आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· होमगार्ड, कोतवाल, ग्राम रोजगार सेवकांना मानधन वाढ, देशी गाईला राज्यमाता दर्जा देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
· २०२३ च्या खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाला सुरुवात
· विशेष शिक्षकांच्या पावणे पाच हजारांहून अधिक पदांची निर्मिती, तसंच परळी तालुक्यात तीस हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट उभारण्यात येणार
· मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात
आणि
· भारत-बांगलादेश कानपूर कसोटी रंगतदार वळणावर
****
राज्यातले होमगार्ड, कोतवाल, ग्राम रोजगार सेवकांना मानधन वाढ, तसंच विशेष शिक्षकांच्या पावणे पाच हजारांहून अधिक पदांची निर्मिती आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचे निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली.
होमगार्डला मिळणारा कर्तव्य भत्ता ५७० रुपयांवरुन एक हजार ८३ रुपये होईल. कोतवालांना मानधनात १० टक्के वाढ आणि अनुकंपा धोरण, तर ग्राम रोजगार सेवकांना आता सात हजार रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. याशिवाय विशेष शिक्षकांच्या ४ हजार ८६० पदांची निर्मिती, तसंच राज्य सरकारच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठीचं सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख होणार आहे.
****
देशी गाईला राज्यमाता हा दर्जा देण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. गोशाळांना देशी वंशाच्या गायीसाठी प्रति गाय- प्रति दिन ५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सदर योजना कायमस्वरूपी असून या योजनेमुळे गोशाळांवरचा आर्थिकभार कमी होईल, असा विश्वास पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
**
२०२३ च्या खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाला काल या बैठकीतून प्रारंभ करण्यात आला. पाच हजार रुपये प्रति हेक्टर, याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात येत आहेत.
यामध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या तीन लाख ७१ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. मात्र, ई-पीक पाहणी न केलेले आणि सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद नसलेले साधारणपणे पाच टक्के शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत, त्यांनाही अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं.
**
लातूर जिल्ह्यातल्या हासाळा, उंबडगा, पेठ आणि कव्हा, इथल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामाला मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात तीस हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट तर नाशिक जिल्ह्यात मालेगाव जवळ सुमारे सहा हेक्टर क्षेत्रात डाळिंब इस्टेट उभारण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी ९८ कोटी रुपये निधीची तरतूद केल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारनं काल स्वीकारला.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. २६ सप्टेंबरला सुमारे ३८ लाख ९८ हजार ७०५ बहिणींच्या खात्यात एकूण पाच हजार ८४८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि अन्य योजनांचा आनंद सोहळा येत्या सात ऑक्टोबरला नांदेडमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी पवार यांच्या हस्ते उदगीर शहरातल्या विविध शासकीय इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून घेतल्या जाणार आहेत. या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. हे नेते एक ते आठ ऑक्टोबरपर्यंत आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील आणि १० ऑक्टोबरपर्यंत आपला गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करणार आहेत.
****
शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण देणार्या ‘हर घर दुर्गा’ अभियानाचा शुभारंभ काल मुंबईत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाला. देशातल्या तरुणींमध्ये दुर्गासारखी शक्ती आणि सामर्थ्य येवुन अन्याय आणि अत्याचाराला प्रतिकार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हे अभियान नक्कीच मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास बिर्ला यांनी व्यक्त केला. कौशल्य विकास मंत्री मंलग प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचं शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला.
****
भारत-बांगलादेश कसोटी रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे. पहिल्या सुमारे तीन दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर, काल चौथ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला. भारतीय संघानं जलद धावा करत ३५ षटकांत ९ बाद २८५ धावांवर डाव घोषीत केला. यशस्वी जयस्वालनं ७२, तर के एल राहुलनं ६८ धावा केल्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशच्या दुसऱ्या डावात दोन बाद २६ धावा झाल्या होत्या. बांगलादेश अजूनही २६ धावांनी पिछाडीवर आहे.
****
जागतिक तीरंदाजी महासंघातर्फे चायनीज तैपेई इथं घेण्यात आलेल्या आशियाई तीरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचा धनुर्धर रैयान सिद्दिकी यानं सुवर्ण पदक जिंकलं आहे. यामुळे तो आशियाई धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारा मराठवाड्यातला पहिला धनुर्धर ठरला आहे. काल ज्युनियर रिकर्व्ह प्रकाराच्या अंतिम सामन्यात यजमान चायनीज तैपेई संघाला नमवत भारतीय संघानं विजेतेपद पटकावलं.
****
जालना इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दुसऱ्या सुनावणीत चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करता १०० जागेची मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय कला जारी करण्यात आला. जालना जिल्ह्यातल्या सर्वांसाठी आरोग्य सेवेतली महत्वाची बाब म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मैलाचा दगड ठरेल, असं मत जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केलं आहे.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागातल्या नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्याच्या निवडणूक नोडल अधिकारी आणि प्रशिक्षण अधिकाऱ्यांची कार्यशाळा काल नांदेडमध्ये घेण्यात आली. मतदानाची टक्केवारी वाढवणं हे निवडणूक आयोगाचं पहिलं उद्दीष्ट असल्याचं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याकार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात किल्लारी इथल्या भूकंपाला काल ३० वर्ष पूर्ण झाली. धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या सास्तूर चौरस्ता इथं काल या भूकंपात प्राण गमावलेल्या नागरीकांना सामुहिक आदरांजली अर्पण करण्यात आली. आमदार ज्ञानराज चौगुले यांची यावेळी प्रमुख उपस्थित होती.
****
तारांगण, ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याला या वर्षी शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं जागतिक स्तरावर ‘शंभर तास खगोलशास्त्र-तारांगणाची शंभर वर्षं‘ हा उपक्रम आयोजित केला आहे. यात जगभरातल्या चार हजार तारांगणांचा सहभाग राहणार असून, यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशनच्या डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम खगोल अंतराळविज्ञान केंद्राचा समावेश आहे. या उपक्रमानिमित्त या केंद्रात येत्या दोन ते सहा ऑक्टोबर या कालावधीत अंतराळ विज्ञान विषयक माहितीपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर, हिमायतनगर आणि धर्माबाद इथं आज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या तालुक्यांमधल्या पात्र सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यांना उपस्थित रहावं, असं आवाहन नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment