Thursday, 22 June 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.06.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 June 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ जून २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांच्या कार्यकाळात सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

·      बँक, टपाल सेवा आता शिधा वाटप, रास्त भाव दुकानांत उपलब्ध होणार- अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती.

·      भारत आणि अमेरिकेदरम्यान आज द्विपक्षीय चर्चा.

आणि

·      नैऋत्य मोसमी पाऊस आठवडाभरात राज्यभर सक्रीय होण्याची शक्यता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज सातारा जिल्ह्यातल्या कराड इथं मोदी यांच्या कार्यकाळाला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उपक्रम झाला, त्यावेळी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले –

ही नऊ वर्षं भारताच्या परिवर्तनाची आहेत. भारताच्या विकासाची आहेत. आंतरराष्ट्रीय पटलावर भारताला सन्मान देणारी आहेत. भारताच्या सीमा सुरक्षित करणारी आहेत. समाजातल्या शेवटच्या माणसाच्या हिताच्या योजना राबवून भारताच्या विकासाच्या गाथेला वेगानं पुढे नेणारी अशा प्रकारची ही नऊ वर्ष आहेत.

****

सर्व राष्ट्रीय आणि खाजगी बँका तसंच टपालामार्फत दिल्या जाणाऱ्या नागरी सेवा आता राज्यातल्या सर्व शिधावाटप-रास्त भाव दुकांनामधून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यामध्ये सुमारे ५० हजार शिधावाटप आणि रास्त भाव दुकानं असून त्यांचा फायदा शहरासह ग्रामीण भागातल्या जनतेला होणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी, सुविधा आणि समन्वयासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचं चव्हाण म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम वाणी या उपक्रमाच्या माध्यमातून शिधावाटप दुकानांमध्ये ‘पीएम-वाणी’ संच बसवण्यात येणार असून या माध्यमातून त्या दुकानांच्या परिसरातल्या जनतेला ‘वाय-फाय’ सुविधेचा फायदा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

शिक्षण म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया असून शिक्षण हे भविष्यातल्या मानवी संस्कृतीचं शिल्पकार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी पुण्यात आयोजित जी-20 देशांच्या शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीमध्ये आज दूरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं, त्यावेळी मोदी बोलत होते. किमान अंक आणि अक्षर ओळख प्रसाराला देशानं प्राधान्य दिलं असून संघटनेतल्या इतर देशांनीही त्याचं महत्त्व मान्य केलं आहे. या उद्दिष्टासाठी कालबद्ध रीतीनं येत्या २०३० पर्यंत काम करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. ई-लर्निंग सारख्या आधुनिक तंत्राचा वापर शिक्षण प्रसारसाठी केला पाहिजे असं सांगून पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भात शासकीय उपक्रम ‘स्वयंम’ चा उल्लेख केला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आज अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी म्हणजेच व्हाईट हाऊसमधे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. अमेरिका दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्या सोबत द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर अमेरिकन संसदेच्या दोन्हा सभागृहांच्या संयुक्त बैठकीला ते मार्गदर्शन करतील. आज संध्याकाळी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ स्नेह भोजन ठेवण्यात आलं आहे. त्यावेळी ते अमेरिकेतले लोकप्रतिनिधी, मुत्सद्दी आणि इतर मान्यवरांशी अनौपचारिक चर्चा करतील. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी काल जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांनी सहभोजन ठेवलं होतं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत या वर्षाचे राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार वितरीत करण्यात आले. राष्ट्रपती भवनात हा सोहळा झाला. आरोग्य क्षेत्रात सर्वोत्कृष्ट सेवा देणाऱ्या परिचारीकांना या पुरस्कारांनी यावेळी सन्मानित करण्यात आलं. पन्नास हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात कार्यरत पुष्पा शर्वण पोडे यांना तसंच आदिवासी आणि नक्षली क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल आणि पुण्याच्या ब्रिगेडियर अमिता देवराणी यांना यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.

****

मुंबई महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त आणि सनदी अधिकारी यांना अंमलबजावणी संचालनालयानं आज चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड केंद्रात घोटाळा केल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयानं काल या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संबंधित १५ ठिकाणांवर छापे टाकले तसंच संबंधित अधिकाऱ्यांच्या घराचीही झडती घेतली आहे.

****

राज्यावर पाच लाख कोटी रुपयांचा कर्ज असून शिंदे - फडणवीस सरकार हे फक्त जाहिरातींवर सुमारे पाचशे कोटी रुपयांचा खर्च करत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते आज हिंगोली इथं पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. सध्याचं सरकार हे शेतकरी विरोधी असून मराठवाड्याची अवस्था अतिशय बिकट झाली असल्याची टीका त्यांनी केली. आता राज्याची विस्कटलेली घडी बसवणे मतदारांच्या हाती असल्याचं चव्हाण म्हणाले.

****

येत्या आठवड्यात नैऋत्य मोसमी पाऊस राज्यभर सक्रीय होईल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या महिनाभराच्या अंदाजानुसार पूर्ण राज्यभर चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात उद्या आणि परवा अनेक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

बीड जिल्ह्यात माजलगाव प्रकल्पात वीस पूर्णाक ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे. जिल्ह्यात एकूण सोळा मध्यम प्रकल्पांत वीस पूर्णांक दोन टक्के पाणीसाठा आणि एकूण २० लघू प्रकल्पात ४७ पूर्णांक २२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचं विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

लांबलेल्या मान्सुनमुळे पेरण्या लांबल्या आहेत. धुळे तालुक्यातल्या जुन्नेर, लळींग, दिवाणमळा, मोरशिवडी आदी गावांमध्ये पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे आणि उकाडा देखील जाणवत आहे. मात्र पाऊस येत नसल्यानं लोक चिंता व्यक्त करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, भंडारा जिल्ह्यात आज सर्वत्र पावसाला सुरुवात झाली.

****

गाईच्या दुधाला ४० रुपये तर म्हशीच्या दुधाला साठ रुपये भाववाढ द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली आहे. सरकारनं दुध धोरण जाहीर करावं अशी मागणीही पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी आज सोलापूर इथं पत्रकार परिषदेत केली. हा निर्णय घेवूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी पुजेला यावं अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

****

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी राहुल हंडोरेला अटक केली आहे. हंडोरे या दर्शना पवार हिच्या हत्येच्या दिवसापासून फरार होता. तो मुंबईहून पुण्याला जात असताना त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत दिली.

****

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या आदिलाबाद - पंढरपूर आणि पंढरपूर - औरंगाबाद या विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आदिलाबाद -पंढरपूर ही रेल्वे गाडी येत्या २८ जूनला सकाळी ११ वाजता सुटणार आहे. तर पंढरपूर - औरंगाबाद ही रेल्वे गाडी २९ जूनला रात्री ११ वाजता सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात लामजना इथल्या शासकीय निवासी शाळेच्या बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. या बांधकामात वापरण्यात आलेलं बांधकाम साहित्य तसंच इतर साहित्य निकृष्ठ दर्जाचं असल्याचं त्यांना काल पाहणी दरम्यान आढळलं होतं, त्यानुसार त्यांनी हे आदेश दिले आहेत. अनुसूचित समाजातील मुलांसाठी बांधण्यात येणाऱ्या या वसतीगृहासाठी विभागानं बारा कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

****

बीड जिल्ह्यात शिरुर कासार पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत पोलीस हवालदाराला पाच हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. शिवाजी सानप असं या हवालदाराचं नाव आहे. त्यानं तक्रारदाराकडे पोलीस कारवाईत जामीन मिळवण्यास मदत करण्याकरता दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.

****

ताइपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीत तृतीय मानांकित भारताच्या एच. एस. प्रणॉय यानं उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं आज उप उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या टोमी सुगियार्तोवर २१-९, २१-१७ अशी सहज मात केली. त्या आधी उपउपांत्यपूर्व फेरीच्या अन्य एका सामन्यात पी. कश्यपला चीन ताईपेईच्या एल. वाय. सूकडून १६-२१, १७-२१ असा पराभव सहन करावा लागला.

****

No comments: