Friday, 2 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 02.06.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 June 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जून २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      शिराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, शासनातर्फे आज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन

·      गेल्या नऊ वर्षांत देशात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाला प्राधान्य देत जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याचा केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांचा दावा

·      पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना पथकर माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाच्या धोरणाबाबतचा शासन निर्णय जारी

·      व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ८३ रुपये ५० पैशांनी कपात

·      राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार

·      बीड  जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

·      विद्युतीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर नांदेड ते मुंबई वंदे भारत रेल्वे सुरु करण्याची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा 

आणि

·      पुरुष कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेचं भारताला विजेतेपद

****

शिराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, शासनातर्फे रायगडावर आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याचं, आज सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होआहे. या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्रीकिन रेड्डी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावं, प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं विशेष बोधचिन्हांचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी हे बोधचिन्ह वापरण्यात येणार आहे. शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणारे संदर्भ या बोध चिन्हाचं वैशिष्ट्य असून, राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे सुनील कदम यांनी ते तयार केलं आहे.

दरम्यान, ३५०व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, त्याचा प्रारंभ काल मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी जगभरात असलेलं शिवकालीन साहित्य आणि वस्तूंचं सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संकलन करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.

****

भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. गेल्या नऊ वर्षांत देशात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाला प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण आणि निर्णायक निर्णय घेतले आहेत, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी म्हटल आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं, देशभरात, महा-जनसंपर्क अभियान राबवलं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून, केंद्रीय मंत्री ठाकूर, काल एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले....

‘‘मुझे कहते हुये प्रसन्नता है की नौ वर्षों मे स्थिर सरकार देश के लोगों ने पूर्ण बहुमत की सरकार मोदीजी की दी। निर्णायक सरकार बनी। बडे और कडे निर्णय भी लिये जो राष्ट्रहीत मे थे। और राष्ट्र का लगातार बढते कदम आज दुनिया मे दिखते है। और नौ वर्ष के पूर्ण होने पर हम जनता का आभार प्रकट करते है। और विश्वास दिलाते है की भ्रष्टाचार मुक्त शासन जो नौ सालों मे दिया है, वो आगे भी जारी रहेगा।’’

ठाकुर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. प्रत्येक विदेश दौऱ्यात राहुल गांधी भारताची बदनामी करतात, सैन्य दल चीनबरोबर संघर्ष करत असताना चीनी अधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करतात, असा आरोप ठाकुर यांनी केला.

केंद्र सरकारनं नऊ वर्षात खेळ आणि खेळाडूंसाठी केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या आतापर्यंतच्या सगळ्या मागण्या केंद्र सरकारनं पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या मागणीनुसार प्रथम माहिती अहवाल -  एफआयआर दाखल झाला असून, तपास सुरू आहे. हा तपास निष्पक्ष होईल आणि त्यानंतर आरोपपत्र दाखल होईल, तोपर्यंत कुस्तीपटूंनी वाट पहावी, असं ठाकुर यांनी सांगितलं. ही सर्व कायदेशीर प्रक्रीया असून कायदा सर्वांसाठी समान असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना पथकर माफ करण्यात येईल, अशी घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वारीच्या अनुषंगानं काल मुंबईत तयारीचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. पालखी मार्गावरील पथकर नाके सुरु होणार नाहीत, त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून, त्यांना याबाबत कल्पना दिल्याची माहितीही, मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते, त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

या वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही, अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत पाच वरून दहा कोटींची, आणि ग्रामपंचायतींकरता पंचवीस वरून पन्नास लाख रुपयांची, अशी दुप्पट तरतूद केली आहे. याशिवाय रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे. त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घेण्याचे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले.

दरम्यान, जी-20 परिषदेचं प्रतिनिधी मंडळ आषाढी वारीचा अनुभव घेणार आहे. त्यांना पंढरपुरची वारी आणि त्या अनुषंगानं या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आलं असून, हे मंडळ वारीच्या काळात पुण्यात येणार आहे.

****

पंढरपूर इथल्या आषाढी वारीसाठी नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथून श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीनं तीस लाख रुपये मंजूर केले असून, वारीच्या दरम्यान विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं, नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितलं.

****

आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या, विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना, स्वच्छता- सोयीसुविधा पुरण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून, २१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. या निधीतून तात्पुरते शौचालय, निवारा आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचं धोरण राज्य सरकारनं काल जाहीर केलं. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला.

मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था अंतर्गत येणाऱ्या इमारतींचा पुनर्विकास सुसाध्य आणि व्यवहार्य होण्यासाठी, अशा संस्थांमध्ये मूळ सभासदांच्या बाबतीत ९० टक्के मागासवर्गीय आणि १० टक्के अमागासवर्गीय, हे प्रमाण जैसे थे ठेवून, पुनर्विकासानंतर त्या जागेवर ज्या अतिरिक्त सदनिका तयार होतील, त्यामध्ये मागासवर्गीयांचं प्रमाण २० टक्के आणि अमागासवर्गीयांचं प्रमाण ८० टक्के राहील. कोणत्याही परिस्थितीत या प्रमाणात बदल होणार नाही, असं या शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतल्या वर्षा यानिवासस्थानी भेट घेतली. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र चर्चेचा तपशील कळू शकला नाही. या भेटीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं ट्विट संदेशाद्वारे सांगितलं.

दरम्यान, उद्योजक गौतम अदानी यांनी काल शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट पूर्वनियोजित होती, चर्चेचा तपशील मात्र कळू शकला नाही.

****

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची आज आणि उद्या मुंबईत एक बैठक होत आहे. या बैठकीत राज्यातल्या लोकसभा मतदारांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला राज्यातले प्रमुख नेते आणि सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

****

व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत काल ८३ रुपये ५० पैशांनी कपात करण्यात आली. १९ किलो वजनाच्या या सिलिंडरची किंमत आता दिल्लीत एक हजार ७७३ रुपये, तर मुंबईत एक हजार ७२५ रुपये असेल. गेल्या महिन्यात व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात १७१ रुपये ५० पैशांनी  कपात करण्यात आली होती.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची आकडेवारी ऑनलाईन पाहता येईल आणि तिची प्रत छापून घेता येईल. गुण पडताळणीसाठी १२ जूनपर्यंत तर उत्तपत्रिकेची छायाप्रत हवी असल्यास २२ जूनपर्यंत अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका शाळेतून १४ जून रोजी दुपारी ३ वाजता वितरित केल्या जातील.

****

राज्यातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे खेळाडूंसोबत राष्ट्रवादी' हे अभियान राबवलं जाणार असल्याची माहीती, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. यामध्ये पदाधिकाऱ्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय आपापल्या भागातल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवर सहभाग नोंदवलेल्या सर्व खेळाडूंची एकत्रित बैठक घेण्याची सूचना, पाटील यांनी केली. येत्या आठ जून पूर्वी ही बैठक घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दिल्लीत झालेल्या घटनेबद्दल देशातल्या खेळाडूंचं मनोधैर्य खचलं आहे, ते वाढवण्यासाठी काम करायचं असल्याचं, पाटील यांनी सांगितलं.

****

शासकीय नोकरीत महिला आरक्षित पदावर महिला उमेदवारांचीच नियुक्ती करण्याचा लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंबईत महिला आरक्षणासंदर्भात आयोजित एका बैठकीत ते काल बोलत होते. महिला आणि बालविकास विभागाकडून महिलांच्या आरक्षित पदावर महिला उमेदवार न मिळाल्यास पुरुष उमेदवारांची भरती करण्यात ये नये, याबाबत मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येईल, तसंच शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार विभागानं ही कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

****

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या बीड  जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काल बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पंकजा मुंडेंसह बिनविरोध निवडून आलेल्या २१ संचालकांची नावं जाहीर केली. राजकारण न आणता कारखान्याचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे चांगला आणि सकारात्मक पायंडा यातून पडेल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

****

नांदेड रेल्वे स्थानकापर्यंत विद्युतीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर नांदेड ते मुंबई वंदे भारत रेल्वे सुरु करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. जालना इथल्या संभाजी महाराज उद्यानात १५० फूट उंचीचा राष्ट्रध्वज आणि रेल्वे इंजिन बसवण्याच्या कामाचं भूमिपूजन काल दानवे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या जवळपास एक हजार २५० रेल्वे स्थानकांचा टप्प्याटप्प्यानं विकास करण्यात येणार असून, यात राज्यातल्या मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकांचा समावेश असल्याचं दानवे यांनी सांगितलं.

****

भारतानं पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. ओमानमधल्या सलालाह इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा दोन - एक असा पराभव केला. या स्पर्धेचं भारतानं चौथ्यांदा चिजेतेपद पटकावलं असून, या स्पर्धेत भारत सर्वात यशस्वी देश ठरला आहे.

****

शिवसेनेच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्तानं ठाकरे गटाच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं आता जिंकेपर्यंत लढायचं" ही संपर्क मोहिम राबवण्यात येत आहे. २५ जूनपर्यंत जिल्हाभरात ही मोहिम सुरु रहील, असं जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. यानिमित्त शहराचं ग्रामदैवत संस्थान गणपती इथं काल सकाळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी महाआरती केली.

****

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यात अनियमितता आढळून आलेल्या दहा कृषि सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, तीन कृषी सेवा केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे. तपासणीमध्ये जादा दराने खताची विक्री करणं, ई-पॉस मशीन प्रमाणे साठा न जुळणं, परवान्यात समाविष्ट स्त्रोताव्यतिरिक्त इतर निविष्ठाची खरेदी विक्री करणं, साठा रजिस्टरला नोंद नसणं, शेतक-यांना विहीत नमुन्यात पावती न देणं, आदी कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. शेतक-यांनी अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी, असं आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान -उमेदच्या माध्यमातून सेंद्रीय शेती कार्यक्रमाअंतर्गत, उस्मानाबाद, तुळजापूर आणि लोहारा तालुक्यातल्या १५ गावातल्या साडे तीनशे महिला शेतकरी, सेंद्रिय शेती उत्पादक झाल्या असल्याचं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितलं. उमेदच्या माध्यमातून २०२० ते २०२२ या कालावधीत, सेंद्रिय शेती प्रकल्प राबण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांना या माध्यमातून ज्वारीसारखे सेंद्रिय तृणधान्य आणि मूग, उडीद, तूर आदी कडधान्य उत्पादन प्राप्त होणार आहेत, असं जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितलं.

****

किमतीपेक्षा जादा दराने खतं आणि बियाण्यांची विक्री करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथल्या कृषी केंद्राचा परवाना काल निलंबित करण्यात आला. गेल्या ३१ मे रोजी सोयाबीन खरेदीत अशी फसवणूक झाल्याची तक्रार, एका शेतकऱ्यानं कृषी विभागाकडे केली होती. याबाबतचा सविस्तर अहवाल तालुका कृषी अधिकाऱ्याकडून प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याचा साठा करणाऱ्या गोडावूनवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल छापा टाकला. चिखली इथल्या गोडावून मध्ये हा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी सव्वा कोटी रुपये किमतीचे बियाणे जप्त करण्यात आले.

****

No comments: