Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 02 January
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ जानेवारी २०२४
सायंकाळी ६.१०
****
·
नवीन वाहन कायद्यातल्या तरतुदींवर
चर्चा करण्यासाठी गृह सचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक
·
राज्यात अनेक ठिकाणी वहातुकदारांचं
आंदोलन सुरु
·
लातूर-बार्शी-टेंभूर्णी राष्ट्रीय
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
आणि
·
नांदेड जिल्ह्यात विकसित भारत
संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
****
केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्यातल्या तरतुदींवर चर्चा करण्यासाठी गृह सचिव
अजय भल्ला आज नवी दिल्ली इथं अखिल भारतीय मोटार वाहन संघाटनेसोबत बैठक घेणार आहेत.
या कायद्याअंतर्गत हिट ॲण्ड रन प्रकरणात सात लाख रुपये दंड आणि दहा वर्ष कारावासाच्या
शिक्षेची तरतूद आहे. याविरोधात ट्रक चालकांनी संप पुकारला आहे.
दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी वहातुकदारांचं आंदोलन सुरु
आहे. पेट्रोल आणि डिझेल टँकर चालक देखील या संपात सहभागी असल्यामुळे ठिकठिकाणी वाहनधारकांची
पेट्रोल पंपांवर गर्दी दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सर्वच पेट्रोल पंपावरील इंधन साठा संपल्यानं वाहन
चालकांची मोठी गैरसोय होत आहे. संपामुळे फळ, भाजीपाला,
दुध वितरणावर देखील परिणाम झाला आहे. तसंच औद्योगिक उत्पादनची वाहतूक
देखील ठप्प झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात नांदेड - वाशिम राष्ट्रीय महामार्गावर बासंबा फाटा इथं वाहन
चालक-मालक संघटनेच्या वतीनं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. त्याचबरोबर वसमत तालुक्यातल्या
कुरुंदा यासह जिल्ह्यात अनेक भागातल्या रस्त्यावर चालक-मालक संघटनेच्या वतीने रास्ता
रोको आंदोलन करण्यात आलं. या संपामुळे हिंगोली जिल्ह्यातल्या ५१ पैकी १५ पंपांवर पेट्रोल, डिझेलचा साठा संपला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यातल्या वाहतुकदार संघटनांनी बंद पुकारला आहे.
नाशिक जिल्ह्यात मनमाड जवळील पानेवाडी इथं इंधन डेपोतून टँकर भरणं थांबवण्यात आलं
होतं, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मध्यस्थी केल्यानंतर
हा बहिष्कार मागे घेण्यात आला.
****
दरम्यान, राज्यात स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात,
तसंच पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार
नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री
छगन भुजबळ यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक
यांना केल्या आहेत. एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा समावेश जीवनावश्यक
वस्तूमध्ये होतो. सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत आवश्यक कार्यवाही
करावी, अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक व पुरवठा सुरळीत राहील तो
कुठेही खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना देखील भुजबळ यांनी दिल्या आहेत.
****
महाराष्ट्र पोलीस दलाने नागरिकांना सुरक्षा देण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट
कामगिरी केल्याचं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत गोरेगाव इथं महाराष्ट्र
पोलीस दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या महाराष्ट्र पोलीस दलाच्या
ब्रीदवाक्याप्रमाणे आपल्या कृतीतून उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर
अनेक पदक जिंकून महाराष्ट्र पोलीस दलाने प्रतिमा उंचावली आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची
बाब आहे, असे गौरवोद्गार काढून राज्यपालांनी महाराष्ट्र पोलीस
स्थापना दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
****
खरीप हंगाम - २०२३ मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या एक हजार २१ मंडळांपैकी
ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत, त्यामध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. नैसर्गिक
आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ही माहिती दिली. या
बैठकीत उपसमितीनं राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन
पाणीपुरवठा आणि चारा टंचाई निवारण करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या
सूचना संबधित विभागांना दिल्या आहेत.
****
नाशिक इथं येत्या १२ तारखेला राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत या युवा महोत्सवाच्या
तयारीचा आढावा घेतला. राज्यभरातल्या युवकांनी यात सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी
यावेळी केलं. या महोत्सवात २८ राज्यं आणि आठ केंद्रशासित प्रदेशातले प्रत्येकी १००
युवक, राष्ट्रीय सेवा योजना युवा स्वयंसेवक,
नेहरू युवा केंद्र संघटन युवा स्वयंसेवक असे सुमारे आठ हजार जण सहभागी
होणार आहेत.
****
लातूर-बार्शी-टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याचे
निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मुंबईत आज यासंदर्भातल्या बैठकीत
ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, क्रीडामंत्री संजय बनसोडे यावेळी उपस्थित होते. नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांसह
तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणावर येणारी वाहनं, सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये
झालेली वाढ, त्यामुळे या रस्त्यावर मोठी वहातूक कोंडी होत असते.
सध्या टेंभूर्णी ते येडशी दरम्यान डांबर टाकून रुंदीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे,
तसंच येडशी ते जावळे, बोरगाव काळे ते मुरुड अकोला
यादरम्यान दुपदरीकरणासाठी, तर लातूर विमानतळ जंक्शन ते महिला
तंत्रनिकेतन दरम्यान चौपदरीकरणास मंजुरी देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत
जिल्ह्यातल्या ५६५ गावांमध्ये ही संकल्प यात्रा पोहोचली असून, यामध्ये दोन लाख २० हजार ४०४ नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. या यात्रेच्या
माध्यमातून तीन हजार ४५३ नागरिकांनी सुरक्षा विमा योजनेचा, तर
एक हजार ५९३ नागरिकांनी जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेतला आहे. २६ जानेवारीपर्यंत
चालणाऱ्या या यात्रेत जिल्ह्यातल्या नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केलं. त्या म्हणाल्या -
माझं आवाहन आहे सर्व नांदेडकर यांना, की तुम्ही
ज्या दिवशी व्हॅन तुमच्या गावात येईल, तुम्ही केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचे
अर्ज भरावे. आणि लाभ उचलून घ्यावे. याच्यामध्ये ओ डी एफ प्लस ची योजना आहे, आमचे हेल्थ
कँप लागतायत, हेल्थ कँपमध्ये तुम्ही लाभ घ्यावा. बाकी महसूलकडचे काही मुद्दे आहेत पी
एम उज्ज्वला, कृषीची योजना आहे, ज्याचे लाभ मिळत आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विद्यानगर इथं आज विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली.
यावेळी नागरीकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित
तीन दिवसीय बाल महोत्सवाचं उद्घाटन आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास
मीना यांच्या हस्ते झालं. हडको परिसरातल्या सुधारगृहाच्या मैदानावर होत असलेल्या या
महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांसह, सांस्कृतिक
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतंर्गत मुख्यमंत्री
माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबवण्यात येणार आहे. हे
अभियान यशस्वीपणे शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्याचं आवाहन लातूरचे विभागीय शिक्षण उपसंचालक
डॉ. गणपतराव मोरे यांनी केलं आहे.
****
बुलडाणा शहरात आज कोरनाचा एक रुग्ण आढळला. आरोग्य विभागातल्या एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, आरोग्य यंत्रणा
अधिक सतर्क झाली आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघादरम्यान मुंबईत सुरु असलेल्या तिसऱ्या
एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर ३३९ धावांचं आव्हान
ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ३२ धावा झाल्या
होत्या.
****
धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्याच्या रूणमळी ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार
केल्याप्रकरणी निलंबित ग्रामसेवकासह सरपंच, उपसरपंचाविरोधात
निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर जवळपास ७६ लाख रूपयांची
आर्थिक अनियमितता केल्याचं निष्पन्न झाल्यानं, साक्री पंचायत
समिती गटविकास अधिकाऱ्यांनी, ग्रामसेवक सी.पी.गायकवाड यांना निलंबित
केलं आहे.
****
२२ जानेवारी रोजी अयोध्येत स्थापन होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा
सोहळा अक्षता कलशाचं पूजन आणि निमंत्रण अक्षता वितरणाचा शुभारंभ लातूर इथं आज ग्रामदैवत
श्री सिद्धेश्वर-रतनेश्वर मंदिरातून करण्यात आला. शहरातल्या प्रत्येक उंबरठ्यावर पोहचून
याबाबत निमंत्रण देण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment