Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 24 January 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.
****
देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं
ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं,
आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा,
दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती
आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०-
२६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षापूर्वी नवभारत निर्माणाचं उद्दीष्ट पूर्ण
होणार - पंतप्रधानांचं प्रतिपादन; नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम प्रतिमेचं
इंडिया गेट परिसरात अनावरण
· भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व म्हणजे सत्तेसाठी घेतलेलं ढोंग - मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांची टीका
· राज्यात शाळांचे वर्ग आजपासून पुन्हा प्रारंभ; पालकांनी पाल्यांना शाळेत जाण्याची
परवानगी द्यावी- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन
· राज्यात काल कोविडचे नवे ४० हजार ८०५ रुग्ण; मराठवाड्यात चौघांचा मृत्यू; तर
चार हजार २९१ नव्या रुग्णांची नोंद
· तुळजाभवानी मंदिरातल्या अकरा पुजाऱ्यांवर, मंदिर प्रवेशबंदीची कारवाई
· जालना जिल्ह्यात गारगोटीच्या दगडाचं अवैध उत्खनन करणाऱ्या टोळीतल्या चौघांना
अटक
· दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारताचा अवघ्या चार धावांनी
पराभव
आणि
· सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅटमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत पी व्ही सिंधू
अजिंक्य; मिश्र दुहेरीतही भारतीय जोडीला विजेतेपद
****
स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षापूर्वी नवभारत निर्माणाचं उद्दीष्ट पूर्ण
होईल, नेताजींच्या स्वप्नातला भारत लोकसहभागातून घडवण्यात येईल, असा विश्वास, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. काल नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीदिनी,
दिल्लीत इंडिया गेट परिसरात नेताजींच्या नियोजित भव्य पुतळ्याच्या जागी, छायाप्रकाश
तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं नेताजींच्या त्रिमीतीय प्रतिमेचं अनावरण पंतप्रधानांच्या
हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. नेताजींच्या कार्याला उजाळा देताना पंतप्रधान
म्हणाले...
Byte …
नेताजी
कहते थे, कभी भी स्वतंत्र भारत के सपने का विश्वास मत खोना. दुनिया की कोई ताकत नहीं
है, जो भारत को झकझोंर सके. आज हमारे सामने आझाद भारत के सपनों को पुरा करने का लक्ष्य
है. आझादी के सौं वे साल से पहले नये भारत के निर्माण का लक्ष्य है. और नेताजी को देश
पर जो विश्वास था, जो भाव नेताजी के दिल में उभरते थे, और उनके इन भावों के कारण मैं
कह सकता हूं, कि दुनिया की कोई ताकत नहीं है, जो भारत को इस लक्ष्य तक पहुंचने से रोक
सके.
२०१९ ते २०२२ या वर्षांसाठीचे नेताजी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार,
पंतप्रधानांच्या हस्ते या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले, केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गेल्या काही वर्षांत आपत्ती व्यवस्थापन
क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. राष्ट्रीय तसंच
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या सैनिकांचं अभिनंदन करत, आपत्ती प्रतिसादादरम्यान हुतात्मा
झालेल्या सैनिकांना पंतप्रधानांनी अभिवादन केलं.
त्यापूर्वी काल सकाळी पंतप्रधान तसंच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, संसदेच्या
केंद्रीय कक्षात नेताजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी नेताजींना अभिवादन करताना, नेताजींचा त्याग आणि कार्य प्रत्येक भारतीयाला सदैव
प्रेरणा देत राहील, असं म्हटलं आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही नेताजींना
अभिवादन केलं. संपूर्ण राष्ट्र नेताजींचं आदर भावनेनं स्मरण करत असल्याचं, नायडू यांनी
म्हटलं आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान आज दुपारी १२ वाजता दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून,
राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या बालकांशी संवाद साधणार आहेत. या बालकांना २०२१ आणि
२०२२ साठीचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, यावेळी ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून
प्रदान केले जाणार आहेत. गौरवपदक, एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं
स्वरूप आहे.
या पुरस्कार विजेत्यांमध्ये नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातल्या घोडज इथल्या,
कामेश्वर जगन्नाथ वाघमारे तसंच नागपूरच्या श्रीनभ अग्रवाल यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात हा कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. ३० जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या
पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान जनतेला संबोधित करतील. यावेळी
मन की बात सकाळी अकरा वाजेऐवजी, साडेअकरा वाजता प्रसारित करण्यात येईल. या कार्यक्रमात
समाविष्ट करता येतील अशा प्रेरणादायक यशोगाथा पाठवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं
आहे. MyGov या खुल्या मंचावर किंवा नमो अॅपवर नागरिकांना संदेश पाठवता येतील. एक आठ
शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावरही हिंदी किंवा इंग्रजीत पंतप्रधानांसाठी
संदेश देता येईल.
****
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शहाण्णववी जयंती काल साजरी झाली. त्यानिमित्तानं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं. बाळासाहेब त्यांच्या अमोघ नेतृत्वासाठी
कायम स्मरणात राहतील असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईत वर्षा या शासकीय निवासस्थानी
नेताजी सुभाषचंद्र बोस तसंच बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. या निमित्तानं
शिसैनिकांशी ऑनलाईन पद्धतीने साधलेल्या संवादात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर कडाडून टीका
केली
भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व म्हणजे सत्तेसाठी घेतलेलं ढोंग असल्याचं, मुख्यमंत्री
म्हणाले. भाजपसोबतच्या युतीत शिवसेना २५ वर्ष सडल्याचा पुनरुच्चार केला. हिंदुत्वासंबंधी
शिवसेनेच्या धोरणाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले....
Byte….
हिंदुत्वासाठी
सत्ता की सत्तेसाठी हिंदुत्व हा एक प्रश्न. आजचं यांचं एक पोकळ हिंदुत्व आहे, ते सत्तेसाठी
अंगिकारलेलं एक ढोंग आहे. वाघाचं कातड पांघरलेलं, काय गाढव म्हणा शेळी असते तसं यांनी
हिंदुत्वाचं कातडं पांघरलेलं आहे. हे आता आपल्या लक्षात आलं, पंचवीस वर्ष यांना पोसल्यानंतर
लक्षात आलं. हे दुर्दैव आहे. आणि मी मागे एकदा बोललो होतो, की पंचवीस वर्ष आपली युतीमध्ये
सडली. तीच भूमिका आणि तेच माझं मत आजही कायम आहे. मी त्या मतावर ठाम आहे. अनेकदा आपल्यावर
टीका होते, की तुम्ही हिंदुत्व सोडलं. आम्ही हिंदुत्व नाही सोडलं, आम्ही हिंदुत्वापासून
कदापि दूर जाऊ शकत नाही, शकणार नाही. हिंदुत्व आम्ही कधीही सोडू शकत नाही, सोडणार नाही.
आम्ही भाजपला सोडलं. हिंदुत्व सोडलेलं नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राजशिष्टाचार मंत्री
आदित्य ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केलं.
****
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती औरंगाबाद इथं विविध
कार्यक्रमांनी साजरी झाली. शहरातल्या काल्डा कॉर्नर इथल्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला
शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. सिडकोतल्या आविष्कार चौकात
केंद्र सरकारच्या ई - श्रम कार्डाचं वितरणही काल मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं.
मराठवाड्यात सर्वच शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयं तसंच शैक्षणिक संस्थांमधून,
नेताजी तसंच बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं.
****
राज्यात बहुतांश शाळांचे १० वी तसंच १२वीचे वर्ग आजपासून सुरू होणार आहे. कोविडच्या
स्थानिक परिस्थितीनुसार शाळांचे वर्ग सुरू करायचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
शाळा सुरू करण्याचा निर्णय जगभरातली परिस्थिती पाहून आणि लहान मुलांबाबतच्या कृती दलाशी
चर्चा करुन घेण्यात आला आहे, त्यामुळे पालकांनी पाल्यांना शाळेत जाण्याची परवानगी द्यावी,
असं आवाहन, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी कोरोना
प्रतिबंधक नियमांचं पालन करावं, असं ते म्हणाले.
****
राज्यात काल एकही ओमायक्रॉन संसर्ग झालेला रुग्ण आढळला नाही. राज्यातल्या ओमायक्रॉन
बाधित रुग्णांची संख्या दोन हजार ७५९ एवढी असून, यापैकी एक हजार ४३७ रुग्ण संसर्गमुक्त
झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४० हजार ८०५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ७५ लाख सात हजार २२५ झाली आहे. काल ४४ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार
११५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८९ शतांश टक्के झाला आहे. काल २७ हजार ३७७ रुग्ण
बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७० लाख ६७ हजार ९५५ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक १५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
दोन लाख ९३ हजार ३०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल चार हजार २९१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर चार रुग्णांचा
मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश
आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार २२४ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका
क्षेत्रातले ७७९, तर ग्रामीण भागातले ४४५ रुग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात ७८६, लातूर
७७१, जालना ४४२, उस्मानाबाद ३५६, बीड २९०, परभणी २५७, तर हिंगोली जिल्ह्यात १६५ रुग्णांची
नव्यानं नोंद झाली.
****
राज्यभरात काल राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा पेपर नागपूरमध्ये
फुटल्याची चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू होती. मात्र राज्य लोकसेवा आयोग- एमपीएससी
ने या वृत्ताचं खंडन केलं आहे. अशी कुठलीही घटना घडलेली नसल्याचा खुलासा आयोगानं ट्विटरवर
केला आहे.
****
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिरातल्या अकरा पुजाऱ्यांवर, तुळजा भवानी मंदिर
समितीचे अध्यक्ष तथा उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी, मंदिर प्रवेशबंदीची
कारवाई केली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फोटो काढणं, भाविकांशी उद्धट वर्तन करणं,
मारहाण करणं अशा विविध तक्रारींवरुन सहा पुजाऱ्यांवर तीन महिने, आणि पाच पुजाऱ्यांवर
एक महिना मंदिर प्रवेशबंदी करण्यात आली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या वाघरुळ शिवारात गारगोटीच्या दगडाचं अवैध उत्खनन करणाऱ्या
टोळीतल्या चौघांना तालुका जालना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं. संशयितांकडून
गारगोटीच्या दगडांसह जेसीबी, ट्रॅक्टर आणि एक कार, असा एकूण ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला आहे.
****
क्रिकेट
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामनाही भारताने काल अवघ्या चार धावांनी
गमावला. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करत दक्षिण
आफ्रिका संघाने २८७ धावा करून, भारतासमोर २८८ धावांचं लक्ष्य ठेवलं, प्रत्युत्तरादाखल
खेळताना भारताचा संघ ४९ व्या षटकांत २८३ धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिका संघानं
तीनही सामने जिंकून मालिका जिंकली आहे.
****
सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅटमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं अजिंक्यपद पी
व्ही सिंधूने पटकावलं आहे. लखनऊ इथं झालेल्या या स्पर्धेच्या कालच्या अंतिम लढतीत सिंधूने,
मालविका बनसोड हिचा, २१-१३, २१-१६ असा पराभव केला.
मिश्र दुहेरीत भारताच्या इशान भटनागर आणि तनिषा क्रिस्टो जोडीने विजेतेपद पटकावलं,
तर पुरुष दुहेरी तसंच महिला दुहेरीत भारतीय जोड्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं
लागलं.
पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल फ्रान्सच्या बॅटमिंटनपटूंपैकी एक जण कोविड
बाधित झाल्यानं, हा सामना रद्द करण्यात आला. अर्नौद मर्केल आणि लुकास क्लिअरबोट या
दोन फ्रेंच खेळांडूमध्ये हा सामना होणार होता.
****
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारत-अमेरिकेच्या सानिया
मिर्झा आणि राजीव राम या जोडीनं उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल त्यांनी
इल्लेन प्रेझ आणि माटवेमिडल कूप या ऑस्ट्रेलिया-डच जोडीचा सात - सहा, सहा - चार असा
पराभव केला.
****
कौशल्य विकास उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना प्रशिक्षण देण्याचं
आवाहन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. औरंगाबादमधल्या डेंटल
स्कील इन्स्टीट्यूट या संस्थेच्या कौशल्य विकास अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र
वितरण काल कराड यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास अभियानाच्या
माध्यमातून केंद्र सरकार जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचं
ते म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात एकलारा आणि देगलूर तालुक्यात तमलूर इथं
उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं छापा टाकून सुमारे २० लाख ५० हजार रुपयांचा मद्यसाठा
जप्त केला. या गुन्ह्यात ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाची कामं त्वरीत पूर्ण करावीत, असे निर्देश
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित विभागाना दिले आहेत. ते काल नांदेड
इथं संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीत बोलत होते. गरजेच्या वेळी नागरिकांना पाणी
उपलब्ध व्हावं यादृष्टीनं भोकरसह इतर टंचाईग्रस्त गावातील कामांना मंजुरी दिली असल्याचं
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
भारतीय टपाल विभाग तसंच परभणी टपाल विभागातर्फे २२ ते २९ जानेवारी दरम्यान परभणी
विभागातल्या सर्व टपाल कार्यालयांमध्ये, सुकन्या समृद्धी खातं उघडण्यासाठी विशेष अभियान
राबवण्यात येत आहे. २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो.
पालकांनी आवर्जून या उपक्रमात सहभागी व्हावं, असं आवाहन टपाल विभागानं केलं आहे.
****
No comments:
Post a Comment