Sunday, 6 February 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१० मि

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 February 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

ठळक बातम्या

****

** पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी जनआंदोलन उभारण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

** उत्पादन, विपणन आणि बाजारपेठ याचा अभ्यास करुन उद्योजकांनी आपापल्या भागाच्या विकासाचं धोरण निश्चित करावं- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

** गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा उपचारांना प्रतिसाद

** राज्यात कोविड संसर्गाचे  ११ हजार ३९४ नवे रुग्ण, मराठवाड्यात ११ रुग्णांचा मृत्यू तर एक हजार २० बाधित

** औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी आमदार हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड, दिलीप निरफळ उपाध्यक्ष

** उदगीरच्या नियोजित ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राज्यमंत्री संजय बनसोडे यांची निवड

** आणि**

** १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिके स्पर्धेत इंग्लडचा पराभव करत भारताता पाचव्यांदा विश्व विजेता होण्याचा पराक्रम   

****

आता सविस्तर बातम्या

****

पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी जनआंदोलन उभारण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हैदराबाद इथं आंतराराष्ट्रीय अर्धशुष्क उष्ण कटीबंधीय पीक संशोधन संस्थेच्या सुर्वणमहोत्सवी समारंभाचं पंतधानांच्या हस्ते काल उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. हवामानबदलाच्या समस्येपासून शेतकऱ्यांचा बचाव करण्यासाठी सरकारनं पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीवर भर दिल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या काही वर्षात पामतेलाचं क्षेत्र साडेसहा लाख हेक्टरवर नेण्याचं सरकारचं उद्दीष्टं असून, सरकार खाद्य आणि पोषण सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. संस्थेच्या सुर्वणमहोत्सवी सोहळ्यानिमित्तानं एक टपाल तिकिटही पंतधानांनी जारी केलं. दरम्यान, शमशाबादजवळ मुंचीताल इथं स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी या संत रामानुजाचार्य यांच्या २१६ फुटी पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते काल अनावरण करण्यात आलं.

****

उत्पादन, विपणन आणि बाजारपेठ याचा अभ्यास करुन उद्योजकांनी आपापल्या भागाच्या विकासाचं धोरण निश्चित करावं, असं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. ते काल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलत होते. राज्यातल्या नेत्यांनी अर्थसंकल्पात घोषित योजनांचा अभ्यास करुन आपल्या विभागाच्या विकासासाठीचं धोरण ठरवावं असंही ते म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी येणारा २५ वर्षाचा काळ अमृत काळ असून अर्थमंत्र्यांनी भविष्यातली धोरणं या अर्थसंकल्पात मांडली आहेत, असं डॉ. कराड यांनी यावेळी नमूद केलं.

****

 

राज्यातल्या उद्योगांच्या भरभराटीसाठी दळवळण खर्च कमी करण्याची गरज असून, यासाठी बहुआयामी प्रकल्प अर्थात मल्टीमॉडेल हब विकसित करण्याची सूचना, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ते काल मुंबईत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या 'नवीन अर्थसंकल्पीय दृष्टीकोनातून महाराष्ट्राच्या विकास वाटा' या परिषदेत बोलत होते. सोलापूर, सांगली आणि नाशिक इथं लवकरच ड्रायपोर्ट सुरु करण्यात येईल, असं गडकरी यांनी सांगितलं.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात सर्वात वेगानं वाढत असून व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्रात राज्याची भूमिका महत्त्वाची असल्याचं गडकरी म्हणाले. साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर दिल्यास, ग्रामीण महाराष्ट्राचं चित्र पालटेल, इथेनॉल निर्मितीमुळे राज्यातल्या सुमारे ५० लाख युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शेतकऱ्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर दिल्यास ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्ण बदलेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

***

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी सांगितलं आहे. लता दिदींना गेल्या ९ तारखेपासून मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, उपचारानंतर त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. मात्र काल अचानक त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यानं, त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान लतादिदींच्या भगिनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी दिदींची काल रुग्णालयात भेट घेतली. दिदींची प्रकृती स्थिर असून, त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं, आशा भोसले यांनी माध्यमांना सांगितलं.

***

सुपर मार्केट आणि किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्राणांतिक उपोषणाचा निर्णय घेतला आहे. हजारे यांनी काल एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांना ही माहिती दिली. हा निर्णय महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत दुर्दैवी तसंच भावी पिढ्यांसाठी घातक असल्याने आपण सरकारचा निषेध करतो, असं हजारे यांनी या पत्रात म्हटलं आहे. सुपरमार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी आंदोलनाचा इशाराही अण्णा हजारे यांनी या पत्रातून दिला आहे.

****

राज्याच्या विविध भागातून लसीकरणासाठी नागरिकांचा मिळणारा अत्यल्प प्रतिसाद लक्षात घेऊन हर घर दस्तक ही मोहीम बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. एक फेब्रुवारीनंतर या मोहिमेला मुदतवाढ देण्यास आरोग्य विभागाकडून नकार देण्यात आल्याचं, राज्य लसीकरण कार्यालयातून सांगण्यात आलं.

****

राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या तीन हजार ३३४ एवढी झालेली असून, यापैकी दोन हजार १३ रुग्ण संसर्गातून मुक्त झाले आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ११ हजार ३९४ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७७ लाख ९४ हजार ३४ झाली आहे. काल ६८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार आठ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल २१ हजार ६७७ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७५ लाख १३ हजार ४६३ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९६ पूर्णांक ४० शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक लाख ३३ हजार ६५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल एक हजार २० कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळले, तर ११ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ६, लातूर आणि नांदेडच्या प्रत्येकी दोन तर परभणीच्या एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काल २०७ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात १५७, हिंगोली १४१, उस्मानाबाद १३७  नांदेड १३१, बीड ११५, परभणी ८९, तर जालना जिल्ह्यात ४३ नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड- १९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दहा लाख आठ हजार १८५ म्हणजे जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी ८३ टक्के नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे, तर सहा लाख ९६ हजार ६९३ म्हणजे ५३ टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या ९० टक्के तर दुसरी मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या ७० टक्क्यांपर्यंत वाढावी, तसंच जिल्ह्यातले कोविड प्रतिबंधात्मक निर्बंध शिथील व्हावेत, यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तयार केलेल्या २२ कलमी सूक्ष्म कृती आराखड्याची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.  

****

राज्यात मुदत संपलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगानं लवकर जाहीर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस सोबत युती करण्यास तयार असल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारच्या किराणा दुकानात वाईन विक्री निर्णयाचं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी समर्थन केलं.

****

औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांची काल बिनविरोध निवड झाली. रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांचे समर्थक दिलीप निरफळ यांची संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. उपाध्यक्ष पदासाठी भुमरे आणि महसुल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांत सामना झाल्यानं, ही निवडणूक चुरशीची झाली. यात भुमरे समर्थक निरफळ हे ९ विरुद्ध ५ मतांनी विजयी झाले.

****

वैद्यकीय शिक्षण सचिव विजय सौरभ यांनी राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचे पडसाद काल औरंगाबाद इथंही उमटले. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या वतीनं सर्व अध्यापकांनी एक दिवसाची सामुहिक रजा घेतली. तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीच्या समोर आंदोलन केलं.

****

उदगीर इथल्या नियोजित ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राज्यमंत्री संजय बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. उदगिरी इथं महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात काल या संमेलनाच्या बोधचिन्हाचं प्रकाशन बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर बोलताना बनसोडे यांनी, साहित्य संमेलनाचे 'स्वागताध्यक्षपद' मिळणं हा खूप मोठा सन्मान असल्याचं म्हंटलं आहे. सीमावर्ती भागातल्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करून हे संमेलन सर्वसमावेशक करण्याचा मानसही बनसोडे यांनी व्यक्त केला.

****

१९ वर्षांखालील विश्वचषक क्रिके स्पर्धेत भारतानं काल इंग्लडचा पराभव करत पाचव्यांदा विश्व विजेता होण्याचा पराक्रम केला आहे. वेस्ट इंडिजमध्ये अँटीग्वॉल्या सर विवियन रिचर्डस मैदानावर झालेल्या कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा इंग्लंडचा संघ १८९  धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युतरादाखल भारतीय संघानं ४७ षटकं आणि ४ चेंडू खेळत सहा गड्यांच्या बदल्यात विजयी लक्ष प्राप्त केलं. भारताच्या राज बावा याने ५ गडी आणि ३५ धावा करत ष्टपैलू कामगिरी केली. निशांत सिंधू यांने ५० धावांची खेळी केली तर रविकुमार यानं ४ गडी बाद केले.

***

दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरवात होत आहे. अहमदाबाद इथं दुपारी दीड वाजता सामन्याला सुरवात होईल. या मालिकेनंतर दोन्ही संघात तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे.

****

परभणी जिल्ह्यात टाकळी कुंभकर्ण इथं ग्रामपंचायत कार्यालयाजवळील किराणा दुकानाला काल पहाटे आग लागून मोठं नुकसान झालं. अग्निशमन दलाने ताबडतोब कारवाई करत  आग आटोक्यात आणली. जिल्ह्यात अन्य एका आगीच्या घटनेत पूर्णा शहरात मालाची ने-आण करणारे दोन टेम्पो खाक झाले. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 12 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...