Friday, 8 October 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 08.10.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०८ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

भारतीय हवाई दलाचा ८९ वा वर्धापनदिन आज साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय हवाई दल साहस, मेहनत आणि व्यावसायिकतेचं प्रतिक आहे. देशाचं संरक्षण आणि संकटाच्या काळात नागरिकांना मदत करुन त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली असल्याचं, पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

भारतातून ब्रिटनला जाणाऱ्या आणि कोव्हीशिल्ड अथवा ब्रिटननं मंजूर केलेल्या कोणत्याही कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या व्यक्तींसाठी ब्रिटननं विलगीकरणाचा नियम रद्द केला आहे. १ १ ऑक्टोबरनंतर भारतातून जाणाऱ्या प्रवाशांना ब्रिटनमध्ये दहा दिवस विलगीकरणात राहण्याची आवश्यकता नाही.

****

चार्टर्ड विमानांच्या माध्यमातून देशात येणाऱ्या परदेशी पर्यटकांना नवे पर्यटन विसा देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. १५ ऑक्टोबरपासून त्याची सुरुवात होणार आहे. १५ नोव्हेंबरपासून हे पर्यटक भारतात येऊ शकतील. आरोग्य मंत्रालयानं परदेशी पर्यटकांना दिलेल्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं या पर्यटकांना आणि विमान कंपन्यांना बंधनकारक असेल. 

****

टांझानियाचे कादंबरीकार अब्दुल रझाक गुरनाह यांना यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. वसाहतवादाचे दुष्परिणाम आणि निर्वासितांच्या दु:खाचं धाडसी चित्रण केल्याबद्दल गुरनाह यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

****

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची काल पाहणी केली. बीड तालुक्यातील कुर्ला, औरंगपूर, भाटसांगवी या गावासह इतर दहा ते बारा गांवाना त्यांनी भेट दिली.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमधला पहिला टी-२० क्रिकेट सामना काल पावसामुळे रद्द झाला. ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाला प्रथम फलंदाजी दिल्यावर भारतीय महिलांनी १५ षटकं आणि दोन चेंडूत चार बाद १३१ धावा केल्या होत्या. पण पावसामुळे पुढचा खेळ होऊ शकला नाही. आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एकेक गुण देण्यात आला.

****

मराठवाड्यात काल ९३ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...