Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 02 December 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करुन 'डीप फेक' सारख्या समाज विघातक गोष्टी टाळण्यासाठी
नैतिकता युक्त शिक्षण आपल्याला दिशा दाखवू शकते, असं राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा एकशे अकरावा
दीक्षांत
समारंभ आज राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार
पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
जेव्हा तंत्रज्ञानाचा सदुपयोग होतो तेव्हा देश आणि समाजाला त्याचा
फायदा होतो, मात्र या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग झाल्यास
मानवतेची हानी होते, असं त्या म्हणाल्या. यावेळी पदवी प्राप्त करणाऱ्या ८० हजार विद्यार्थ्यांमध्ये अर्ध्यापेक्षा
जास्त विद्यार्थीनी आहेत, १२९ पीएचडी प्राप्त
विद्यार्थ्यांमध्ये देखील ५७ टक्के विद्यार्थीनी आहेत, याचा
उल्लेख करून राष्ट्रपतींनी, मुलींच्या शिक्षणामध्ये गुंतवणूक
करणं हे देशाच्या प्रगतीमध्ये अमूल्य योगदान असल्याचं नमूद केलं. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस, केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित
होते.
या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती दिल्लीला रवाना झाल्या.
****
संसदेच्या येत्या सोमवारपासून सुरु होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या
पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सध्या सुरु आहे. दोन्ही सभागृहात अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे पार पडण्याच्या उद्देशानं
सर्वपक्षीय सहकार्य मिळावं, असं आवाहन या बैठकीत करण्यात येत
आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीचं आयोजन
केलं आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन चार डिसेंबर ते २२ डिसेंबर
दरम्यान होणार आहे.
****
मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा
निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. छत्तीसगढमधल्या रायपूर
उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदान केंद्रांवर महिला कर्मचार्यांनी मतदानाचं
व्यवस्थापन केलं होतं. मतदानाच्या कामकाजाचं महिलांनी नियोजन
करणारा हा देशातला पहिलाच विधानसभा मतदारसंग ठरला आहे.
दरम्यान, मिझोराम
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सोमवारी चार डिसेंबरला होणार आहे. यापूर्वी उद्या तीन
डिसेंबरलाच इतर राज्यांसोबतच मिझोराममध्ये मतमोजणी होणार होती. मात्र मिझोराम
एनजीओ कोऑर्डिनेशन कमिटीच्या विरोधापुढे नमते घेत निवडणूक आयोगाने मतमोजणी एक दिवस
पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
****
४३व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातल्या गंगापूर इथं आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते झालं. श्री मुक्तानंद महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या कविवर्य ना. धों. महानोर साहित्यनगरीत प्रसिद्ध लेखक डॉ जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. तत्पूर्वी आज सकाळी ग्रंथदिंडीनं संमेलनाची सुरुवात झाली.
संमलेनाचे मावळते अध्यक्ष शेषराव मोहिते यांच्या हस्ते ग्रंथनगरीचं उद्घाटन
झालं. बाल वारकरी, विविध देखावे या ग्रंथदींडीत
सहभागी झाले होते. या दोन दिवसीय संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद,
परिचर्चा, कथाकथन, तसंच काव्यगायन
आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
वातावरणातलं कार्बनचं प्रमाण कमी करण्याच्या उद्देशानं
राज्याच्या ग्रामीण भागात दहा लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड केली जाणार
असल्याचं, राज्य कृषीमुल्य आयोगाचे
अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी
बोलत होते. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असलेल्या या योजनेमध्ये
बांबू रोप लागवडीसाठी प्रतिहेक्टर सात लाख रुपयांचं अनुदान देण्यात येत असून,
कार्बन उत्सर्जन करणाऱ्या गोष्टींना पर्याय असणाऱ्या बांबूची लागवड
करा, सरकार त्याला रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत अनुदान
देणार असल्याची माहितीही पटेल यांनी दिली.
****
दीपावलीच्या काळात राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीच्या लातूर विभागाला २२ कोटी २६ लाख रुपये उत्पन्न झालं आहे.
आठ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या काळात लातूर आगाराला सहा कोटी ३२ लाख,
उदगीर आगार पाच कोटी १५ लाख, अहमदपूर तीन कोटी
७० लाख, निलंगा तीन कोटी ९० लाख, तर औसा
आगाराला तीन कोटी १६ लाख रुपये उत्पन्न झालं आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या चार जिल्हा परिषद शाळांमध्ये
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि पुण्याच्या कुतुहल संस्थेच्या
मदतीने विज्ञान कृती केंद्राची निर्मीती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळेतल्या
विद्यार्थ्यांना गावखेड्यावरच विज्ञानाच्या अभिरुची वाढावी यासाठी पहिल्यांदाच
जिल्हा परिषद शाळांमध्ये ग्रहांचं मॉडेल तयार करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातल्या दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात चार डिसेंबरपासून सुरु होत आहे. या दरम्यान १२ दर्जेदार नाटकं सादर होणार आहेत.
****
No comments:
Post a Comment