Tuesday, 8 February 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 08.02.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 February 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

देशात अनेक विकास कामं सुरु असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते आज बोलत होते. लसीकरण इतकं प्रभावी नाही किंवा लसीकरणावर अवास्तव खर्च करण्यात आला असं काही सदस्य म्हणाले, मात्र लसीकरण हे भारताचं सर्वात मोठं यश असल्याचं पंतप्रधान म्हणाले. कोविड महामारीचा देशानं योग्य पद्धतीने सामना केला, त्यात लसीकरणानं महत्वाची भूमिका बजावली असं ते म्हणाले. कोविड-19 विरुद्धचा लढा हा मजबूत आणि सौहार्दपूर्ण सांघीक संरचनेशी देखील जोडलेला असल्याचं सांगून त्यांनी, या मुद्यावर आतापर्यंत सर्व मुख्यमंत्र्यांसोबत २३ बैठका झाल्या असल्याचं नमूद केलं. कोविड-19 परिस्थिती, रोजगार, कृषी क्षेत्रात केलेल्या सुधारणा, सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रात केलेले बदल, स्टार्ट अप, टाळेबंदीनंतर सुधारलेली आर्थिक परिस्थिती असे अनेक मुद्दे पंतप्रधानांनी यावेळी मांडले.

आपण कोणत्या बाजुने आहोत याची पर्वा न करता आपल्याला लोकांसाठी काम करावं लागेल, विरोधी पक्षात राहणं म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम थांबवणं, ही मानसिकता चुकीची असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आपल्या लोकशाहीला सर्वात मोठा धोका घराणेशाहीचा असून, जेव्हा राजकीय पक्षात एकच कुटुंब जास्त प्रचलित होतं, तेव्हा राजकीय प्रतिभेला धक्का पोहोचतो, असं ते म्हणाले. काँग्रेस पक्ष देशाच्या विकासाला बाधा पोहोचवत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला.   

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या आज दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होत्या. महाराष्ट्र काँग्रेसनंच देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप पंतप्रधानांनी काल लोकसभेत केला होता, त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे बोलत होत्या. मोदींना पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रातल्या मतदारांचा मोठा वाटा आहे. त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा आणि राज्याचा अपमान कोविड सुपर स्प्रेडर म्हणून त्यांनी केला, हे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी असल्याचं, त्या म्हणाल्या. पंतप्रधानांच्या या वक्तव्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं. 

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १७० कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ५५ लाख ७८ हजार २९७ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १७० कोटी २१ लाख ७२ हजार ६१५ मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एक कोटी ५३ लाख २६ हजार ७१४ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे. 

दरम्यान, देशात काल नव्या ६७ हजार ५९७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, एक हजार १८८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक लाख ८० हजार ४५६ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत चार कोटी आठ लाख ४० हजार ६५८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, नऊ लाख ९४ हजार ८९१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

****

हिंदी आणि पंजाबी चित्रपट तसंच दूरचित्रवाणी मालिकेतले अभिनेते प्रवीणकुमार यांचं दीर्घ आजारानं निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. दूरदर्शनवर प्रसारीत झालेल्या बी.आर.चोप्रा निर्मित ऐतिहासिक “महाभारत” या मालिकेत प्रवीणकुमार यांनी ‘भीम’ ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. प्रवीण यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. प्रवीण हे एक अभिनेता होतेच त्यासोबतच एक अॅथलीट होते. त्यांनी आशिया खेळांमध्ये दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकलं होतं, तसंच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

****

राज्यातल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. हेल्पलाइनसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. राज्य मंडळातर्फे चार ते ३० मार्चदरम्यान बारावीची, तर १५ मार्च ते चार एप्रिलदरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा होत असल्यानं राज्य मंडळाने केलेल्या उपाययोजना, परीक्षेचं स्वरूप, आणि पालक, विद्यार्थी आणि संबंधित घटकांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी राज्य मंडळानं नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.

****

दक्षिण आफ्रिकेत सुरु झालेल्या एफ आय एच प्रो लीग हॉकी स्पर्धेत आजपासून भारताचे सामने सुरु होत आहेत. भारताच्या पुरुष हॉकी संघाचा आज फ्रान्सबरोबर पहिला सामना होणार असून, उद्या दुसरा सामना दक्षिण आफ्रिका संघाबरोबर होणार आहे. मनप्रीत सिंग हा भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...