Wednesday, 2 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 02.08.2023, रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 02 August 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ०२ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

अनुवांशिक रक्तदोषामुळं होणाऱ्या हेमोफेलिया या आजारावरच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व ३६ जिल्ह्यांत, जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये `डे केअर` केंद्र सुरू करण्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधानपरिषदेत केली.  भारतीय जनता पक्षाच्या उमा खापरे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. सध्या राज्यातल्या नऊ जिल्ह्यांत हेमोफेलिया या आजारावरची उपचार केंद्रं आहेत. भविष्यात सर्वच जिल्ह्यात ही केंद्रं होतील आणि या केंद्रांमध्ये डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचारी आणि प्रशिक्षणासाठी पथक उपलब्ध करुन देण्यात येईल आणि राज्यभरात या आजारासाठी राज्यव्यापी सर्वेक्षण हाती घेण्यात येईल, असं मंत्री सावंत यांनी सांगितलं. केंद्र सरकारकडून गेल्या वर्षी या आजारासाठी २७ कोटी रुपये तर या वर्षासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****

राज्यातल्या सर्व शासकीय बांधकामांसाठी केवळ दगडातून तयार केलेली वाळूच वापरण्याचं बंधन घालण्याचं धोरण जाहीर केलं जाईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबतचा प्रश्न प्रशांत बंब यांनी उपस्थित केला होता. अनेक अडचणींमुळं सरकारनं आणलेलं वाळू धोरण सुरळीत होण्यासाठी वेळ लागत आहे असं मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं. राज्यात २८ लाख ४७ हजार ब्रास वाळू उपलब्ध करुन देण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत इथल्या आपल्या एन. डी. स्टुडिओतच त्यांनी आपलं जीवन संपवलं. ५८ वर्षांचे देसाई हे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेतेही होते. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परिंदा, डॉन, लगान, देवदास, खामोशी, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, अशा गाजलेल्या चित्रपटांचं कला दिग्दर्शन तर बालगंधर्व या मराठी चित्रपटांची निर्मीतीही त्यांनी केली आहे. नितीन देसाई यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.

****

महिला सशक्तीकरण या विषयावर जी २० अंतर्गत मंत्रीस्तरीय परिषद आजपासून गुजरातच्या गांधीनगर इथं होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्य प्रणाली संदेशाद्वारे परिषदेला प्रारंभ होत आहे. या तीन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आहेत. पिढ्यांतर्गत परिवर्तनाच्या प्रमुख म्हणून महिलांच्या नेतृत्वाचा समावेशक विकास हा या मंत्रीस्तरीय जी २० परिषदेचा विषय आहे.

****

नैसर्गिक आपत्तीमुळं होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचे वेळेत, अचूक आणि गतीनं पंचनामे होण्यासाठी नागपूर विभागात प्रथमच प्रायोगिक तत्वावर-पंचनामेपद्धत राबवण्यात येत आहे. देशात तसंच राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. -पंचनाम्यामुळं शेतकऱ्यांना तातडीनं मदत देणं शक्य होणार आहे. नागपूर विभागातल्या नुकसानीचे हे ई- पंचनामे येत्या शनिवारपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.

****

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये म्हसोबावाडी इथं विहिरीचं काम सुरू असताना मुरुम ढासळून त्याखाली चार मजूर गाडले गेले आहेत. काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

****

नंदुरबार शहर पोलीसांनी दुचाकी, मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना अटक करुन त्यांच्याकडून चोरीच्या १५ दुचाकी, सहा मोबाईल जप्त केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यावरुन नंदुरबार पोलीसांनी सापळा रचून या दोन चोरांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत सुमारे दहा लाख ३४ हजार रुपये असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान उद्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना त्रिनिदाद इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता सामना सुरु होईल. दुसरा सामना येत्या रविवारी तर तिसरा सामना येत्या मंगळवारी- आठ तारखेला होईल. या मालिकेतले अंतिम दोन सामने अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये येत्या १२ आणि १३ तारखेला होणार आहेत.

 

//************//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 13 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...