Thursday, 14 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 14.10.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 १४ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

भारत २०२१ मध्ये ९ पूर्णांक ५ टक्के वाढीसह जगातली सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केला आहे. नाणेनिधीच्या अंदाजानुसार २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ८ पूर्णांक ५ दशांश टक्के वाढेल तर वर्तमान वर्षात जागतिक अर्थव्यवस्था ५ पूर्णांक ९ टक्के आणि २०२२ मध्ये ४ पूर्णांक ९ टक्के वाढण्याची अपेक्षा आहे.

****

परभणी जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर काल पाथरी इथल्या स्वर्गीय नितीन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यात प्लास्टीक मुक्त अभियान, वेस्ट पासून बेस्ट या संकल्पना राबवण्यात आल्या. प्रत्येक आठवड्यात महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी श्रमदान केलं जाणार आहे.

****

आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत लातूर जिल्हयात गावोगावी कायदेविषयक जनजागृती शिबीराचं आयोजन करण्यात येत आहे. त्यानिमित्त काल मोजे चाटा, बोरगांव, हरंगुळ, मतिमंद विद्यालय, एमआयडीसी लातूर इथं कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आलं. यावेळी नागरिकांना तज्ञांमार्फत वेगवेगळ्या कायदेविषयक योजनांची माहिती देण्यात आली.

****

२८ ऑक्टोबर पर्यंत रद्द करण्यात आलेली नांदेड-पनवेल एक्स्प्रेस आता १४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान मार्ग बदलून धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-पनवेल एक्स्प्रेस १५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान रद्द केल्याचं कळवलं होतं. मात्र जनतेची मागणी लक्षात घेवून गाडी रद्द न करता १४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान लातूर रोड, कुर्डूवाडी, मिरज, पुणे या मार्गाने धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वे कार्यालयानं कळवलं आहे. 

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघादरम्यान होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कोलकाता संघानं दिल्ली कॅपिटल संघाचा ३ गडी राखून पराभव केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 28 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...