Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 02 December
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
·
तंत्रज्ञानाचा दुरुपयोग टाळण्यासाठी
नैतिक शिक्षण दिशादर्शक-राष्ट्रपतींचं प्रतिपादन
·
विकसित भारत संकल्प यात्रेतून
शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांचं
आवाहन
·
त्रेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य
संमेलनाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं प्रारंभ
आणि
·
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन
विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा
****
'डीप फेक' सारख्या समाज विघातक प्रकारांसाठी तंत्रज्ञानाचा
दुरुपयोग टाळण्याकरता नैतिक शिक्षण दिशादर्शक ठरेल, असं प्रतिपादन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
विद्यापीठाचा एकशे अकरावा दीक्षांत समारंभ आज राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार
पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जेव्हा तंत्रज्ञानाचा सदुपयोग
होतो तेव्हा देश आणि समाजाला त्याचा फायदा होतो, मात्र या तंत्रज्ञानाचा
दुरुपयोग झाल्यास मानवतेची हानी होते, असं त्या म्हणाल्या. मुलींच्या
शिक्षणामध्ये गुंतवणूक करणं हे देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान असल्याचं राष्ट्रपतींनी
नमूद केलं. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती आपला महाराष्ट्र दौरा पूर्ण करून दिल्लीला रवाना
झाल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा सिंधुदूर्गच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं अनावरण करणार आहेत. नौदल दिन कार्यक्रमातही
पंतप्रधान सहभागी होणार आहेत.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय
बैठक घेतली. या अधिवेशनादरम्यान सभागृहात मांडण्यात येणाऱ्या प्रत्येक विषयावर चर्चा
करायला केंद्र सरकार तयार असून विरोधकांनी सकारात्मक चर्चेवर भर द्यावा, असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. या बैठकीनंतर
ते पत्रकारांशी बोलत होते. हे अधिवेशन चार डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरासह गावागावात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून
शासनाच्या योजना पोहोचवण्याचं आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी
केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात इटावा इथं विकसित भारत
संकल्प यात्रेदरम्यान जनसंवाद कार्यक्रमात ते आज बोलत होते. यात्रेच्या माध्यमातून
विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मिशन मोडवर काम करा, असे निर्देश कराड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी कराड यांच्या
हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचं वितरण करण्यात आलं. ड्रोन उडवण्याचं
प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज धुळे तालुक्यातल्या बोरिस आणि लामकानी इथं पोहोचली.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभास देवरे आणि गावकऱ्यांनी या यात्रेचं स्वागत केलं.
यावेळी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं तसंच विविध योजनांची माहिती देण्यात आली.
****
सांगली जिल्ह्यात आयुक्त सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता हीच सेवा मोहिमेअंतर्गत
महानगरपालिका क्षेत्रातील ३३ स्मशानभूमी आणि दफनभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेत मनपा कर्मचारी, अधिकारी, सेवाभावी संस्था
सहभागी झाल्या होत्या.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या चार जिल्हा परिषद शाळांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक
परिवर्तन अभियान आणि पुण्याच्या कुतुहल संस्थेच्या मदतीने विज्ञान कृती केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना गावखेड्यावरच
विज्ञानाच्या अभिरुची वाढावी यासाठी पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळांमध्ये ग्रहांचं
मॉडेल तयार करण्यात आलं आहे.
****
कुणबी-मराठा, मराठा- कुणबी या जात नोंदणीबाबत कागदपत्रांच्या
छाननीसोबतच पुरोहित संघासारख्या संस्थांची तसेच भाषा तज्ज्ञांची मदत घ्यावी,
अशी सूचना, यासंदर्भात स्थापन समितीचे अध्यक्ष
निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी दिले आहेत. ते आज नाशिक इथं यासंदर्भातल्या
आढावा बैठकीत बोलत होते. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागात तपासण्यात
आलेली कागदपत्रं तसंच कुणबी-मराठा, मराठा कुणबीच्या आढळलेल्या
नोंदीबाबतची माहिती दिली.
****
मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि
तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार असून,
निकालही जाहीर होणार आहे. मिझोराम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी परव सोमवारी
होणार आहे.
****
पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता
आठवी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत्या सात डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात
आली आहे.
****
यंदाचं ५८ वं अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन नवी मुंबई इथं होणार आहे. मराठी
विज्ञान परिषद आणि वाशी इथल्या मराठी साहित्य संकृती कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने
९ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर कुलकर्णी यांनी आज वाशी इथं पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. घनकचरा व्यवस्थापन आणि उद्योग आणि पर्यावरण हे या अधिवेशनाचे
मुख्य विषय असणार आहेत.
****
त्रेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात गंगापूर इथल्या श्री मुक्तानंद महाविद्यालयात हे संमेलन भरवण्यात आलं आहे.
संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम, मावळते संमेलनाध्यक्ष शेषराव मोहिते, मराठवाडा शिक्षण
प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, स्वागताध्यक्ष
लक्ष्मणराव मनाळ, आमदार सतीश चव्हाण, आमदार
विक्रम काळे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.कौतिकराव
ठाले पाटील यांच्यासह मराठवाड्यातील प्रसिद्ध लेखक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचा
उद्घाटन सोहळा पार पडला. संमेलनाध्यक्ष जगदीश कदम यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात
मराठवाडा साहित्य परिषदेनं खेड्यातून आलेल्या लेखकांना प्रोत्साहन दिले पाहिजे,
तसंच समाजातला वैचारिक संभ्रम साहित्यिकांनी आपल्या लिखाणातून दूर केला
पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षक मतदार संघाचे आमदार
विक्रम काळे यांनी आपल्या भाषणात मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि मराठी भाषेला अभिजात
भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, सकाळी ग्रंथदिंडीनं या संमेलनाची सुरुवात झाली.
संमलेनाचे मावळते अध्यक्ष शेषराव मोहिते यांच्या हस्ते ग्रंथनगरीचं उद्घाटन झालं. ग्रंथदिंडीत
सहभागी बालवारकऱ्यांसह विविध देखाव्यांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. या दोन दिवसीय
संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, परिचर्चा, कथाकथन, तसंच काव्यगायन आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
हिंगोली इथं आज गर्भवती महिला आहार विषयक शिबीर घेण्यात आलं. तालुका आरोग्य अधिकारी
कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि गायत्री शक्तीपीठ
यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात गर्भवतींची तपासणी करून
मोफत औषधोपचार करण्यात आले.
****
आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्यावतीनं सहा
ते अठरा वयोगटातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धां घेण्यात आल्या. यात
अडीचशे विद्यार्थी सहभागी झाले. उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड यांच्या
हस्ते सर्व विद्यार्थ्यांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आलं. यावेळी घेण्यात आलेल्या
चित्रकला स्पर्धेतील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकांचा आयुक्त
जी. श्रीकांत यांच्या हस्ते मनपा वर्धापन दिनाच्या मुख्य
कार्यक्रमात सत्कार केला जाणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात हरंगुळ इथं संवेदना या पहिल्या दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं
आज उद्घाटन झालं. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून
उपस्थित होते. ही संस्था दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनण्यासाठी दिशादर्शक ठरेल,
असा विश्वास लोढा यांनी यावेळी व्यक्त केला. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण
संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी राज्य शासनामार्फत संस्थेला एक कोटी रुपयांचा
धनादेश यावेळी सुपूर्द केला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध गीतांचे सादरीकरण
केलं. तसंच दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा
यावेळी सत्कार करण्यात आला.
****
जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे तर
उपाध्यक्षपदी भाजपचे भीमराव जावळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष
पदासाठी सतीश टोपे आणि भीमराव जावळे यांचेच अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक निर्णय
अधिकारी सुरेश काकडे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांची
नावे जाहीर केली. दरम्यान, निवडणुकीनंतर आमदार राजेश टोपे यांच्या
गाडीवर दगडफेक झाली, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
****
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी १५ तारखेला लातूर-नांदेड या महामार्गावरील शिरूर ताजबंद
इथं रास्ता रोको आंदोलनाचा इशारा जय मल्हार संघटनेचे नेते लहूजी शेळके यांनी दिला आहे.
लातूर इथं आज झालेल्या धनगर समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
No comments:
Post a Comment