Friday, 31 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 31.03.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यातल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातल्या वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून एक किलोमीटरपेक्षा अधिक तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून तीन किलोमीटर आणि नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून पाच किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असल्यास त्या विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार आहे.

***

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं ११ अत्याधुनिक समुद्री टेहळणी जहाजं आणि सहा क्षेपणास्त्र वाहक जहाजांसाठी भारतीय शिपयार्ड सोबत १९ हजार ६०० कोटी रुपयांचा करार केला आहे. या जहाजांमुळे भारतीय नौदलाची लढाऊ क्षमता मजबुत होईल, तसंच भारतीय जहाजबांधणीला आणि संबंधित लघु, मध्यम उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.  

***

जी- 20 देशांच्या व्यापार आणि गुंतवणूकविषयक तीन दिवसीय परिषदेचा काल मुंबईत केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत समारोप झाला. शाश्वत विकासाचं उद्दीष्ट गाठताना जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याबाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली.   

***

देशातली एक हजार शहरं ऑक्टोबर २०२४ पर्यंत कचरामुक्त करण्याचं उद्दीष्ट असल्याचं गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस २०२३ निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. देशात चार हजार ७१५ शहरं उघड्यावर शौचापासून मुक्त झाले असून, देशात कचरा प्रक्रिया होण्याचं प्रमाण आता ७५ टक्के झालं असल्याची माहिती पुरी यांनी दिली.

***

माद्रीद मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांतनं उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात सिंधूनं इंडोनेशियाच्या कुसुमा वारदानीचा २१ - १४, २१ - १६ असा पराभव केला, तर श्रीकांतनं भारताच्याच बी साई प्रणितला २१ - १५, २१ - १२ असं हरवलं.

//***********//

No comments: