Thursday, 22 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 22.06.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 22 June 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २२ जून  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      योग ही जीवन पद्धती अंगिकारली तर जगात शांतता नांदेल;नवव्या जागतिक योग दिनी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

·      देशभरात योग दिवस उत्साहात साजरा;राज्यात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत योग केंद्र सुरू करण्याची घोषणा

·      राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचा निर्णय

·      आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू

·      मुबलक पावसाशिवाय शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या करू नये-कृषी आयुक्तांचं आवाहन

·      ऑनलाईन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी औरंगाबाद पोलिसांकडून सहा जणांना अटक

आणि

·      दक्षिण आशियाई सॅफ फुटबॉल स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी

सविस्तर बातम्या

योग ही जीवन पद्धती अंगिकारली तर जगात शांतता नांदेल, असं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अमेरिकेत न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयाच्या प्रांगणात, योगाभ्यासादरम्यान पंतप्रधान बोलत होते. योग ही भारताची प्राचीन संस्कृती असून, तिचा जगभर प्रसार व्हावा, या उद्देशानं नऊ वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाला जागतिक योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव भारतानं मांडला होता. त्यांनी या प्रस्तावाला मान्यता देत २१ जून हा दिवस जागतिक योगदिवस म्हणून जाहीर केला. त्यानंतर सलग नऊ वर्षे हा दिवस संपूर्ण जगामध्ये उत्साहात साजरा केला जात असल्याचा आनंद वाटतो, असं पंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमात १३५ देशांतले प्रतिनिधी सहभागी झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येनं इतक्या देशातल्या नागरिकांनी एकाच ठिकाणी योगाभ्यास केल्याची घटना विक्रमी ठरली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने या विक्रमाची नोंद घेतली आहे.

****

भारतात योग दिनाचा मुख्य कार्यक्रम मध्य प्रदेशात जबलपूर इथं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात योग दिन साजरा केला.

मुंबईत राजभवनातही राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत योगाभ्यास करण्यात आला. योग ही भारताची जगाला भेट असून या वारशाचं जतन करण्याची तसंच जगात योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याची सामुहिक जबाबदारी भारतीयांवर आहे, असं राज्यपाल म्हणाले. विधानभवनात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते.

****

राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय, आयुष, आयुर्वेद, योग, युनानी, सिध्द आणि होमिओपॅथी, या चिकित्सापद्धतींचा अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांत, योग केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत वरळी इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या योगकेंद्रांमुळे रुग्णालयातले डॉक्टर, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना नियमित योगाभ्यास करता येईल, त्यासाठी तज्ज्ञ योग प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचंही महाजन यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद इथं भारतीय योग संस्थान, केंद्रीय संचार ब्यूरो आणि योग संवर्धन संस्थेच्या वतीनं योग प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद इथं बालगृहातल्या बालकांसोबत योगाभ्यास केला. बालोन्नती फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह विविध सामाजिक संस्थासह, शालेय विद्यार्थी, युवक तसंच शहरातले नागरिक मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते.

हिंगोली इथल्या संत नामदेव कवायत मैदानावर योग दिवस साजरा करण्यात आला. जिल्ह्यातल्या विविध भागात, शाळा, महाविद्यालयांमध्ये योगाभ्यास करण्यात आला.

उस्मानाबाद इथं भाजप, पतंजली योग समिती तसंच विविध सामाजिक संस्था संघटना आणि शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन योग साधना केली.

जालना शहरातही जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर आणि जेईएस महाविद्यालयात योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं.

परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी योगसत्रात सहभाग घेतला. योगाचा वारसा जतन करण्‍यासाठी योग दिन मोठया प्रमाणावर साजरा करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

बीड इथं जिल्हा न्यायालय परिसरात प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या, तर चंपावती क्रीडा मंडळ इथं जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत योग प्रात्यक्षिकं करण्यात आली.

अंबाजोगाई इथं खोलेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात योग शिबीर घेण्यात आलं. शालेय समितीचे अध्यक्ष डॉ अतुल देशपांडे यांनी या शिबीराच्या समारोप सत्रात मार्गदर्शन करताना, आरोग्यसंपन्नतेसाठी सर्वांनी योगासनं आणि प्राणायाम करण्याचं आवाहन केलं.

****

राष्ट्रीय कैडेट कोर- एन सी सी नं नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ११ लाखांपेक्षा जास्त कॅडेटनी यात सहभाग घेतला होता.

****

पुण्यात जी - 20 च्या शिक्षण कार्यगटाच्या बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी देखील योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.

****

शाळकरी आणि महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास विभाग तसंच राज्यातली सर्व विद्यापीठं आणि स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्यानं, गुरूपौर्णिमाचं औचित्य साधून, येत्या तीन ते १५ जुलै दरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यात तीन लाख ५० हजार शाळकरी आणि महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

****

आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी, विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस पाच लाख रुपये अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचं अपंगत्व आल्यास एक लाख रुपये, अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये, तसंच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून, मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबवण्यात येईल.

****

आषाढी एकादशी निमित्त येत्या २८ जून रोजी विविध साधु संताच्या पालख्यांचं पंढरपूर आणि परिसरात आगमन होणार आहे. २९ जून रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा होणार आहे. तर चार जुलै रोजी महाद्वार काला होऊन आषाढी वारीची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वारकऱ्यांसाठी विविध सेवा सुविधाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला भाविकांसाठी जवळपास तीन हजार ठिकाणी स्नानगृहं उभारण्यात आली असून, साडे आठ हजार ठिकाणी शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. २१ आपत्ती व्यवस्थापन केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. पाणी पुरवठ्यासाठी ४९ टँकर्स आणि त्यामध्ये पाणी भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. औषधोपचार केंद्र, गॅस वितरण व्यवस्था, तसंच सुरक्षेबाबत नियोजन करण्यात आलं आहे.

****

गेल्या वर्षी अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी २६ लाख ५० हजार ९५१ शेतकऱ्यांना दीड हजार कोटी रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी २२६ कोटी ९८ लाख, बीड १९५ कोटी तीन लाख, जालना १३४ कोटी २२ लाख, उस्मानाबाद १३७ कोटी सात लाख, तर परभणी जिल्ह्यासाठी ७० कोटी ३७ लाख रुपये निधी वितरित केला जाणार आहे.

****

मुंबई महानगरपालिकेतल्या कथित कोरोना घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय-ईडीने काल मुंबईसह काही शहरांमध्ये छापे टाकले. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईत तब्बल १५ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये मुंबई महानगर पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, सुजीत पाटकर यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे.

****

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केलेली नसल्याचं गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना झेड सुरक्षा, तर रश्मी आणि तेजस ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट ही वर्गीकृत सुरक्षा पुरवण्यात येत आहे.  वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आलेले नाहीत, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसमधे, खऱ्या अर्थांनं बदल होणं आवश्यक असल्याचं परखड मत, विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला २५ वर्ष झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पक्षात बरेचजण मंत्री झाले, पण दुसऱ्यांना निवडून आणू शकत नाहीत, मुंबईत पक्षाची ताकद कमी आहे, त्यामुळे आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

सध्या राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा, दंगली घडवण्याचा, प्रयत्न केला जात असून, त्यामागचा सूत्रधार शोधून काढला पाहिजे. महिलांवर अत्याचार होत आहेत, ते थांबले पाहिजेत. आपली पोलिस यंत्रणा चांगली आहे, मात्र राज्यसरकार कमी पडत असून, अशा प्रकारांमुळे राज्याची प्रतिमा बिघडते आहे, असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

****

नद्यांना अमृत वाहिनी केल्याशिवाय पर्याय नाही, असं प्रतिपादन रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह यांनी केलं आहे. ते काल गडचिरोली इथं ‘चला जाणुया नदीला या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. वाढतं अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे नद्यांचं आरोग्य बिघडत चाललं असून, ते रोखण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल, असं ते म्हणाले. ‘चला जाणुया नदीला हा उपक्रम राबवण्यासाठी प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचं कौतुक केलं.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामातल्या पीक पेरणीचं नियोजन करताना मुबलक पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असं आवाहन, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलं आहे. ८० ते १०० मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय धूळ पेरणी तसंच सर्वसामान्य पेरणी करू नये, लवकर उगवणाऱ्या तसंच पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची निवड करावी, पेरणीसाठी साधारणपणे २० टक्के जादा बियाण्यांचा वापर करावा, आंतरपीक पद्धतीचा वापर करावा, जमिनीतील ओलाव्याचं संवर्धन करण्यासाठी आच्छादन मल्चिंग सारख्या तंत्राचा वापर करावा, आदी सूचनाही कृषी आयुक्तांनी केल्या आहेत.

****

एक सप्टेंबर पासून जर विलगीकृत कचरा नाही आणला तर पगार केला जाणार नाही, असा इशारा, औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिला आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. महापालिकेचा चमू इंदूरला दोन दिवसीय कचरा व्यवस्थापन अभ्यास दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्याबाबत आयुक्तांनी माहिती घेतली. आपलं शहर इंदूरसारखं किंवा इंदूर पेक्षा जास्त स्वच्छ आणि सुंदर करायचं असेल, तर शंभर टक्के कचरा विलगीकरणाशिवाय पर्याय नाही, असं आयुक्तांनी नमूद केलं. प्रत्येकाने विचार करून आपले शहर स्वच्छ करण्यासाठी हातभार लावावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

विविध कंपन्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पैसे चोरीच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांना काल औरंगाबाद सायबर पोलिसांनी अटक केली. शेख इरफान, वसीम शेख, शेख कानित, अब्बास शेख, अमोर करपे, आणि कृष्णा करपे, अशी यांची नावं असून, शहरातल्या एका हॉटेलमधून या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्या ताब्यातून विविध २० कंपन्यांच्या बँक खात्याची तसंच इंटरनेट बँकिंगची माहिती असलेली कागदपत्रं हस्तगत करण्यात आली. हे सर्वजण सुमारे ११० कोटी रुपये चोरून या रकमेचं क्रिप्टो करन्सीत रुपांतर करण्याच्या प्रयत्नात असल्याचं, पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

नांदेड इथं येत्या रविवारी शासन आपल्या दारी हे अभियान राबवलं जाणार आहे. या भव्य उपक्रमाच्या तयारीचा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल आढावा घेतला. जिल्ह्यातल्या सर्व विभाग प्रमुखांची त्यांनी या संदर्भात आढावा बैठकही घेतली. दरम्यान, शंखी गोगलगाय निर्मुलनासह अन्य मार्गदर्शनासाठी कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या कृषी रथाला सत्तार यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.

****

सॅफ या दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत काल बंगळुरू इथं झालेल्या सलामीच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर चार - शून्य असा विजय मिळवला. सुनिल छेत्री यानं तीन तर उदांता सिंग यानं एक गोल केला. या स्पर्धेत भारताचा पुढता सामना २४ तारखेला नेपाळ विरुद्ध होणार आहे.

****

भारतानं २३ वर्षांखालील महिलांच्या इमर्जिंग आशिया करंडक टी - ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. हाँगकाँग इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं बांग्लादेशचा ३१ धावांनी पराभव केला.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 26 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...