Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 21 June 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २१ जून
२०२३ दुपारी १.०० वा.
****
नववा आंतरराष्ट्रीय
योग दिवस सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत न्यूयॉर्क
इथल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमाचं नेतृत्व करणार
आहेत. भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होईल. वसुधैव कुटुंबकम
या उद्देशासाठी योग, ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे.
दरम्यान,
पंतप्रधानांनी अमेरिका दौर्याच्या पहिल्या दिवशी विविध मान्यवरांची भेट घेतली. सांख्यिकीशास्त्रज्ञ
प्राध्यापक नसीम निकोलास, बौद्ध धर्माचे तज्ञ आणि लेखक पद्मश्री बॉब थर्मन, गुंतवणूकदार
रे डालिओ, टेस्लाचे सहसंस्थापक एलॉन मस्क, यांच्यासह कृषी, अभियांत्रिकी, आरोग्य, विज्ञान
आणि तंत्रज्ञान विषयातल्या अमेरिकेतल्या तज्ञांशीही पंतप्रधानांनी चर्चा केली.
वॉशिंग्टनमधल्या
व्हाईट हाऊसमध्ये उद्या पंतप्रधान मोदी यांचं औपचारिक स्वागत होईल आणि राष्ट्राध्यक्ष
ज्यो बायडन यांच्यासोबत ते उच्चस्तरीय चर्चा करतील. या दौऱ्यात ते अमेरिकी काँग्रेसच्या
संयुक्त बैठकीलाही संबोधित करणार आहेत.
****
देशात योग
दिनाचा मुख्य कार्यक्रम मध्य प्रदेशात जबलपूर इथं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या
उपस्थितीत पार पडला. केंद्रीय आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल, मध्यप्रदेशचे राज्यपाल
मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, यांच्यासह अनेक मान्यवर तसंच नागरिक मोठ्या
संख्येनं यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांचा संदेश प्रसारित करण्यात आला. भारताची संस्कृती, सामाजिक रचना, अध्यात्म आणि आदर्श
यांनी नेहमीच एकत्र येणा-या, अंगीकारणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या परंपरांचं पालनपोषण केलं
असल्याचं पंतप्रधान म्हणाले. उत्स्फूर्तपणे या अनोख्या सोहळ्यात देशभरात आणि जगभरातून
कोट्यवधी लोकांचा सहभाग, योगाची विशालता आणि कीर्ती दर्शवतो, असं त्यांनी नमूद केलं.
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात योग दिन साजरा करण्यात आला.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमत्त संयुक्त राष्ट्र संघामध्ये देशाचं प्रतिनिधित्व
करत आहेत, ही देशासाठी गौरवाची बाब असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं
आहे. मुंबईत विधानभवनात योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. योग दिनानिमित्त
संपूर्ण राज्यामध्ये ३५ लाख लोकांना एकाच वेळेस योगा करण्याचं नियोजन करण्यात आल्याचं
त्यांनी सांगितलं.
राज्यपाल
रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह
विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगायचं असेल, तर योगाला
आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवलं पाहिजे, असं राज्यपाल यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी
मुख्यमंत्री केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या समवेत गेट वे ऑफ इंडिया इथं
योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
औरंगाबाद
इथं भारतीय योग संस्थान, केंद्रीय संचार ब्यूरो आणि योग संवर्धन संस्थेच्या वतीनं योग
प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
डॉ. भागवत
कराड, सहकार मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित होते.
हिंगोली
इथल्या संत नामदेव कवायत मैदानावर योग दिवस साजरा करण्यात आला. नागरीक मोठ्या संख्येनं
यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातल्या विविध भागात, शाळा, महाविद्यालयांमध्ये योगाभ्यास
करण्यात आला.
उस्मानाबाद
इथं भाजप, पतंजली योग समिती तसंच विविध सामाजिक संस्था संघटना आणि शालेय विद्यार्थ्यांनी
एकत्र येऊन योग साधना केली.
****
पुण्यात
जी - 20च्या शिक्षण कार्यगटाच्या बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी देखील योग दिनाच्या
कार्यक्रमात सहभाग घेतला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे उच्च
आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
****
आषाढी एकादशीच्या
पार्श्वभुमीवर भीमा नदीत उजनी धरणातून आज पाणी सोडण्यात आलं. एक हजार ५०० घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाणी सोडण्यात येत असून, त्यात टप्प्याटप्प्यानं वाढ केली जाईल. २४ तारखेला
हे पाणी पंढरपूरला पोहचेल, असं नियोजन करण्यात आलं आहे.
****
आगामी लोकसभा
सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं एक जानेवारी २०२४ या अर्हता
दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी, मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी, विशेष
संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये पूर्व-पुनरीक्षण उपक्रम आणि
पुनरीक्षण उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत
देशपांडे यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली.
****
मराठवाड्यात
येत्या २३ आणि २४ तारखेला अनेक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह
हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं
वर्तवला आहे. येत्या तेवीस ते एकोणतीस जून या कालावधीत मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त
पाऊस होईल, असा अंदाजही या केंद्रानं वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment