Sunday, 6 February 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 06.02.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 February 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

ज्येष्ठ पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू यांनी आपल्या शोकसंदेशात, सुरांच्या माध्यमातून लताजी, लाखो रसिकांच्या हृदयात सदैव जिवंत राहतील असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लता दिदींच्या जाण्याने मोठं दुखं झाल्याचं आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आजचे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोशारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, पण त्यांच्या अमृत स्वरांनी त्या अजरामर आहेत, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील, या शब्दात शरद पवार यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली.

****

लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे, भारतीय संगीताचे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. आशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

आपल्या अलौकिक सूरांनी संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्र मूक झालं, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी शोक व्यक्त केला आहे.

****

आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी, ज्येष्ठ संगीतकार पंडित विश्वनाथ ओक यांनी या शब्दांत लतादिदींना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले –

संगीतातले जे सात स्वर आहेत, ते सात स्वरही ज्यांच्या नावात सामावलेले आहेत, अशी सात अक्षरं म्हणजे लता मंगेशकर. अखिल संगीत विश्वाला या आवाजाने साधारण १९४२-४३ पासून उमेदी गाठवलेली आहे. भारतातल्या असंख्य भाषांमधून त्यांनी रसिकांचे कान तृप्त केले. या प्रत्येक गाण्यात त्यांनी जीव ओतला. आणि प्रत्येक गाणं त्यांनी अमर केलं.

****

ज्येष्ठ सिने पत्रकार अशोक उजळंबकर यांनी लता दिदींना श्रद्धांजली व्यक्त करताना, आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या.

प्रत्येक दशकामध्ये त्यांची गाणी गाजत गेली. ५० ते ६० वेगळं, ६० ते ७० वेगळं, ७० ते ८० वेगळं, ८० ते ९० वेगळं. पुढे आत्ता २००४ पर्यंत वीरझारापर्यंत त्यांनी गाणी गायली. लतादिदींचं गाणं घेणं आम्हा संगीतकारांना परवडणारं नव्हतं. तरीपण त्यांनी सांगितलं तुम्ही पैसे देऊ नका, गाणी गाऊन घ्या. आमच्या सारख्यांनी त्यांच्या गायनावर तर प्रतिक्रिया देणं हा वेडेपणा आहे. एक स्वर्गीय सूर आपल्यातून निघून गेलेला आहे. आणि पुन्हा लता होणे नाही एवढं मात्र निश्चित.

****

प्रसिद्ध गायक संगीतकार कौशल इनामदार यांनी लतादिदींना या शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली.

लताबाईंनी इतक्या असंख्य गाण्यांमधे त्यांनी आपला श्वासच तर सोडून गेल्यात. आणि तो श्वाससुद्धा त्यांच्या स्वराच्या रूपाने सोडून गेल्यात. इतका निखालस, दैवी स्वर्गाच्या सुराने लताबाई आपल्याला त्यांचा श्वास या पृथ्वीतलावर ठेवून गेलेल्या आहेत. त्यामुळे अशा माणसाला, अशा व्यक्तीला ती गेली असं कसं म्हणता येईल आपल्याला. मला असं वाटतं की, एका अर्थाने लताबाईंचं अमरत्व सिद्ध झालं.

****

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरवात होत आहे. अहमदाबाद इथं दुपारी दीड वाजता सामन्याला सुरवात होईल. या मालिकेनंतर दोन्ही संघात तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...