Saturday, 2 December 2023

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर संक्षिप्त बातमीपत्र ०२ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०२ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा एकशे अकरावा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात उपस्थित आहेत.

****

दुबईत कॉप - 28 जागतिक हवामान कृती शिखर परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पर्यावरण संतुलित विकासाच्या मॉडेलला अधोरेखित केलं. प्रत्येक देशानं हवामानासंदर्भात आपलं उद्दिष्ट निर्धारित करुन ते पूर्ण करण्याचा संकल्प करावा, प्रत्येक राष्ट्राला आपली जबाबदारी निभावावीच लागेल, केवळ स्वत:पुरता विचार अंध:कारमय भविष्याकडे नेईल, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

दरम्यान, एक दिवसाचा दुबई दौरा आटोपून पंतप्रधान काल मायदेशी परतले.

****

भारताच्या भरडधान्य मानकांची प्रशंसा करत कॅक अर्थात कॉडेक्स आहार आयोगानं इटलीतल्या रोम इथं अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात झालेल्या ४६ व्या परिषदेत भारताचा जागतिक मानकं विकसित करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे.  कॅकनं प्रस्ताव स्कीकारल्यामुळे प्रकल्पाशी निगडित कागदपत्रं आणि मानकं विकसित करण्यासाठीचा मसुदा सादर करण्याचं काम आता भारत करणार आहे.

****

केरळ मध्ये थिरुवंतपूरम इथं आयोजित पाचव्या ग्लोबल आयुर्वेद महोत्सवाचं उद्घाटन काल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते झालं. आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार महत्त्वाची भूमीका बजावत असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

****

सरकारी तेल आणि गॅस कंपन्यांनी काल व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात २१ रुपयांची वाढ केली. त्यानुसार मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरची किंमत १ हजार ७४९ इतकी झाली आहे.

****

भारतीय रेल्वेनं यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत एक हजार मेट्रिक टन मालवाहतूक केली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतल्या वाहतुकीच्या तुलनेत ही सुमारे ३६ मेट्रिक टनापेक्षा अधिक वाहतूक झाल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 11 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...