Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 02 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· विकसित भारत संकल्प यात्रेत आतापर्यंत आठ कोटींहून अधिक नागरीक सहभागी
· राज्यातल्या शंभर महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु केली जाणार
· राज्यातल्या सामान्य नागरिकांसाठी राबवत असलेल्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
आणि
· शौर्यदिनानिमित्त पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव इथं विजयस्तंभाला अभिवादन
****
सरकारच्या महत्वाकांक्षी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवणार्या विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्यांच्या संख्येनं आठ कोटीचा टप्पा गाठून विक्रमाची नोंद केली आहे. ३६ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ७८२ जिल्ह्यांमध्ये ही यात्रा पोहोचली आहे. पाच हजार २५६ शहरी क्षेत्रात तर एक लाख ४६ हजार ८०० ग्रामपंचायतींमध्ये या यात्रेचं, माहिती, शिक्षण आणि संवाद पोहोचवचणारं आईईसी वाहन पोहोचलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं काल तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोर विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत झालं. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यावेळी उपस्थित होत्या. केंद्र सरकारने मागील नऊ वर्षात घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांमुळे देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनातल्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळाली असल्याचं, डॉ. पवार यावेळी म्हणाल्या. या यात्रेच्या उद्घाटनानंतर त्यांनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे अनुभव ऐकून घेतले. धाराशिव जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात ही विकसित भारत संकल्प रथयात्रा जाणार आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रा काल छत्रपती संभाजीनगर मधल्या मथुरा नगर, गुलमोहर कॉलनी परिसरात पोहचली. स्थानिक नागरिकांनी यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
दरम्यान, मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या लाभार्थी अश्विनी इंदूरकर आणि रत्नागिरी इथले लाभार्थी हेमराज कानोजे यांनी त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज परभणी जिल्ह्यातल्या पालम, परभणी, जिंतूर, पाथरी, सेलू आणि सोनपेठ तालूक्यातल्या विविध गावांमध्ये जाऊन जनजागृती करणार आहे. यावेळी नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांच्या माहितीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.
****
राज्यातल्या सामान्य नागरिकांसाठी राबवत असलेल्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. काल मंत्रालयात विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन घेत असलेल्या निर्णयांची अमंलबजावणी प्रशासनाकडून अधिक प्रभावीपणे केली जावी, असं त्यांनी सांगितलं. यावेळी नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. करीर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
****
राज्यातल्या शंभर महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु केली जाणार असल्याची माहिती, कौशल्य रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. १५ ते ४५ वयोगटातल्या व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्यविकास सोसायटीमार्फत प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या कौशल्य विकास केंद्रांमुळे राज्यात जलदगतीनं कौशल्य संपन्न पिढी तयार होणार आहे. या केंद्राद्वारे रोजगारासाठी आवश्यक अभ्यासक्रम निवडण्याचं स्वातंत्र्य महाविद्यालयांकडे असेल.
****
दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित - एम एस ई बी च्या “विद्युत सहाय्यक” या पदभरती जाहिरातीतल्या शैक्षणिक अर्हता मध्ये व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाच्या अभ्याक्रमांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती लोढा यांनी दिली. यामुळे राज्यातल्या विविध कौशल्यपूर्ण व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला चालना मिळेल, असं ते म्हणाले.
****
राज्यात काल कोरोनाचे ७० रुग्ण आढळले असून, सक्रीय रुग्णांची संख्या ६९३वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात ३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविडचे पाच नवे रुग्ण आढळून आले. हे सर्व रुग्ण गृहविलगीकरणात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशातल्या नागरीकांनी नमो ॲप वर जनमन सर्वेक्षणात सहभागी होऊन गेल्या दहा वर्षात झालेल्या प्रगतीसंबंधी आपले विचार मांडावे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हॅश टॅग जन मन सर्वे चा वापर करुन नागरीक आपली मतं थेट आपल्याला पाठवू शकतील, असं त्यांनी ट्विट संदेशात सांगितलं आहे.
****
शौर्यदिनानिमित्त पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव इथं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी काल अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार तसचं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी या विजयस्तंभाला अभिवादन केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त बार्टीमार्फत आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन, मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
****
भीमा कोरेगाव इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभाजवळची शंभर एकर जमीन राज्य शासनाने संपादित करून याठिकाणी भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावं, अशी मागणी, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर काल ते बोलत होते. या स्मारकासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी, या मागणीसाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटून लवकरच पत्र देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
शौर्य दिनानिमित्त नांदेडमध्ये रिपब्लिकन हक्क परिषदेच्या वतीनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पुतळ्याजवळ भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाच्या प्रतिकृतीला अभिवादन करण्यात आलं.
****
मोटार वाहन कायद्यात केलेल्या दुरूस्तीला विरोध करण्यासाठी काल राज्यात अनेक ठिकाणी ट्रक, टँकर चालकांनी आंदोलन केलं. नव्या कायद्यात, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला तर दहा वर्षे कारावास आणि दंडाची तरतूद असून, हा कायदा जाचक आणि अन्यायकारक असल्याचं वाहन चालकांचं म्हणणं आहे. हा कायदा त्वरित मागे घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
नाशिक जिल्ह्यात मनमाड इथं ट्रक, टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं.
नवी मुंबई, नागपुरातही ट्रक चालकांनी काल आंदोलन केलं.
दरम्यान, हा मोटार वाहन कायदा रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत बातमीदारांशी बोलताना केली. हा कायदा मंजूर करण्यासाठीच विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित करण्यात आलं, असा आरोप त्यांनी केला.
****
लातूर जिल्ह्यातल्या ११ लाख २७ हजार पात्रताधारक लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड मिळणार असून, आतापर्यंत केवळ २८ टक्के नागरीकांनीच हे कार्ड काढून घेतलं असल्याची माहिती आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिली. लातूर इथं आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. जिल्हा प्रशासनाने मिशन मोडवर जनतेची आयुष्मान कार्ड काढून द्यावीत, येत्या काही महिन्यात आयुष्मान भारत मिशन मध्ये मोठे बदल अपेक्षित असून, आयुष्मान कार्डचं महत्व ए.टी.एम. कार्डसारखं वाढेल, असं शेटे यावेळी म्हणाले.
****
पोलीस स्थापना दिनानिमित्त नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आजपासून येत्या आठ तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कालावधीत शाळा, महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना शस्त्र प्रदर्शन दाखवण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित दुसऱ्या फुले - शाहू - आंबेडकरी साहित्य संमेलनाचा आज प्रसिद्ध विचारवंत लक्ष्मण माने यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. यावेळी शैक्षणिक तसंच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद आणि सिल्लोड शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुतन बहुउद्देशिय विद्यालय परिसरात हे संमेलन घेण्यात आलं.
****
उत्तर भारतात पसरलेल्या धुक्यामुळे अमृतसरहून नांदेडकडे येणारी सचखंड एक्सप्रेस उशिरा धावत आहे. त्यामुळे आज सुटणारी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे.
****
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं उद्या तीन तारखेला रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment