Friday, 5 July 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 July 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      सैन्यदलाचे विविध शौर्य पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान

·      विश्वविजेत्या क्रिकेट संघातल्या राज्यातल्या खेळाडूंचा विधीमंडळात गौरव

·      महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक आज विधानसभेत सादर

आणि

·      वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठीची नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्टला

****

सैन्यदलात अतुलनीय शौर्यासाठी दिले जाणारे कीर्तिचक्र तसंच शौर्यचक्र पुरस्कार आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आज प्रदान केलेल्या पुरस्कारांपैकी मरणोत्तर सात कीर्तिचक्र तसंच मरणोत्तर नऊ शौर्यचक्रांचा समावेश होता. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडून हे पुरस्कार स्वीकारले.

****

विश्वविजेत्या क्रिकेट संघातल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा आज विधानभवनात सत्कार करण्यात आला. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम् दुबे, यशस्वी जयस्वाल, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे तसंच संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच विधीमंडळाच्या दोन्ही सदनांचे सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा, सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी एक कोटी रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. त्यापूर्वी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानीही मुख्यमंत्र्यांनी या खेळाडूंना सन्मानित केलं.

****

स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आलं. शासनाच्या विविध विभाग आणि प्राधिकरणाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना या कायद्यातील तरतुदी लागू असतील. परीक्षेत अयोग्य मार्गांचा वापर करणाऱ्यांना ३ ते ५ वर्ष तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंड करण्याची तरतूद या विधेयकात आहे. तसंच परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेला एक कोटी रुपये पर्यंत दंड आणि परीक्षेचा खर्च वसूल करण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित संस्थेला पुढची ४ वर्ष कोणतीही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी दिली जाणार नाही. सेवा पुरवणाऱ्या संस्थेच्या दोषी कर्मचाऱ्यांनाही ३ ते १० वर्ष तुरुंगवास आणि १ कोटी रुपये दंड आकारला जाणार आहे. दरम्यान, पेपर फुटीच्या प्रकारांची चौकशी आता पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जाणार आहे.

****

बिहार आणि आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावर राज्य सरकारचा ५८ टक्के खर्च होतो. भविष्यात हा खर्च वाढत जाणार असल्यानं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं ते म्हणाले. ‘राज्याचा सर्वांगीण विकासहाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केल्याचं पवार यांनी नमूद केलं.

दरम्यान, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विधान परिषदेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत ते आज बोलत होते. वीजदेयकात सवलत देणाऱ्या कृषी संजीवनी योजनेसह शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी असल्याचं सांगत, शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश शिलाईच्या प्रक्रियेवर दानवे यांनी आक्षेप घेत, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश वाटप करावं, अशी मागणी दानवे यांनी केली.

मराठवाड्यासाठी घोषीत ४६ हजार कोटी रुपयांची घोषणा गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या बैठकीत करण्यात आली होती, मात्र अर्थसंकल्पात यासंदर्भात काहीही ठोस उल्लेख नसल्याचं, तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या धावपट्टीच्या विकासासाठी ७३४ कोटी रुपयांची आवश्यक असतांना, सरकारकडून काहीही मदत केली गेली नसल्याचं, दानवे यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या जवळपास ३० लाख फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण आखण्याची गरज, काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. २०१४ साली लोकसभेने फेरीवाल्यांसदर्भात कायदा केला, राज्याने तशाप्रकारे फेरीवाला धोरण आखणं अपेक्षित होतं, परंतु १० वर्षानंतरही राज्यात फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण नाही, असं पटोले म्हणाले. पावसाळा सुरु असताना फेरीवाल्यांवर कारवाई करणं अन्यायकारक असून, ही कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी पटोले यांनी केली. या मुद्द्यावर मंगळवारी चर्चेचं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे.

****

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आज विधान भवनातील उपाहारगृहात भरडधान्य महोत्सव” घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद घेतला.

****

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोणीही अर्ज मागे न घेतल्याने या निवडणुकीसाठी आता मतदान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून, १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवारांनं पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवणं आवश्यक आहे.

****

वैद्यकीय शिक्षणासासाठीची पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे, याबाबत राष्ट्रीय वेद्यकीय शिक्षण परीक्षा परिषदेने एक परिपत्रक जारी केलं असून, ११ ऑगस्टला दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. परीक्षा परिषदेने गेल्या २२ जून रोजी नियोजित असलेली ही परीक्षा पुढे ढकलली होती.

****

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी - एसएनडीटी महिला विद्यापीठाने आपली आंतरराष्ट्रीयस्तरावर 'दृश्यता' वाढवण्यासाठी एक प्रदर्शन केंद्र तसंच विद्यार्थ्यांसाठी आऊटरीच सेंटर निर्माण करावं, अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केली आहे. विद्यापीठाचा १०९वा स्थापना दिवस आज मुंबईत राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. देशी बियाणांच्या जतनासाठी कार्य करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपरे या कार्यक्रमाला विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. माती वाचवली तर पिढ्या वाचतील असं सांगून विद्यार्थिनींनी पुस्तकासोबत निसर्गाचं देखील ज्ञान घ्यावं, असं आवाहन राहीबाई पोपरे यांनी यावेळी केलं.

****

कांदा आणि दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी अहमदनगर इथं आज खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बस स्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह सहभाग घेतला.

****

बीड जिल्ह्यातल्या शिरूर-कासार तालुक्यातल्या रेल्वे मार्गावरील गावांमध्ये उड्डाण पूल उभारण्यात यावेत, यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन हा प्रश्न रेल्वेमंत्र्यांशी बोलून मार्गी लावण्याची विनंती केली आहे. रेल्वेमंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने क्षीरसागर यांनी पवारांची भेट घेतल्याचं त्यांनी कळवलं आहे.

****

 

धनगर आरक्षणासाठी लातूर इथं सुरू असलेल्या आंदोलनाकडे आमदार धीरज देशमुख यांनी विधानसभेचं लक्ष वेधलं. शासनानं एक शिष्टमंडळ पाठवून या आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्याची विनंती देशमुख यांनी केली. धीरज देशमुख यांच्या या सूचनेची दखल घेण्याचे निर्देश तालिका अध्यक्षांनी दिले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसमृध्दी गाव अभियानाला आजपासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत गावातील जलस्त्रोतांच्या पुर्नभरणावर भर दिला जाणार असल्याचं, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं, ‌त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वन विभागाच्या वतीने शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयासाठी मोफत रोपटे वितरित करण्यात येत असल्याची माहिती स्वामी यांनी दिली.

****

समस्यांचं समाधान म्हणजेच संशोधन असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र लडकत यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं, ‘स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूलया प्रकल्पाअंतर्गत हर्सुल इथल्या महापालिकेच्या शाळेत ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. विद्यार्थ्यांनी प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, याच अनुभवातून समस्येचं उत्तर नक्की मिळतं, असं लडकत यांनी सांगितलं.

 ****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...