभ मिळणार आहे.

****

दरम्यान, कोविडमुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या अनाथ झालेल्या बालकांना सरकारनं जाहीर केलेला पाच लाख रुपयांचा निधी त्वरित त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा, अशी मागणी, बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनाथ बालकं आणि त्यांच्यासोबत त्यांचे आजी आजोबा अशा सर्वांच्या शिष्टमंडळानं काल महिला आणि बाल विकास विभागाच्या विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.

****

औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आली असून, राज्य शासनाकडे तातडीनं भरपाई देण्याची मागणी केली असल्याचं, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे ५५९ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली.

****

जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी इथल्या एकाच कुटुंबातल्या सहा जणांना काल भगरीतून विषबाधा झाली. यामध्ये एका मुलीचा समावेश आहे. बाधा झालेल्यांपैकी पाच जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली असून, एकास अधिक उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले आहे.

****

औरंगाबाद महापालिकेचा वरिष्ठ लिपीक काझी सलामोद्दीन अरिफोद्दीन आणि सफाई मजुर सय्यद शहजाद सय्यद शहर अली यांना वीस हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहात अटक केली. नविन दुकानाला मालमत्ता कर लावण्यासाठी त्यांनी ही लाच घेतली होती.

****

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू सरिता मोर हिनं स्वीडनच्या सारा लिन्डबोर्ग हिचा पराभव करत, ५९ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली. तर याच स्पर्धेत ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय कुस्तीपटू अंशू मलिक उपविजेती ठरली आणि रौप्य पदकाची कमाई केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...