Sunday, 27 August 2023

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : २७ ऑगस्ट २०२३ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 27 August 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २७ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

 संकल्पातील काही सूर्य चंद्रावरही उगवतात हे २३ ऑगस्ट रोजी भारत आणि भारताच्या चंद्रयानानं सिद्ध केलं.” मिशन चांद्रयान हे देशाच्या क्षमतेचं प्रतीक बनल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्यामन की बातया कार्यक्रमात बोलत होते. हा या कार्यक्रम मालिकेचा एकशे चारावा भाग होता. इस्त्रोनं चांद्रयान - ३ मोहिम यशस्वी केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधानांनी नव्या भारताच्या सामर्थ्याचं महत्व विषद केलं.
राष्ट्रीय आदर्शाच्या रुपात महिलांच्या नेतृत्वाखाली विकास घडवायचा आहे. जिथं स्त्री शक्तीची भर पडते तिथं अशक्य गोष्ट शक्य होऊ शकतेअसं पंतप्रधान म्हणाले.   

भारताचं मिशन चांद्रयान हे स्त्री शक्तीचं जिवंत उदाहरण आहे. महिलांकडे या मोहिमेच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. भारताच्या मुली आता अनंत समजल्या जाणाऱ्या आकाशाला आव्हान देत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं, तसंच एखाद्या देशाच्या मुली इतक्या महत्त्वाकांक्षी झाल्या तर त्या देशाचा विकास होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. स्वप्नं मोठी आणि प्रयत्नही मोठे असल्यामुळं एवढं उंच उड्डाण घेता आलं असंही पंतप्रधान म्हणाले. जी -ट्वेंटी परिषदेसाठी भारत पूर्णपणे तयार असून चाळीस देशांचे राष्ट्रप्रमुख, अनेक जागतिक समन्वयक या परिषदेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत येत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. 

चीनमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक विद्यापीठ क्रिडा स्पर्धेत २६ पदकं प्राप्त करणाऱ्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधानांनीमन की बातया कार्यक्रमाच्या माध्यमातून दुरध्वनीवरुन संवाद साधला. नेमबाजीत पदक प्राप्त करणाऱ्या कोल्हापुरच्या अभिज्ञा पाटील हिच्याशीही पंतप्रधानांनी संवाद साधला. “जेव्हा मी खेळाला सुरुवात केली, तेव्हा कोल्हापुरात सोईसुविधा नव्हत्या. त्यामुळं शिक्षण घ्यायलाही अडचणी आल्या. पण दोन- तीन वर्ष कठोर मेहनत घेत मलेशियात कास्यपदक प्राप्त केल्यानंतर पाठबळ मिळाल्याचं तिनं पंतप्रधानांना बोलताना सांगितलं.

                               ****
आदित्य एल -वन हा उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज असून श्रीहरिकोटा इथं तो पोहोचला असल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी म्हटलं आहे. तिरुवनंतपूरम् इथं काल पत्रकारांशी ते बोलत होते. आदित्य एल वन चं प्रक्षेपण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित असून येत्या २ दिवसात प्रक्षेपणाची तारीख घोषित करण्यात येईल असं सोमनाथ यांनी सांगितलं. हा उपग्रह म्हणजे सूर्याच्या अभ्यासासाठीची वेधशाळा आहे. विविध ग्रहांवर अन्य मोहीमा कार्यान्वित करण्यात भारत सक्षम आहे, अंतराळ क्षेत्राच्या विस्ताराच्या माध्यमातून देशाची समग्र प्रगती हा इस्रोचा उद्देश असल्याचं सोमनाथ यांनी यावेळी सांगितलं.

                              ****

परभणीतशासन आपल्या दारीकार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असून कार्यक्रमात लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचं आणि प्रमाणपत्रांच वाटप केलं जाणार आहे.    

                              **** 
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं या वर्षी देशातल्या ५० शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार राज्यातून, एकमेव शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे -शिंदे यांना जाहीर झाला आहे.

मृणाल गांजाळे या पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या पिंपळगाव महाळुंगे इथं जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी राज्य शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. गांजाळे यांनी आपल्या अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. येत्या शिक्षकदिनी ५ सप्टेंबर रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली इथं राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

                              ****

 

 

भारतीय महिला हॉकी संघानं काल महिला आशियाई हॉकी फाईव्ह एस विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत, ओमान इथं झालेल्या सामन्यात जपानला ७-१ अशा गुणफरकानं पराभूत केलं. भारताचा पुढचा सामना आज थायलंडशी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी अडीच वाजता होणार आहे.

                              **** 

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यामधील पठाणपुरा परिसरात एका गाईला लंम्पी त्वचा रोगाची लागण झाल्याचं आढळलं आहे. यामुळं संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर क्षेत्र बाधित घोषित करण्यात आलं, असून परिसरात गुरांच्या खरेदी-विक्री तसंच वाहतूक, बाजार, जत्रा, आणि प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. 

                               ****

No comments: