Saturday, 9 October 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.10.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 09 October 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      कोविड काळात बजावलेल्या रुग्णसेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये देण्याचा राज्यसरकारचा निर्णय 

·      औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अंदाजे ५६९ कोटी रुपयांचं नुकसान; बाधित शेतजमिनीचे सरसकट पंचनामे - पालकमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

·      डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून शेतकरी पाल्यांना शुल्कमाफी जाहीर

·      राज्यात काल दोन हजार ६२० नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात पाच जणांचा मृत्यू तर नव्या ७६ बाधितांची नोंद

आणि

·      पूर्णा तालुक्यात गौर इथलं श्री सोमेश्वर विद्यालय, कोविडग्रस्त विद्यार्थी आढळल्यानं आठ दिवस बंद राहणार

****

कोविड काळात बजावलेल्या रुग्णसेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. शासकीय तसंच महापालिकांच्या वैद्यकीय महाविद्यालय, आणि शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व निवासी डॉक्टरांना हा निर्णय लागू असेल, असं याबाबत काल जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात म्हटलं आहे. या निर्णयाबद्दल मार्ड संघटनेतर्फे डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

****

राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणांमध्ये मोबदल्याच्या रकमेची गणना करण्याची पद्धत निश्चित करण्यात आली आहे. नोंदणी महानिरीक्षकांकडून दरवर्षी जाहीर होणाऱ्या मार्गदर्शक सूचना  तसंच नमूद केलेल्या टप्पा पद्धतीच्या धर्तीवर जमिनीच्या निर्धारीत बाजार दर मूल्यांकनात २० टक्के कपात करण्यात येईल. याबाबत ५ ऑक्टोबर २०२१ रोजी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली. जे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत, त्यांना ही अधिसूचना लागू नसेल, मात्र यापूर्वीच्या काही प्रकल्पांसाठी भूसंपादनाची अधिसूचना यानंतर रद्द झाली, तर ते प्रकल्प नवीन प्रकल्प म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत.

****

रेल्वे तसंच विमान सेवांचं खाजगीकरण करुन त्या विक्रीस काढण्याचा केंद्रातील भाजपा सरकारचा डाव आहे. त्यांच्या धोरणाला विरोध केला म्हणून इन्कमटॅक्स आणि ईडी सारखे सरकारी पाहुणे आमच्या घरी पाठवले, असा आरोप खासदार शरद पवार यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे पडल्याच्या पार्श्वभूमीवर, ते काल सोलापूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

रेल्वे आणि विमान सेवा अशा महत्त्वाच्या आणि नफ्यात असलेल्या खात्यांचं खाजगीकरण करुन उद्योगपतींना जगवण्यासाठी ती विक्रीस काढण्याचा घाट या सरकारने घातला असल्याचा आरोप पवार यांनी केला.

****

औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा अंदाजे ५६९ कोटी रुपयांचा अहवाल तयार करण्यात आला असून, बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे सरसकट पंचनामे करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार असल्याचं, औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे. काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

औरंगाबाद नजिक सातारा गावातल्या पुरातन हेमाडपंथी खंडोबा मंदिराची देसाई यांनी काल पाहणी केली, मंदिराचं पावित्र्य राखून जीर्णोध्दार होणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली. कडेपठार ते खंडोबा मंदिर हा नऊ किलोमीटरचा रस्ता देखील करावा अशी सूचनाही देसाई यांनी यावेळी केली.

पालकमंत्री देसाई यांनी काल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची आढावा बैठक घेतली. विद्यापीठानं पैठण इथलं संतपीठ समाजाभिमूख करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, असं आवाहन देसाई यांनी केलं.

****

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या शैक्षणिक वर्षासाठी शेतकरी पाल्यांचं शैक्षणिक तसंच परीक्षा शुल्क माफ केलं आहे. विद्यापीठ अधिसभेत कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी काल ही घोषणा केली. सततच्या पावसाने शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान लक्षात घेता, शुल्कमाफीचा निर्णय घेत असल्याचं, कुलगुरूंनी सांगितलं.

****

इंटरनेटशिवाय डिजिटल व्यवहार करण्याची सुविधा रिझर्व्ह बँक लवकरच उपलब्ध करुन देणार आहे. यासंदर्भात देशाच्या विविध भागात चाचण्या घेण्यात आल्या, त्याअंतर्गत गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून यंदा जून महिन्यापर्यंत १ कोटी १६ लाख रुपयांचे सुमारे २ लाख ४१ हजार व्यवहार करण्यात आले. त्यामुळे देशाच्या दुर्गम भागात किंवा ज्या ठिकाणी इंटरनेट उपलब्ध नाही अथवा इंटरनेटचा वेग कमी आहे, तिथे डिजिटल व्यवहार करण्याची मुभा मिळणार आहे. या माध्यमातून व्यवहार करण्याची मर्यादा सध्या २ लाख रुपये आहे, ती वाढवून कमाल ५ लाख रुपये केली जाणार आहे. यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना बँक लवकरच उपलब्ध करुन देणार आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. यानुसार, देशातला रेपो दर चार टक्क्यांवर, तर रिव्हर्स रेपो दर देखील तीन पूर्णांक ३५ टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे.

****

राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे गेली आहे. केंद्रीय निर्गुंतवणूक सचिव तुहीन कांत पांडे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी या बातमीचं स्वागत करत, सरकारचे आभार मानले आहेत.

****

राज्यात काल दोन हजार ६२० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ७३ हजार, ९२ झाली आहे. काल ५९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ४७० झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल दोन हजार ९४३ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ९७ हजार १८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३३ हजार ११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ७६ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद तसंच बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी २ तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. 

बीड जिल्ह्यात काल ३८ नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद १२, लातूर १७, जालना ५, नांदेड तसंच परभणी जिल्ह्यात प्रत्येकी २ रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.

****

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातल्या गौर इथल्या श्री सोमेश्वर विद्यालयातील एक विद्यार्थ्यी कोरोनाविषाणू बाधित आढळल्यानं, ही शाळा आठ दिवस बंद राहणार आहे. या शाळेचा परिसरही आठ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.

****

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्यानं, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातल्या ६१ गावांमध्ये टाळेबंदी जाहीर केली आहे. येत्या १३ तारखेच्या रात्री १२ वाजेपर्यंत ही टाळेबंदी लागू असेल.

****

कोविडमुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या अनाथ झालेल्या बालकांना सरकारनं जाहीर केलेला पाच लाख रुपयांचा निधी त्वरित त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा, अशी मागणी, बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनाथ बालकं आणि  त्यांचे आजी आजोबा अशा सर्वांच्या शिष्टमंडळानं काल महिला आणि बाल विकास विभागाच्या विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.

****

भारतीय टपाल विभागातर्फे आज ९ ऑक्टोबरपासून ‘राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा केला जाणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या अनुषंगानं यावर्षी राष्ट्रीय डाक सप्ताहाअंतर्गत “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. १६ ऑक्टोबर पर्यंत हा सप्ताह चालणार आहे. डाक विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी तसंच बचत योजनांचा या सप्ताहात प्रचार - प्रसार केला जाणार आहे.

****

आझादी का अमृत महोत्सव निमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा पोलीस ठाण्यात, 'महिलांचे अधिकार' या विषयावर काल कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्यात आलं. महिलांची होणारी कुचंबणा, त्यांना असणारे विविध संवैधानिक अधिकार तसंच इतर कायदे यासंदर्भात विधिज्ञ स्वप्नील मुळे यांनी यावेळी माहिती दिली.

****

नांदेड जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार २५१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. जवळपास सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पिक विमा काढलेला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबिन पिकाचं मोठया प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. विमा कंपनी तसंच कृषि विभागाकडून येत्या ३ ते ४ दिवसात नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून, विमा कंपनी इतर पिकांसोबत सोयाबिन पिकाची देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

****

उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं येत्या ११ ऑक्टोबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये जालना जिल्ह्यातल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावं, असं आवाहन काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलं आहे. ते काल जालन्यात वार्ताहरांशी बोलत होते.

****

नागरिकांनी भगर, साबुदाणा तसंच खाद्यतेल विकत घेतांना ते पॅकबंद असल्याची खात्री करावी. हे पदार्थ विकत घेतांना वेष्टनावर उत्पादकाचं नाव नसल्यास, असे पदार्थ खरेदी करु नये, असं आवाहन, बीडच्या अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे. या वस्तू वापरण्याची कालमर्यादा तपासून घ्यावी, भगरीचं खुलं पीठ बाजारातून विकत घेऊ नये, असंही अन्न आणि औषध विभागानं सांगितलं आहे.

****

देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसाठी काल एकूण ३४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात भाजपचे सुभाष पिराजी साबणे, काँग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापूरकर, वंचित बहुजन आघाडीचे उत्तम रामराव इंगोले या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.

या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. निवडणूकी संदर्भात जिल्ह्यातल्या नागरिकांपैकी कुणाच्या काही हरकती, तक्रारी, गाऱ्हाणी असल्यास संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

औरंगाबादनजीकच्या ढोरकीन इथं काल विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मोठा पाऊस झाला तर सिल्लोड तालुक्यातल्या डकला इथं मधुकर ननवरे या नागरिकाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

उस्मानाबाद शहर आणि तालुक्यात काल रात्री जोरदार पाऊस झाला

बीड जिल्ह्यात काल वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. गेवराई तालुक्यात भोगलगाव इथं विद्युत वाहक तार अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. धोंडीराम रामा कांबळे  असं या ६५ वर्षीय वृध्दाचं नाव आहे. तळणेवाडी इथं घडलेल्या अशाच एका घटनेत २० वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. केज तालुक्यात साळेगाव शिवारातल्या एका खदानीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू झाला. अनिल बबन शिंदे आणि प्रकाश बबन शिंदे अशी या दोघांची नावं आहेत.

****

हवामान -

औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यात उद्या रविवारीही पाऊस होण्याचा अंदाज आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...