Tuesday, 30 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.07.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 30 July 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३० जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

केरळच्या वायनाड जिल्ह्यात मेपाडी जवळच्या डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनातल्या मृतांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. तर ६६ हून अधिक जखमींना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घनटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींच्या उपचारासाठी ५० हजार रुपांची मदत जाहीर केली आहे.

****

२०१४-१५ च्या तुलनेत अर्थसंकल्पात तिप्पट वाढ झाली असून यंदाचा अर्थसंकल्प ४८ लाख कोटी रुपयांचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकसित भारताच्या दिशेने प्रवास या विषयावरच्या अर्थसंकल्प पश्चात परिषदेच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करत होते. भारतीय उद्योग संघ - सीआयआयनं या परिषदेचं आयोजन केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक मान्यवर या परिषदेला उपस्थित होते. गेल्या दहा वर्षात भांडवली खर्चही ११ लाख कोटी रुपयांहून अधिक झाला असून, रेल्वे तसंच महामार्गांसाठीच्या तरतुदी आठ पट, कृषीच्या चारपट, तर संरक्षण क्षेत्राच्या तरतुदी दुप्पट वाढवल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. प्रत्यक्ष कराच्या दरातही मोठी कपात केल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज सायंकाळी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देणार आहेत.

****


शेतकरी कल्याणासाठी केंद्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. काँग्रेसचे दीपेंद्र हुड्डा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात बोलतांना चौहान यांनी, काँग्रेस सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देण्यास नकार दिल्याकडे लक्ष वेधत, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दिल्या जाणाऱ्या हमी भावाचा आढावा घेत, सरकार खरेदी करत असलेल्या धान्याचा आढावाही सदनासमोर सादर केला.

****

लोकसभेत शून्य काळात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेत, त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची मागणी केली.

****

हावडा-मुंबई रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय यांनी रेल्वे सुरक्षेचा मुद्दा आज शून्यकाळात उपस्थित केला. रेल्वे मंत्र्यांनी सदनात याबाबत निवेदन सादर करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, झारखंडमध्ये जमशेदपूरजवळ आज पहाटे हावडा-मुंबई रेल्वे रुळावरून घसरून झालेल्या या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले. अपघातामुळे या मार्गावरील  ५ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

****

नाशिक इथं आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मगिरीपासून नांदुरमध्यमेश्वर पर्यंत सांडपाण्याचं ऑडिट करावं आणि नदीपात्रात ते मिसळणार नाही यासाठी कृती आराखडा तयार करावा अशी सूचना नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली आहे. धरणांमधून पाणी सोडल्यानंतर गोदावरी नदीची पाणी पातळी किती वाढेल यासंदर्भात स्वयंचलित यंत्रणा राबवण्याबाबतही त्यांनी सूचना केली.

****

कोल्हापुरात पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून, जनजीवन पुन्हा पूर्ववत होत आहे.

सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला, मात्र पूरस्थिती अद्याप कायम आहे.

गडचिरोली जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, विविध धरणांतून मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने, जिल्ह्यातल्या १३ मार्गांवरील वाहतूक ठप्प आहे.

****

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीत भारताच्या मनिका बत्रानं अंतिम १६ मध्ये प्रवेश केला आहे. मनिकानं फ्रान्सच्या प्रिथिका पावडे हीचा तीन - शून्य असा पराभव केला. 

दरम्यान, या स्पर्धेत आज नेमबाजीमध्ये दहा मीटर एयर पिस्तुल प्रकारात मिश्र दुहेरीत मनु भाकर आणि सरबजोत सिंग यांची कांस्य पदकासाठी लढत होत आहे. रोईंगमध्ये पुरुष एकेरीत बलराज पनवारचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज होणार आहे.

****

श्रीलंकेत सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघात तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना आज खेळवला जाणार आहे. भारतीय संघानं पहिले दोन सामने जिंकून मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.

****

मध्य रेल्वेच्या दौंड रेल्वे स्थानकावरील लाईन ब्लॉक मुळे आज धावणारी निजामाबाद -पंढरपूर आणि उद्याची पंढरपूर-निजामाबाद या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून ही माहिती देण्यात आली.

****

No comments: