Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 February
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०८ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत
आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५
ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस
घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या
उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात
तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· छोट्या शेतकऱ्यांना सक्षम करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांकडून
व्यक्त
· भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना संसदेत श्रद्धांजली अर्पण
· गर्भवती आणि बालकांना गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी राबवण्यात
येणाऱ्या मिशन इंद्रधनुष अभियानाच्या चौथ्या टप्प्याचा शुभारंभ
· स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या इतर मागासवर्ग आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा हंगामी अहवाल राज्य सरकारकडे सुपुर्द
· राज्यात कोविड संसर्गाचे
६ हजार ४३६ नवे
रुग्ण, मराठवाड्यात सहा रुग्णांचा मृत्यू तर ४८७ बाधित
आणि
·
पुण्याच्या डॉ. शांतीश्री धुलीपुडी
पंडित दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या
पहिल्या महिला
कुलगुरू
****
छोट्या शेतकऱ्यांना सक्षम करण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी व्यक्त केली आहे. ते काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या
चर्चेला उत्तर देत होते. गेल्या सात वर्षांत महागाईचा दर सरासरी पाच टक्क्यांपेक्षा
कमी राहिला आहे, संयुक्त पुरोगामी सरकारच्या कार्यकाळात, हा दर दोन आकडी राहिल्याचं
पंतप्रधान म्हणाले. देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश करत असून, जगाचं नेतृत्व करण्याची आपली क्षमता आपण ओळखली
पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं. कोरोनाच्या संकटकाळावर आपण मात केली
असून गेल्या वर्षभरात देश अनेक क्षेत्रात सक्षम झाला. तसंच भारतीय लस जगात सर्वात
जास्त प्रभावी ठरली, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधलं.
कोविड काळात काँग्रेसनं नागरिकांमध्ये संभ्रम पसरवल्याचा आरोप
त्यांनी यावेळी केला. मुंबईतल्या कामगारांना रेल्वेची तिकीटं वाटून त्यांना रेल्वे
स्थानकावर गर्दी करण्यास प्रवृत्त केल्याचं पंतप्रधान म्हणाले. फोडा आणि राज्य करा,
या धोरणावर वाटचाल करून, काँग्रेस पक्ष फुटीरतावादी विचारांना खतपाणी घालत असल्याची
टीका त्यांनी केली. गेल्या सात वर्षांतल्या काँग्रेसच्या कारवाया हेच सिद्ध करत असल्याचं
ते म्हणाले.
पंतप्रधानांच्या उत्तरानंतर लोकसभेनं धन्यवाद प्रस्ताव आवाजी
मतदानानं संमत केला.
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर
चर्चेत कालही अनेक सदस्यांनी सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या
अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत.
****
केंद्र सरकारनं देऊ केलेल्या झेड श्रेणी सुरक्षेचा एम आय एम
चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी स्वीकार करावा असं आवाहन, केंद्रीय गृहमंत्री अमित
शाह यांनी केलं आहे. ओवेसी यांच्या ताफ्यावर तीन फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश मधल्या
हापुड इथं झालेल्या हल्ल्यासंदर्भात, गृहमंत्री काल राज्यसभेत बोलत होते. या हल्ल्यासाठी
दोन आरोपींना विविध कलमांतर्गत अटक करण्यात आली असून, साक्षीदारांची फॉरेंसिक तपासणी
सुरु असल्याचं शाह यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं ओवेसी यांना बुलेट प्रुफ चारचाकी
सह संपूर्ण देशभरात झेड दर्जाच्या सुरक्षेचा प्रस्ताव दिला असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
भारतरत्न लता मंगेशकर यांना काल संसदेत श्रद्धांजली अर्पण करण्यात
आली. राज्यसभेत सभापती एम व्यंकया नायडू यांनी सभागृहाच्या माजी सदस्या लता मंगेशकर
यांच्या मृत्यूबद्दल शोकप्रस्ताव सादर केला. सर्व सदस्यांनी त्यांना एक मिनीट उभं राहून
श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सदनाचं कामकाज तासाभरासाठी तहकूब करण्यात आलं.
लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोकप्रस्ताव मांडला. सदनानं
उभं राहूनं लता दिदींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर लोकसभेचं कामकाज तासाभरासाठी
स्थगित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल
दु:ख व्यक्त केलं. ३६ भाषांमधून गायन, हे भारताच्या एकतेला वृद्धिंगत करणारं मोठं उदाहरण
असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लता
मंगेशकर यांच्या नावे इंदूरमध्ये संगीत अकादमी स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे.
या अकादमीत लताजींच्या सगळ्या गाण्यांचं संग्रहालय असेल, असंही त्यांनी जाहीर केलं.
इंदूर हे लता मंगेशकरांचं जन्मस्थळ आहे, या शहरात लतादिदींचा पुतळाही उभारणार असल्याचं,
चौहान यांनी सांगितलं.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं स्मारक बांधण्यात यावं
अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात काल मुख्यमंत्र्यांना
पत्र लिहिलं आहे.
****
गर्भवती आणि बालकांना गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी राबवण्यात
येणाऱ्या मिशन इंद्रधनुष या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचा शुभारंभ, केंद्रीय आरोग्य
मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत करण्यात आला. देशात लसीकरणाची गती वाढावी यासाठी ही विशेष मोहीम
राबवली जात आहे. मोहिमेच्या चौथ्या चरणात, देशातल्या ४१६ जिल्ह्यात ही मोहीम दोन टप्प्यात
राबवली जाणार असून, लसीकरणाचं प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष दिलं जाणार
आहे.
****
स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणसंदर्भात
राज्य मागासवर्ग आयोगानं हंगामी अहवाल काल राज्य सरकारकडे सुपुर्द केला. सर्वोच्च
न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने, ओबीसी, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांची उपलब्ध
माहिती राज्य मागासवर्ग आयोगाला दिली होती. त्या आधारे आयोगानं हा अहवाल तयार केला
आहे, अशी माहिती ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री विजय
वडेट्टीवार यांनी दिली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आयोगाचे
अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे आणि आयोगातले सर्व सदस्य उपस्थित होते.
इम्पिरिकल डेटाच्या अभावी सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या
ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती. या संदर्भातल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
****
राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण
आढळला नाही. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या तीन हजार ३३४ एवढी
झालेली असून, यापैकी दोन हजार
१३ रुग्ण संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ६ हजार ४३६ रुग्ण
आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख १० हजार १३६ झाली आहे.
काल २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या
संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार
९८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३
शतांश टक्के आहे. काल १८ हजार ४२३
रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७५ लाख ५७ हजार ३४ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले
असून, कोविड मुक्तीचा दर ९६ पूर्णांक ७६ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक लाख १८
हजार ७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ४८७
कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळले, तर सहा रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच तर लातूर
जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ८४ नवे रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात ९८, उस्मानाबाद ७७, लातूर ७५, नांदेड ६३, बीड ४१, परभणी ३६, तर जालना जिल्ह्यात १३ नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेण्याचं
प्रमाण ८२ टक्के झालं असून लसीच्या दोन्ही मात्रा घेण्याचं प्रमाण ४५ टक्के झालं आहे.
जिल्ह्यात पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या २८ लाख ११ हजार ४५३ झाली आहे. तर पंधरा
लाख ७२ हजार ५७६ जणांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे.
****
मराठवाड्यात वन क्षेत्र वाढवण्यासाठी गोदावरी, मांजरा आणि त्यांच्या
नऊ उपनद्या, अशा ११ नद्यांच्या किनाऱ्यावर गोमा खोरं पुनरुज्जीवन चळवळ उपक्रमातंर्गत
फिनिक्स फाउंडेशन संस्थेमार्फत, बांबू लागवड करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे
नेते पाशा पटेल यांनी ही माहिती दिली. ते काल औरंगाबाद इथल्या खाम नदी पुनरुज्जीवन
कार्यक्रमाची पाहणी केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. येत्या ११ जुलैला ११ नद्यांच्या
किनाऱ्यावर बांबू लागवडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात करण्याचा
प्रयत्न असल्याचं पटेल यांनी सांगितलं.
****
अनुसूचित समाजात उद्योजकता रुजवण्याच्या उद्देशानं स्वातंत्र्याच्या
अमृतमहोत्सवी वर्षात केंद्र सरकार एक अभिनव योजना राबवणार आहे. या योजनेमध्ये अभिनव
कल्पनांच्या आधारे उद्योग करू इच्छिणाऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं, दलित इंडियन
चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज- डिक्की चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे
यांनी सांगितलं. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनुसूचित जातीतील
उद्योजकांसाठी डॉ. आंबेडकर उद्योजक पुरस्कार, आणि डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्टार्टअप
स्पर्धेचं देशभरात आयोजन करण्यात आलं आहे. या नव्या योजनेमध्ये जास्तीत जास्त नवोदित
उद्योजकांनी आणि व्यवसायाभिमुख व्यक्तींनी सहभागी होण्याचं आवाहन डॉ कांबळे यांनी केलं.
ही स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे. इच्छुकांनी www.ayel.in या संकेतस्थळावर १५ फेब्रुवारीपर्यंत
नोंदणी करून आपली संकल्पना २०० शब्दात पाठवावी, असं आवाहन कांबळे यांनी केलं.
****
डॉ. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी काल दिल्लीतल्या जवाहरलाल
नेहरू विद्यापीठ - 'जेएनयू' च्या कुलगुरू
पदाची सूत्रे स्वीकारली. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
इथं राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागात कार्यरत होत्या. त्यांचा
कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. शांतीश्री जेएनयु च्या पहिल्या महिला
कुलगुरू ठरतील. मावळते कुलगुरू ममिडला जगदेश कुमार यांनी अधिकृत
प्रसिद्धी पत्राद्वारे ही घोषणा केली.
****
भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद- सी आय एस सी ईनं इयत्ता १० वी आणि १२
वीच्या २०२१- २२ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या प्रथम सत्र परीक्षांचे निकाल जाहीर
केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल सी आय एस सी ई डॉट ओ आर जी, या संकेत स्थळावर पाहू
शकतील किंवा, शून्य नऊ दोन चार आठ शून्य आठ दोन आठ आठ तीन, या दूरध्वनी क्रमांकावर
एसएमएस पाठवूनही निकाल बघता येईल.
****
राज्य सरकारच्या दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या
निर्णया विराधोत विद्यार्थ्यांनी काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. संपूर्ण वर्षभर
अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवण्यात आला, त्यामुळे दहावी बारावीच्या मुख्य परीक्षाही
ऑनलाईन झाल्या पाहिजेत अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं.
****
शेती व्यवसायात मनुष्यबळाचा अभाव आणि मर्यादा लक्षात घेता ड्रोनचा वापर करण
ही काळाची गरज झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यात १०० ड्रोन ‘कृषी सेवा केंद्र’ सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करण्याच्या
दृष्टीनं प्रशिक्षण केंद्र चालू करण्यात येणार असल्याची
माहिती तुळजापूरचे आमदार राणाजगजित
सिंह पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जाचक अटी रद्द करुन परभणीच्या
महापालिका प्रशासनानं तातडीनं पात्र नागरिकांना घरकुलाचा लाभ द्यावा या मागणीसाठी मनपा
सदस्य सुशील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयावर काल
मोर्चा काढला. नांदेड, परळी, वसमत आणि जिंतूर इथल्या स्थानिक प्रशासनानं नोटरीधारक
तसंच घरपट्टी आणि पीटीआर नक्कल असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला आहे, असं
मोर्चेकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं. महापालिका प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने
विचार न केल्यास प्रखर आंदोलन उभारलं जाईल, असा इशारा शिवसेनेचे आमदार राहूल पाटील
यांनी यावेळी दिला.
****
प्रवाशांच्या सुविधेसाठी दक्षिण मध्य रेल्वेने या पूर्वीच काही
आरक्षित गाड्यांमध्ये डब्बे अनारक्षित केले आहेत. त्यात आणखी दोन रेल्वे गाड्यांचा
समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार मनमाड हून सिकंदराबाद कडे जाणाऱ्या अजंता एक्सप्रेसमधले
२ तर आणि मनमाड हून धर्माबाद कडे जाणाऱ्या रेल्वेगाडीतले ८ डबे अनारक्षित केले जाणार
आहेत.
****
No comments:
Post a Comment