Saturday, 3 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.08.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 August 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      पश्चिम घाट परिसर ‘संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करणारी मसुदा अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी

·      सर्वोच्च न्यायालयाच्या लोक अदालतीमध्ये एक हजारांहून अधिक खटले निकाली

·      अन्य राज्यातल्या आयुर्वेदिक पदवीधरांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      राष्ट्रीय अवयवदान दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा

आणि

·      पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकारात नेमबाज मनू भाकरला पदकाची हुलकावणी

****

पश्चिम घाट क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या महाराष्ट्रासह सहा राज्यांमधल्या ५६ हजार ८०० चौरस किलोमीटर पेक्षा जास्त परिसराला ‘पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन मसुदा अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या सहा राज्यांचा यात समावेश आहे. या संदर्भात सरकारनं जनतेकडून येत्या साठ दिवसांमध्ये सूचना आणि हरकती मागवल्या असून नागरिक esz-mef@nic.in या संकेतस्थळावर त्याची नोंद करू शकतात.

सहा राज्यातला हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यानंतर या भागात उत्खनन, खाणकाम आणि मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास, आदी कामांवर बंधनं येतील, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

****

सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या लोक अदालतीमध्ये एक हजारहून अधिक खटले निकाली निघाले आहेत. याअंतर्गत दिवाणी, भूसंपादन आणि विवाहविषयक अनेक खटले मार्गी लागले अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचं ७५ वं स्थापना वर्ष साजरं करण्यासाठी न्यायालयानं हाती घेतलेल्या विशेष लोक अदालत उपक्रमाचा आज अखेरचा दिवस आहे.

****

जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं ३२व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं, त्या वेळी ते बोलत होते. देशात रसायनमुक्त, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या परिषदेत सुमारे ७५ देशांच्या एक हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. ‘शाश्वत कृषी-अन्न प्रणालीच्या दिशेने परिवर्तन’ ही यावर्षीची परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे.

****

अन्य राज्यातून बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज वर्षा या निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. या विद्यार्थ्यांना आता राज्याच्या शासकीय आणि खाजगी अनुदानित ८५ टक्के तसंच खाजगी विना अनुदानित ७० टक्के कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.

****

राज्यातल्या सर्व ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, १६३ शासकीय तंत्र विद्यालयातील संविधान मंदिरांचं, येत्या १५ ऑगस्टला एकत्रित दूरदृश्य पद्धतीने उद्‌घाटन करण्यात येणार आहे. कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्य कौशल्य विद्यापीठ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याठिकाणी विद्यार्थ्यांना घटनात्मक अधिकार समजण्यासाठी कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. २६ जूनला संविधान मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय लोढा यांनी घेतला होता.

****

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग आणि आयुष संचालनालय यांच्यावतीनं आज राष्ट्रीय अवयवदान दिन पाळण्यात आला. यानिमित्त राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुष महाविद्यालयामार्फत अवयवदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.

मुंबईत विधानसभा अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर यांच्या हस्ते अवयवदान जनजागृती प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विभागाद्वारे अवयवदात्यांचा गौरव करण्यात आला. अवयवदान मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन नार्वेकर यांनी यावेळी केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय - घाटीच्या वतीनं गेल्या जवळपास महिनाभर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वक्तृत्व, भित्तीपत्रक, रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात आल्या. आज जनजागृती फेरीने या उपक्रमांचा समारोप झाला. जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार, घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांच्या उपस्थितीत निघालेली ही जनजागृती फेरी शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, पुन्हा घाटी रुग्णालयात विसर्जित झाली. अवयवदानाविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता पालकमंत्री सत्तार यांनी यावेळी व्यक्त केली.

 

धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबसे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमानंतर अवयवदान जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी पथनाट्य, काव्यवाचन, घोषणा, वक्तृत्व, रांगोळी यासारख्या उपक्रमांमधून अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात आली. तसंच सर्वांना अवयवदानाची शपथ देण्यात आली.

****

नंदुरबार शहरातूनही आज अवयवदान दिनानिमित्त जनजागृती फेरी काढण्यात आली. यात शासकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग होत अवयवदाना विषयी जनजागृती केली. यावेळी भित्तीपत्रक, रांगोळी यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं.

****

बीडचे माजी खासदार क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे इथल्या निवासस्थानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

****

पॅरीस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आज आठव्या दिवशी भारताची नेमबाज मनू भाकर हिला २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकाराच्या अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मनूने या स्पर्धेत आतापर्यंत दोन कांस्यपदकं मिळवली आहेत. भारताच्या दीपिका कुमारीने तिरंदाजीमध्ये महिला गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. नेमबाजीत महिला एकेरीत भजन कौरचा इंडोनेशियाच्या दयानंद कोइरुनिसाकडून पराभव झाला. बॉक्सिंगमध्ये, निशांत देव आज रात्री पुरुषांच्या ७१ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत मेक्सिको विरुद्ध खेळणार आहे.

****

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नियोजन करतांना शिक्षण आणि आरोग्य या घटकांना प्राधान्य देऊन सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गेल्या वर्षाचा आर्थिक अहवाल सादर करण्यात आला, तसंच २०२४-२५ या वर्षासाठी ७७३ कोटी ९० लाख रुपयांच्या खर्चाला मंजूरीही देण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या ६७२ कोटी ११ लक्ष ३७ हजार रुपयांच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली.

दरम्यान, सिल्लोड, सोयगाव तालुक्यातल्या जलसंधारण प्रकल्पांचा पालकमंत्री सत्तार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीत आढावा घेतला. घाटनांद्रा बंधाऱ्यावरील प्रकल्पाची पुनर्रचना आणि बांधणी करण्यासाठी प्रकल्पाचा आराखडा तयार करून तात्काळ मंजुरी घ्यावी आणि जलसंधारणाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश सत्तार यांनी यावेळी जलसंपदा विभागाला दिले.

****

लातूर पोलीस दलाच्या दामिनी पथकातर्फे तयार करण्यात आलेल्या 'इंस्पेक्टर दामिनी' या चित्रमय पुस्तकाचं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. जिल्ह्यात चाकूर तालुक्यात जानवळ इथल्या जनार्धनराव राजेमाने आश्रमशाळेत झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब माने, प्राचार्य निलेश राजेमाने, दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले, आदर्श मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकात छोट्या गोष्टी आणि चित्रांच्या माध्यमातून दामिनी पथक आणि ११२ या मदत क्रमांकाच्या सेवेबद्दल सविस्तर माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे. विद्यार्थिनींना अडचणीच्या वेळी दामिनी पथकाच्या माध्यमातून मदत घेण्याचं आवाहन पोलिस अधीक्षक मुंडे यांनी यावेळी केलं.

****

राज्य सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा १५ ऑगस्टपासून जुन्या जालन्यातील गांधी चमन इथं आमरण उपोषण करण्याचा इशारा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं समितीची राज्यव्यापी बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीला ३० जिल्ह्याचे समन्वयक उपस्थित होते. ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करावं, समाजातील विद्यार्थांसाठी प्रत्येक जिल्हयात वसतीगृह उभारावं, सर्वांना मोफत शिक्षण द्यावं, पौरोहित्य करणाऱ्यांना प्रतिमहा पाच हजार रुपये मानधन द्यावं, आदी मागण्या समितीने केल्या आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...