Friday, 23 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 23.06.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण सहकार्य बळकट करण्यासाठी एक महत्वाचा करार काल करण्यात आला. यामध्ये भारतीय वायु दलासाठी लढाऊ जेट इंजिनांच्या निर्मितीसाठी जीई एरोस्पेस, या कंपनीचा भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत सामंजस्य करार करण्यात आला.

****

भारतीय अर्थव्यवस्थेत एकूण देशांतर्गत उत्पन्न - जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहील, असा अंदाज, फिच पतमानांकन संस्थेनं वर्तवला आहे. जानेवारी ते मार्च २०२३ या काळात कारखानदारी आणि बांधकाम क्षेत्राची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाल्यामुळे हा सुधारित अंदाज वर्तवल्याचं फिच ने म्हटलं आहे.

****

बिहारमधल्या पाटणा इथं आज विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, एम के स्टॅलिन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

****

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या मोबाईल अॅपमधे चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या यंत्रणेचं उद्घाटन काल केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे सुदूर भागातल्या शेतकऱ्यांना आपली माहिती ओटीपी किंवा बोटांचे ठसे न वापरता देता येईल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट फायदा मिळतो असं तोमर यांनी यावेळी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यातल्या एकूण सोळा मध्यम प्रकल्पांत वीस पूर्णांक दोन टक्के पाणीसाठा आणि एकूण २० लघू प्रकल्पात ४७ पूर्णांक २२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचं जलसंपदा विभागातर्फे कळवण्यात आलं आहे. 

****

No comments: