Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
·लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान
·राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
·पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाला कालपासून प्रारंभ
·पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आढळलं तळघर-प्राचीन मूर्तींसह जुन्या नाण्यांबद्दल कुतूहल
आणि
·काँग्रेस पक्षाच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला छत्रपती संभाजीनगरातून प्रारंभ
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघात आज उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल. यासोबतच, ओडिशा राज्य विधानसभेच्या उर्वरित ४२ विधानसभा मतदारसंघांसाठीही आज मतदान होत आहे. सर्व सात टप्प्यातल्या मतदानाची येत्या मंगळवारी ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
मराठवाड्यात धाराशिव शहरात शासकीय तंत्रनिकेतन इमारतीत, तर जालन्यात औद्योगिक वसाहतीमध्यल्या सरस्वती ॲटो कम्पोनन्टस इथं मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. विभागात इतर सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.
****
राज्य लोकसेवा आयोगानं पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल काल जाहीर केला. राज्यात अजय कळसकर यानं पुरुष उमेदवारांमध्ये प्रथम तर, मयुरी सावंत हिनं महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१ मधल्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी खेळाडू उमेदवार वगळून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
****
पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाला कालपासून प्रारंभ झाला. यानिमित्तानं राज्यभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवनात अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्यादेवींच्या जन्मस्थळी त्यांना अभिवादन केलं. शासकीय स्तरावर अहिल्यादेवी असा उल्लेख केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये यानिमित्त विविध कार्यक्रम तसंच ‘मी अहिल्या बोलतेय’, या नाट्यप्रयोगाचं सादरीकरण झालं.
छत्रपती संभाजीनगर इथंही पद्मपुरा भागात असलेल्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला विविध संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. या निमित्तानं महिलांनी पदफेरी काढून अहिल्याबाईंना अभिवादन केलं.
****
राज्यात प्रवासी वाहतुक करणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस.टी. बसचा आज ७६ वा वर्धापन दिन आहे. एक जून, १९४८ ला पुणे-अहमदनगर मार्गावर, एसटीची पहिली बस धावली होती. प्रवाशांच्या विश्वासार्हतेच्या शिदोरीवर "महाराष्ट्राची लोकवाहिनी" असलेली एसटी, भविष्यात देखील दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने कटिबध्द राहील, अशी ग्वाही मंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी दिली. एसटीच्या वतीने लाखो प्रवाशांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड काल सेवानिवृत्त झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात एका छोटेखानी समारंभात त्यांना निरोप देण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहून, आर्दड यांना शुभेच्छा दिल्या.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे अभियांत्रिकी सहायक संचालक अनंतकुमार कोदंडे काल नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले. कोदंडे यांनी ३८ वर्षाच्या सेवेत प्रसारभारतीच्या विविध आस्थापनांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
****
पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरातल्या कान्होपात्रा मंदिराजवळ एक तळघर आढळलं असून, त्यात काही पुरातन मूर्ती तसंच जुनी नाणी सापडली आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर..
“या तळघरामध्ये तीन फूट उंचीच्या व्यंकटेश्वराच्या अर्थात विष्णू अवतारातील बालाजीच्या मूर्ती आढळून आल्या आहेत. तसेच पादुका आणि काही पुराणकाळातील नाणीही या ठिकाणी आढळून आली आहेत. या पुरातन वस्तू सापडल्याने भाविकांसाठी वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पसरली आहे.’’
आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांडरे सोलापूर
आतून बंदिस्त असलेलं हे तळघर, परकीय आक्रमणापासून मंदिरातल्या मूर्तींचं संरक्षण करण्यासाठी बांधलं गेलं असावं, तसंच या मूर्ती पंधराव्या-सोळाव्या शतकातल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने यांनी याबाबत अधिक माहिती दिली...
“आतमध्ये पाच बाय पाच फुटाचा एक चेंबर आहे. आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही आणखी एक चेंबर आहे. तिथे खूप मोठ्या प्रमाणावर माती वगैरे साचलेली आहे. वरून वरून दोन छोट्या आणि तीन मोठ्या दगडी मुर्त्या आणि एक पादुका अशा एकूण सहा ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात. मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे, मातीच्या बांगड्या, काचाच्या बांगड्या खूप सारे तुकडे आहेत. आणि काही नाणी आहेत, जे मॉडेल नाणी आहेत, पाच पैसे, दहा पैसे जे आता चलनात नाहीयेत, त्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत.’’
****
शेतकरी हा अन्नदाता आहे त्यांच्या समस्या कडे सरकारने लक्ष द्यावं अशी अपेक्षा, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला काल छत्रपती संभाजीनगर इथून प्रारंभ झाला, त्यानिमित्त माध्यमांशी बोलतांना पटोले यांनी ही मागणी केली. माजी आमदार डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दृष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने त्वरीत दोन लाख रूपये हेक्टरी मदत करावी, मराठवाड्यात शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी, बियांणाची कृत्रीम टंचाई दूर करावी, नुकसान झालेल्या फळबागा उभ्या करण्यासाठी विविध योजना जाहीर कराव्यात, आदी मागण्याही त्यांनी केल्या. या पत्रकार परिषदेपूर्वी पटोले यांनी बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही गावांतल्या दुष्काळी स्थितीची पाहणी करून, शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकाचा आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगर शहराला स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा व्हावा अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
****
जागतिक तंबाखू विरोधी दिन काल पाळण्यात आला. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं, शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवनानं होणाऱ्या कर्करोगाविषयी चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
नांदेड इथं सामान्य रुग्णालयात इंडियन डेंटल असोसिएशन आणि जिल्ह्यातल्या सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सहकारी संस्था उपनिबंधकाला काल दहा हजार रुपये लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलं, भारत झुंजारे असं या अधिकाऱ्याचं नाव असून, तक्रारदाराची संस्था अवसायनातून काढण्यासाठी त्यानं लाच मागितली होती.
**
बीड जिल्ह्यात केज इथं स्वस्त धान्य दुकानावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपये लाच घेणाऱ्या कोतवालास अटक करण्यात आली. मच्छिंद्र माने असं त्याचं नाव आहे.
दरम्यान, बीडचा लाचखोर कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर याच्या मिरज इथल्या बँक लॉकरमध्ये सुमारे सव्वा दोन किलो सोनं आणि रोख रक्कम अशी एकूण पावणे दोन कोटी रुपयांची अपसंपदा पोलिसांनी जप्त केली आहे.
****
राज्यात मोठ्या, मध्यम आणि लघु अशा एकूण दोन हजार ९९७ प्रकल्पात सध्या फक्त २२ पूर्णांक सहा शतांश टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून, अनेक भागात सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या ४४ मोठ्या प्रकल्पात आठ पूर्णांक ९२ शतांश टक्के, ८१ मध्यम प्रकल्पात ११ पूर्णांक ४९ शतांश टक्के, तर ७९५ लघु प्रकल्पात सहा पूर्णांक ७६ शतांश टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
****
शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ, लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष निशांत वाघमारे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रारुप विकास आराखड्यावर सुनावणीचा तिसरा टप्पा येत्या सहा जूनपासून सुरू होणार आहे. या टप्प्यात तीन हजार ३४८ आक्षेपकर्त्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आलं आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातली सुनावणी सुरू असून, ती दोन जून रोजी पूर्ण होणार आहे.
****
भारताचा मुष्टियोद्धा निशांत देव हा पॅरीस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. थायलंड मधल्या बँकॉक इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या ७१ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत, निशांतने मोल्दोव्हाच्या व्हॅसिल सेबोटारीला ५-१ च्या फरकानं पराभूत केलं.
****
टी - ट्वेंटी विश्वचषकाला उद्यापासून अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरुवात होत आहे. उद्या पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा या संघादरम्यान होणार आहे. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश संघात सराव सामना होणार आहे.
****
No comments:
Post a Comment