आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०५ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर पुढील रणनिती ठरवण्यासाठी भाजपसह घटक पक्षांची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाची शेवटची मंत्रिमंडळ बैठक देखील आज होणार आहे. काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीची देखील आज संध्याकाळी दिल्लीत बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत एकूण एकूण ५४३ जागांपैकी भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएनं २९२, तर इंडिया आघाडीनं २३३ जागांवर विजय मिळवला आहे.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीटचा निकाल काल जाहीर झाला. परीक्षार्थींना आपला निकाल एक्झाम्स डॉट एनटीए डॉट एसी डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
****
हिंदुस्तान एरॉनॉटीक्स कंपनीचं सुखोई लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे काल नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातल्या शिरसगांव इथं एका द्राक्षबागेत कोसळलं. विमानातल्या दोन्ही चालकांनी प्रसंगावधान राखत हवाईछत्रीमधून उडी घेतल्यानं ते दुर्घटनेतून बचावले.
****
इंडिनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेननं दुसर्या फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं काल झालेल्या सामन्यात जपानच्या कांता सुनेयामा याचा २१ - १२, २१ - १७ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत बी सुमित रेड्डी आणि एन सिक्की रेड्डी यांचा पराभव झाला.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल.
****
नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तसंच गोव्यात पुढे सरकला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी स्थिति अनुकूल असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज कोकण किनारपट्टीवर सोसाट्याच्या वाऱ्यासहित पाऊस पडण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment