Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 November
2023
Time : 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ नोव्हेंबर २०२३
सकाळी
७.१० मि.
****
·
नागपूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनासाठी राष्ट्रपती येत्या
एक डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर
·
संकटांकडे
सकारात्मकतेने पाहण्याची गरज लोकसभेच्या माजी अध्यक्ष पद्मभूषण सुमित्रा महाजन
यांच्याकडून व्यक्त
·
विकसित
भारत संकल्प यात्रेचं मराठवाड्यात विविध गावांमध्ये उत्साहात स्वागत
· छत्रपती संभाजीनगर इथं चौदाशे दिव्यांग नागरिकांना
आवश्यक साहित्याचं वाटप
आणि
· चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारतीय जोडीची अंतिम फेरीत धडक
नागपूरच्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ७५ व्या वर्धापन दिन सोहळ्याला राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी काल पत्रकार परिषदेत ही
माहिती दिली. या कार्यक्रमाला सुमारे तीन हजार माजी विद्यार्थी उपस्थित राहणार
आहेत. त्यापैकी ४ माजी विद्यार्थ्यांचा राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सत्कार
करण्यात येणार आहे. यामध्ये ९७ वर्षीय डॉ. बी.जे. सुभेदार यांचा समावेश आहे, ते संस्थेच्या १९४७ च्या पहिल्या बॅचचे
विद्यार्थी आहेत. दरम्यान, हा कार्यक्रम पुढील १५ दिवस चालणार
आहे. यापूर्वी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद
आणि शंकरदयाल शर्मा यांनीही या संस्थेच्या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभाग घेतला
होता.
****
संकटांकडे सकारात्मकतेने
पाहण्याची गरज लोकसभेच्या माजी अध्यक्ष पद्मभूषण सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केली
आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं पद्मम फेस्टिवल या मुलाखत वजा संवाद कार्यक्रमाच्या दुसऱ्या
सत्रात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभुषण
प्रभा अत्रे, लोकसाहित्यिक पद्मश्री प्रभाकर
मांडे, पर्यावरण तज्ज्ञ पद्मश्री अनिल
जोशी, या मान्यवरांचीही काल या कार्यक्रमात
मुलाखत घेण्यात आली. प्रभा
अत्रे यांच्या शिष्यांनी यावेळी रागप्रभा या कार्यक्रमात शास्त्रीय गायन सादर केलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रा काल गडचिरोली तालुक्यातील
कोटगल इथं पोहचली. याप्रसंगी
जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. दावल साळवे, उपस्थित होते. याप्रसंगी शालेय
विद्यार्थिनीनी गोंडी नृत्य सादर केलं.
****
विकसित भारत
संकल्प यात्रेअंतर्गत काल नांदेड तालुक्यात नेरली इथं घरकुल
लाभार्थ्यांसह पीएम किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांचा संकल्प रथयात्रेदरम्यान
सन्मान करण्यात आला.
यावेळी गावकऱ्यांनी संकल्प रथाचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात घरकुल लाभार्थी होनाजी नामदेव रासे आणि संदीप सातोरे यांना
घराची चावी देण्यात आली, तसंच पीएम किसान
लाभार्थी शेख जिलानी शेख बाशा यांचा सत्कार करण्यात आला. नागरिकांनी
या यात्रेअंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी
अधिकारी अमित राठोड यांनी केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी
कमल कदम आणि महात्मा फुले योजनेचे लाभार्थी शकील
पठाण यांनी आपले या योजनांच्या लाभाचे अनुभव या शब्दांत कथन केले.
‘‘नमस्कार माझे
नाव कमल नितीन कदम राहणार धर्मापुरी तालुका जिल्हा परभणी मी उज्वल गॅसची
लाभार्थी आहे. चुल पेटवा नंतर स्वयंपाक करा लेकरांना की
डबे टिफन करण्यासाठी
जो वेळ आल्यासमुळे मला खूप कमी वेळ लागतो. अशा डोक्यामध्ये आलं की आपणनंतर घरी वेळ
न घेता काही तरी उद्योग धंदा करावा. आता माझा टेलरिंग मशीन हे सुरु आहे खूप खूप आभारी
आहे.’’
‘‘मी शकेल रास खान पठाण गाव, धर्मापुरी
तालुका जिल्हा परभणी मला किडनी स्टोनचा त्रास होता. आणि प्रायवेट हॉस्पिटल मध्ये
जेव्हा गेलो तेव्हा डॉक्टरांनी 35 ते 40 हजार खर्च
सांगितला आणि नंतर माझं ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेमध्ये
यशस्वी झाला आणि एक रुपये खर्च न लागता पूर्णपणे
ट्रीटमेंट मला भेटले.’’
****
गोव्यात सुरु असलेल्या, ईफ्फी या ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या
वर्षीच्या प्रतिष्ठित ICFT-UNESCO गांधी पदकासाठी दहा
चित्रपट स्पर्धेत आहेत. या दहा चित्रपटांमध्ये, राकेश
चतुर्वेदी ओम यांचा ‘मंडली’, विष्णू
शशी शंकर यांचा ‘मलिकापुरम’ आणि सयंतन
घोसन यांचा ‘रवींद्र काव्य रहस्य’ या तीन
भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. येत्या २८ नोव्हेंबरला
इफ्फीच्या समारोप समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
****
उत्तराखंडमध्ये निर्माणाधीन सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्यात तांत्रिक अडथळ्यामुळे
काम सध्या थांबलं आहे, हा अडथळा
दूर झाला की, बचावकार्याला पुन्हा सुरुवात होणार असल्याचं
मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या
बचावकार्यावर लक्ष ठेवून असल्याचं मुख्यमंत्री धामी यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान आज आकाशवाणीच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणीसह दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. हा या कार्यक्रमाचा १०७ वा भाग असणार आहे.
****
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल दिव्यांग सामाजिक अधिकारता शिबिरात चौदाशे दिव्यांग नागरिकांना विविध प्रकारच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं.
यामध्ये तीन चाकी सायकल, चाकाची खुर्ची,
श्रवण यंत्र, काठी, स्मार्ट
फोन आदी साहित्याचा समावेश आहे. केंद्रीय सामाजिक न्याय
राज्यमंत्री प्रतिमा भौमिक, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.
भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्र
शासनाने दिव्यांगांच्या विकासासाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवून दिव्यांगाना सामाजिक,
आर्थिक आणि शैक्षणिक विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं
महत्त्वपूर्ण काम केल्याचं भौमिक यांनी सांगितलं, तर केंद्रीय
अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून दिव्यांग
नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन डॉ कराड यांनी केलं.
****
चीनमधील शेनझेन इथं सुरु असलेल्या चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात भारतीय जोडीने चीनच्या जोडीचा २१-१५, २२-२० असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. आज अंतिम फेरीच्या लढतीतही सात्विक आणि चिरागचा सामना चीनच्या जोडीसोबत होणार
आहे.
****
भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज तिरुअनंतपुरम इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामना सुरु होईल.भारतानं एक-शून्य अशी आघाडी या मालिकेत मिळवलेली आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या
१९ वर्षाखालील संघात बीडच्या सचिन धस याचा समावेश करण्यात आला आहे. येत्या आठ डिसेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये
ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
****
मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज पंधरा वर्ष होत आहेत. या हल्ल्यात वीरमरण हुतात्म्यांना आज छत्रपती
संभाजीनगर इथं अभिवादन करण्यात येणार आहे. आज सायंकाळी
टीव्ही सेंटर चौकात कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे.
****
भारतीय संविधान दिनानिमित्त आज नांदेड इथं संविधान
सन्मान रॅली काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही पीईएस तंत्रनिकेतन परिसरात संविधान जागृती
परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी जालना
जिल्ह्यातल्या जामखेड इथं २० दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण काल मागे घेण्यात आलं. जिल्ह्याचे
पालकमंत्री अतुल सावे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, आमदार नारायण कुचे यांनी उपोषणकर्त्यांची
भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी पालकमंत्री सावे यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण मागे घेतलं.
****
राज्यात आरोग्य
सेवा आणि वैद्यकीय शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी आशियायी विकास बँकेच्या माध्यमातून
सुमारे चार हजार १६० कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून धाराशिव इथल्या शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय आणि रुग्णालयाला इमारत बांधकाम आणि यंत्र सामग्रीसाठी हा निधी प्राप्त होणार असल्याचं, आमदार राणाजगजितसिंह
पाटील यांनी सांगितलं आहे. यामुळे महाविद्यालय उभारण्याच्या कामाला
मोठी गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
****
अंबाजोगाई इथं तीन दिवसीय यशवंतराव
चव्हाण स्मृती समारोहास कालपासून प्रारंभ झाला. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांचे हस्ते या समारोहाचं उद्घाटन
झालं. यशवंतरावांच्या विचारांवर चालण्याचं आवाहन कांबळे यांनी
यावेळी केलं.
****
राज्यात येत्या दोन
दिवसांत गारपिटीसह पावसाची शक्यता असून औरंगाबाद आणि हिंगोली सह सहा जिल्ह्यांना
ऑरेंज तर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment