आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
३० जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यातिथी आज देशभरात हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येत आहे. नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी प्रार्थना सभा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर केंद्रीय मंत्र्यांनी याठिकाणी गांधीजींना आदरांजली वाहिली.
****
चालू आर्थिक वर्षातही देशाच्या आर्थिक विकासाचा दर सात टक्क्यांपेक्षा जास्त राहील असा अंदाज, भारतीय अर्थव्यवस्थेच्या आढाव्यात व्यक्त केला आहे. गेल्या १० वर्षात लागू झालेल्या पायाभूत सुधारणांमुळे अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचंही या आढाव्यात नमूद करण्यात आलं आहे.
****
भारतीय नौदलाच्या आय एन एस सुमित्रा या जहाजानं समुद्री चाच्यांविरोधातल्या मोहिमेत एक मोठी कामगिरी केली. सोमालीयाच्या पूर्व किनाऱ्याजवळ आणि एडनच्या आखातात इमान नावाचं एक इराणी जहाज चाच्यांनी ताब्यात घेतल्याचा संदेश मिळाल्यावर, भारत नौदलानं त्वरेनं कारवाई करत, या जहाजावरच्या सतरा कामगारांची सुटका केली. नौदलानं दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात ही माहिती देण्यात आली.
****
हरित हायड्रोजन निर्मितीसाठी सात कंपन्यांसोबत राज्य सरकारनं दोन लाख ७६ हजार ३०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले. यातून ६४ हजार रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अर्सेलर मित्तल निप्पोन स्टील राज्यात वर्षाला ६० लाख टन स्टील निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. त्यासाठी ४० हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या करारवरही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल मुंबईत स्वाक्षरी झाला.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची मराठवाडा विभागीय बैठक काल लातूर इथं पार पडली. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पक्षाचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख यावेळी उपस्थित होते. एकजूट दाखवून केंद्रात परिवर्तन घडवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment