आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१२ ऑक्टोबर २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या २८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृष्य
प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा
या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
****
भारतातल्या कोविड १९ प्रतिबंधक
लसीकरण मोहिमेनं ९५ कोटी ८२ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत २७ कोटी २१
लाखांहून अधिक जणांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. काल दिवसभरात ५९ लाख ६२
हजारांहून अधिक जणांना लस देण्यात आली.
****
अर्थशास्त्र विषयातल्या नोबेल
पुरस्कारांची घोषणा काल झाली. अमेरिकेत स्थायिक असलेले कॅनडाचे डेव्हिड कार्ड, इस्रायल
अमेरिकेन जोशुआ अँग्रिस्ट आणि डच-अमेरिकन असलेले गुईदो इम्बेन्स या तिघांना कामगारक्षेत्र
आणि नैसर्गिक प्रयोग या क्षेत्रातल्या भरीव कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला.
कामगार क्षेत्राबाबतचा नवा दृष्टिकोन दिल्याबद्दल आणि नैसर्गिक प्रयोगांमधून कारण आणि
परिणाम यांच्या परस्पर संबंधांबद्दल काय निष्कर्ष काढता येतील, याबाबत त्यांनी केलेल्या
कामाबद्दल या तिघांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
****
जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये
काल दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सैन्यदलातल्या पाच सैनिकांना वीरमरण आलं. पुंछ
सेक्टरमध्ये सुरणकोटे परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर सैन्यदलानं
या भागात कारवाई सुरू केली. त्यावेळी झालेल्या चकमकीत पाच सैनिकांचा मृत्यू झाला. काल
रात्रीपर्यंत ही चकमक सुरू होती.
****
तिरुपती बालाजी देवस्थान
इथल्या दर्शनासाठी बनावट ऑनलाईन पास देणाऱ्या औरंगाबाद शहरातल्या आशिष गुनाले या २२
वर्षीय तरुणाला पोलिसांनी काल अटक केली. त्याने ६१ जणांना प्रत्येकी ३०० रुपये याप्रमाणे
शुल्क आकारुन दर्शनासाठी बनावट पास दिले होते. तिरुपती इथं या पासच्या आधारे दर्शन
घेण्यास परवानगी मिळाली नाही, त्यामुळे संबंधितांनी केलेल्या तक्रारीवरुन आशिष गुनाले
याला औरंगाबाद सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
****
मराठवाड्यात काल ७२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
****
No comments:
Post a Comment