Friday, 2 June 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.06.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 June 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ जून २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      दहावी परीक्षेचा निकाल जाहीर; ९३ पूर्णांक ८३ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण.

·      शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात प्रतापगड प्राधिकरण स्थापनेची मुख्यमंत्र्यांची घोषणा.

·      औरंगाबाद इथले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रभान पारखे यांचं राहत्या घरी निधन.

आणि

·      बनावट चलनी नोटा बाळगणारे तिघे यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात.

****

राज्यात इयत्ता दहावीचा निकाल ९३ पूर्णांक ८३ टक्के इतका लागला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर तपशीलवार निकाल पाहता येईल. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९८ पूर्णांक ११ टक्के, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९२ पूर्णांक पाच टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागात ९३ पूर्णांक २३ टक्के, तर लातूर विभागात ९२ पूर्णांक ६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोल्हापूर विभागात ९६ पूर्णांक ७३ टक्के, पुणे ९५ पूर्णांक ६४ टक्के, मुंबई ९३ पूर्णांक ६६ टक्के, अमरावती ९३ पूर्णांक २२ टक्के, तर नाशिक विभागात ९२ पूर्णांक २२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. ९५ पूर्णांक ८७ टक्के मुली पास झाल्या आहेत, तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक शून्य पाच टक्के इतकं आहे. राज्यातल्या दहा हजार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असल्याचं, मंडळानं सांगितलं.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्याने तयारी करावी आणि त्यासाठी फेर परीक्षेच्या पर्यायाचा अवलंब करावा, असं आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.

****

रायगड प्राधिकरणाच्या धर्तीवर प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. किल्ले रायगडावर ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते आज बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. ते म्हणाले –

शिवछत्रपतींसाठी गडकोट किल्ले हे जीव की प्राण होते. आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या गडकोट किल्ल्याचं जतन आणि संवर्धनाला प्राधान्य देतोय. एक दूर्ग प्राधीकरण देखील आपलं सरकार करतय आणि उदयनराजेंची जी मागणी आहे की प्रतापगड प्राधीकरण करावं हे मी आज याठिकाणी जाहीर करतो. आणि प्रतापगड प्राधीकरणाचे अध्यक्ष म्हणून उदयनराजे भोसले यांनी काम पहावं असंही याठिकाणी सांगू इच्छितो.

 

रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची, तसंच मुंबईतल्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी आज केली. शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला संपन्न महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करुया, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी, शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्यासह मंत्रिमंडळातले इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शिवाजी महाराजांचा ३५०वा राज्याभिषेक दिन नवीन चेतना घेऊन आल्याचं ते म्हणाले. राष्ट्र कल्याण, लोककल्याण हे शिवरायांच्या शासन व्यवस्थेचं मूळ तत्त्व होतं, ते शौर्य आणि सुशासन दोन्हीमध्ये पारंगत होते, अशा शब्दात पंतप्रधानांनी शिवरायांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शिवाजी महाराजांनी आपल्याला राष्ट्रनिर्माणाची दिशा दाखवली, असं ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना, शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत झालं पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं. शिवाजी महाराजांनी जलसंवर्धन आणि वनसंरक्षणाचे दिलेले धडे आजही राज्य कारभार करताना उपयोगी पडतात, त्यांनी दिलेल्या शिकवणुकीच्या आधारेच स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करत असल्याचं, फडणवीस म्हणाले.

तत्पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचं उद्घाटन झालं. शिवाजी महाराजांच्या चांदीच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते जलाभिषेक करून पूजन करण्यात आलं, पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. जाणत्या राजाला अभिवादन करण्यासाठी किल्ले रायगडावर शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.

****

आपलं वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी शिवरायांचा इतिहास मोलाचा असल्याचं, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं शिवराज्याभिषेक मंगल कलश दर्शन यात्रेत ते बोलत होते. मध्यप्रदेश सरकारचे उद्योगमंत्री राजवर्धन सिंह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कलशाचं दर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

****

आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती जाणून घेणं गरजेचं असल्याचं मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते आज प्रसार माध्यमांशी बोलत होते. स्थानिक पातळीवर निवडणुकीत समन्वय राहणे महत्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जागा वाटपावरून महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही, असंही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं. निवडणुकीत स्थानिक पातळीवर समन्वय राहणे महत्वाचे आहे. चर्चेअंती मविआचा जो उमेदवार ठरेल त्याला निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी साडेदहा वाजता दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून मुंबई ते गोवा या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करणार आहे. या रेल्वेमुळे साडेसात तासात मुंबई ते गोवा हे अंतर पार करता येणार आहे.

****

औरंगाबाद इथले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रभान पारखे यांचं आज राहत्या घरी निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या पारखे यांना काँग्रेस पक्षाने २००९ च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पश्र्चिम विधानसभा मतदार संघातून मध्ये उमेदवारी दिली होती. प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी म्हणूनही पारखे यांनी जबाबदारी सांभाळली होती.

त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

यवतमाळ पोलिसांनी बनावट चलनी नोटा बाळगणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं आहे. या आरोपींकडून ५०० रुपये दर्शनी मूल्याच्या ९६४ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मारवाडी फाटा इथं नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली असता, एका व्यक्तीकडून या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. विशाल पवार असं त्याचं नाव असून, चौकशी दरम्यान त्याच्या कडून मिळालेल्या माहितीवरून बीड इथून विनोद राठोड आणि बालू कांबळे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर-घुगे यांनी ही माहिती दिली. यानिमित्त आयोजित वृक्ष लागवड मोहिमेत गावातल्या प्रत्येक व्यक्तीने हर घर नर्सरी उपक्रमातून तयार करण्यात आलेल्या रोपांची, उपलब्ध मोकळ्या जागेत, लागवड करावी असं आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय शासकीय कार्यालय परिसरात मियावाकी पद्‌धतीनं लावण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीचे तालुकास्तरावरील सर्व कार्यालय प्रमुखांनी नियोजन करावे तसंच या मोहिमेत लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक-युवती, अधिकारी आणि कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही वृक्ष लागवडीची मोहीम यशस्वी करण्याचं आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.

****

आषाढीवारी निमित्त पंढरपूर इथं वास्तव्यासाठी आलेल्या नवीन व्यक्ती तसंच त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती घरमालक, मशीद, चर्च, धर्मशाळा इत्यादींचे विश्वस्त यांनी लगेच संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी दिले आहे. भविष्यात होणाऱ्या दहशतवादी कारवायांना यामुळे आळा बसून सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहण्यास मदत होणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, यंदाच्या आषाढी वारीत माउलींच्या पालखी सोहळ्यात प्रत्यक्ष प्रस्थानाच्या दिवशी प्रत्येक दिंडीतील मोजक्या ७५ वारकऱ्यांना आणि पालखीला खांदा देणाऱ्या केवळ ५० आळंदीकरांनाच प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख विधिज्ञ विकास ढगे यांनी दिली. अनावश्यक गर्दी आणि चेंगराचेंगरीसारखे प्रसंग टाळण्यासाठी आळंदी देवस्थान, वारकरी, ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

No comments: