Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 June
2024
Time: 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· १८ व्या लोकसभेचं आजपासून अधिवेशन-अध्यक्षपदासाठी परवा
निवडणूक
· नीट प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल-लातूरच्या दोघांना
चौकशीअंती अटक
· मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जालन्यात १२ जुलै रोजी
महाएल्गार शांतता रॅली
आणि
· टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा
अफगाणिस्तानकडून पराभव-आज भारताशी सामना;तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय
महिला संघाचं निर्भेळ यश
सविस्तर बातम्या
१८
व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित
सदस्यांना हंगामी अध्यक्ष भाजपचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी महताब हे सदस्यत्वाची शपथ
देतील. तीन जुलै पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षपदासाठी परवा २६ जून
रोजी निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या अधिवेशनाला २७ तारखेपासून सुरुवात होणार आहे.
****
वैद्यकीय
पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश पात्रतेच्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण
विभाग-सीबीआयने प्राथमिक माहिती अहवाल-एफआयआर दाखल केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या
तक्रारीवरून ही कारवाई केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यासंदर्भात सखोल चौकशी
करण्यासाठी या प्रकरणाशी संबंधित देशभरात दाखल इतर प्रकरणांचा तपासही हाती घेण्याची
कार्यवाही सीबीआयकडून केली जात आहे.
दरम्यान, याच प्रकरणात दहशतवाद विरोधी
पथक-एटीएसच्या नांदेड शाखेने काल लातूर इथल्या दोन शिक्षकांना अटक केली. संजय जाधव
आणि जलील पठाण अशी या दोघांची नावं असून, ते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्यासह
इरन्ना कोनगलवार आणि दिल्ली इथले गंगाधर यांच्याविरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलिस
ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट आणि जेईईच्या तयारीसाठी लातूर इथं मोठ्या
संख्येनं विद्यार्थी खासगी शिकवणी घेतात, हे दोन्ही शिक्षक खाजगी शिकवणी चालवत असल्याची माहिती
समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी
भागवत फुंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक - एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
दरम्यान, नीट-यूजी परीक्षेत अतिरिक्त
गुण मिळालेल्या सर्व एक हजार ५६३ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा काल घेण्यात आली. ज्या
विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिलेली नाही त्यांचे अतिरिक्त गुणांविना मिळालेले गुण अंतिम
म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत.
****
देशभरातला
पुराचा धोका कमी करण्यासाठी एका व्यापक आणि दूरगामी धोरणाची गरज, केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा यांनी व्यक्त केली आहे. ते काल दिल्लीत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. पूर तसंच
जल व्यवस्थापनासाठी, उपग्रहांच्या माध्यमातून घेतलेल्या छायाचित्रांचा वापर
करण्याच्या विचारावर त्यांनी भर दिला. वीज कोसळण्यासंदर्भातले इशारे प्रसारमाध्यमांद्वारे
जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही शाह यांनी दिले.
****
मराठा
आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मंडल आयोगाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा
दिला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. आतापर्यंत मिळालेल्या
कुणबी प्रमाणपत्रांपैकी एकही नोंद रद्द केली तर पुढचा लढा मंडल आयोग रद्द करण्यासाठी
असेल, अशा
शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. याबरोबरच जर मुस्लिमांची देखील कुणबी म्हणून
सरकारी नोंद निघाली, तर राज्यातल्या सर्व मुस्लिमांना कुणबी म्हणून ओबीसीतून
आरक्षण दिले पाहिजे, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाला सरसकट ओबीसी
आरक्षण आणि सगेसोयरे अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली
जालन्यात १२ जुलै रोजी महाएल्गार शांतता रॅली आयोजित करण्यात आली आहे. काल यासंदर्भात
झालेल्या नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दरम्यान, घटनात्मक अधिकार असलेल्या
मंडल आयोगावर बोलण्यापूर्वी आयोगाचा अभ्यास करणं आवश्यक असल्याचं, ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण
हाके यांनी म्हटलं आहे. ते काल जालना इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कुणबी आणि मराठा
हे वेगवेगळे असल्याचं सांगत, मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांच्या मागणीला त्यांनी
विरोध दर्शवला. सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योती शिष्यवृत्तीचा निधी दिला नाही, असा आरोपही लक्ष्मण हाके
यांनी केला.
****
केंद्रीय
निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपामुळे लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला किमान शंभर जागा
गमवाव्या लागल्या, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते
खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते. केंद्रामध्ये सत्तापालट
झाल्यास निवडणूक आयोगातील तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं राऊत म्हणाले.
****
धाराशिव
इथं काल भारतीय जनता पक्षाची चिंतन बैठक घेण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब
दानवे यावेळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजपविरोधात
अपप्रचार केला, पण
आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या खोट्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही, याची खात्री असल्याचं दानवे
म्हणाले.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून
देत आहोत
****
विदर्भाची
पंढरी अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथून निघालेली श्री संत गजानन महाराजांची
पालखी काल मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्याल्या वाढोणा फाटा इथं दाखल
झाली. याबाबत अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून....
Byte…
संत
एकनाथ महाराजांचे गुरु संत जनार्दन स्वामींच्या पालखीनेही काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
दौलताबाद इथून पंढरपूरकडे प्रस्थान केलं
****
टी-ट्वेंटी
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर एट फेरीच्या गट एकमध्ये गुणांकनानुसार पहिल्या स्थानावर
असलेल्या भारताचा आज ऑस्ट्रेलियासोबत सामना होणार आहे. सेंट लुसिया इथं होणारा हा सामना
भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल.
दरम्यान, काल अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा
२१ धावांनी पराभव केला. अफगाणिस्ताननं निर्धारित षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात १४८
धावा करत ऑस्ट्रेलियासमोर १४९ धावांचं आव्हान ठेवलं, मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ विसाव्या षटकाचे चार चेंडू
शिल्लक असतांना १२७ धावांवर सर्वबाद झाला. कालच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं अमेरिकेचा
दहा गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत सध्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज दरम्यान
सामना सुरु आहे.
****
महिला
क्रिकेटमध्ये, भारतीय
संघानं दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात सहा खेळाडू राखून विजय
मिळवला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांची मालिका तीन - शून्य अशी जिंकली आहे.
काल झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दिलेलं २१६ धावांचं लक्ष्य भारतीय
संघानं एकेचाळीसाव्या षटकांत पूर्ण केलं. स्मृती मंधनानं सर्वाधिक ९० धावांचं योगदान
दिलं तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं ४२ धावा केल्या.
****
राज्याचे
क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी तालुका क्रीडा संकुलांना पाच कोटी, तर जिल्हा संकुलांना १०
कोटी रुपये अनुदान जाहीर केलं आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं आणि महाराष्ट्र
क्रीडा संचालनालयाच्या सहकार्याने काल ऑलिम्पिक दिनानिमित्त पुण्यात घेतलेल्या कार्यक्रमात
ते बोलत होते. खेळामध्ये मुला मुलींना समान संधी देण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
खेलो इंडिया आणि राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या पुरस्कारांच्या
रकमेत वाढ करण्यात आली आहे, खेळाडूंचं सातत्य असंच कायम राहिल्यास ही रक्कम तिप्पट
केली जाईल असं बनसोडे यांनी यावेळी सांगितलं.
****
लातूर
जिल्हा पोलीस दलातली पोलीस शिपाई भरती, कालच्या पावसामुळे रद्द करण्यात आली. आता या उमेदवारांची
चाचणी उद्या २५ जून रोजी घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी उद्या पहाटे चार वाजता
हजर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
छत्रपती
संभाजीनगर इथंही पोलिस शिपाई पदासाठीची कालची मैदानी चाचणी पावसामुळे रद्द करण्यात
आली होती, ती
आज होत आहे.
****
युवा
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक देविदास सौदागर यांचा काल धाराशिव इथं जिल्हा
पत्रकार संघ आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. उसवण कादंबरीतून
सर्वसामान्यांचं जगणं मांडलं, ते लोकांना आपलंस वाटलं, यापुढेही साहित्य सेवा अशीच सुरू ठेवणार असल्याची
भावना सौदागर यांनी यावेळी व्यक्त केली. युवा साहित्य अकादमी नामांकन मिळालेल्या केतन
पुरी आणि पूजा भडांगे या युवा
साहित्यिकांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं सातारा परिसरातल्या रहिवाशांनी काल गुंठेवारीविरोधात आंदोलन केलं. आपली
घरं गुंठेवारीतून मुक्त करावीत अशी मागणी आंदोलनाकांनी केली. विधान परिषदेचे विरोधी
पक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी आंदोलकाशी संवाद साधत
त्यांच्या मागण्या समजून घेतल्या.
****
जलजन्य
आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लातूर जिल्ह्यात ‘मिशन जलस्त्रोत शुद्धीकरण’ मोहीम
राबवली जाणार आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि पंचायत विभाग यांच्या समन्वयातून
२४ जून ते आठ जुलै या पंधरा दिवसांच्या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेत ग्रामीण
भागातील जवळपास चार हजार ९१७ जलस्त्रोतांचं शुद्धीकरण केलं जाणार आहे.
****
परभणी
जिल्ह्यात पूर्णा इथं वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांचं काल आमदार
रत्नाकर गुट्टे आणि उपविभागीय अधिकारी जीवराज डापकार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात
आलं. या प्रकल्पासाठी १४ कोटी रुपये निधी खर्च केला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment