Friday, 2 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,दिनांक:02.08.2024 रोजीचे सकाळी:11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०२ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आजपासून दोन दिवस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपालांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला सर्व राज्यांचे राज्यपाल उपस्थित राहणार आहेत. तीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, उच्च शिक्षणात सुधारणा आणि विद्यापीठांची मान्यता, आदिवासी क्षेत्र, आकांक्षी जिल्हे आणि तालुके तसंच सीमावर्ती भागांचा विकास, आदी मुद्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. परिषदेच्या समारोप सत्रात राज्यपाल गटा- गटांच्या माध्यमातून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर सहभागींसमोर सादरीकरण करणार आहेत.

****

केरळमध्ये वायनाड इथं झालेल्या भूस्खलनातल्या मृतांची संख्या तीनशेच्या वर गेली आहे. या भागात अजुनही शोध आणि बचाव कार्य सुरु आहे.

****

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४ काल लोकसभेत सादर केलं. या विधेयकाअन्वये २००५ च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यात बदल करून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची कार्यपद्धती बळकट करण्यात येणार आहे.

****

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचं या वर्षासाठीचं दुसरं जागतिक कृषी पारितोषिक महाराष्ट्राला जाहीर झालं आहे. फोरमच्या अध्यक्षांनी पत्राद्वारे याबाबत माहिती दिली. या पुरस्कारासाठी राज्यात पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.

****

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत राज्यात एक कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल झाल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दरम्यान, राज्यात जुलै अखेर सुमारे ९७ टक्के पेरणी पूर्ण झाली असून, पीकविमा योजनेच्या माध्यमातून एक कोटी दहा लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या नांदुर मधमेश्वर प्रकल्पातून गोदावरी नदी पात्रामध्ये सुरु असलेल्या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर तसंच नेवासा तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरील गावातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 18 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...