Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 October 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
चालू आर्थिक वर्षात भारताच्या सकल घरगुती उत्पादनाचा वृद्धिदर
सात टक्के राहण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी- आयएमएफ-नं कायम ठेवला आहे. जागतिक
अर्थव्यवस्थेसंदर्भातला आपला ताजा अहवाल आयएमएफ-नं प्रसिद्ध केला असून, पुढच्या आर्थिक वर्षात भारताचा वृद्धिदर साडेसहा टक्के
राहील, असा अंदाजही त्यात वर्तवला आहे.
****
शीख समुदायाचं पवित्र स्थळ असलेल्या श्री कर्तारपूर साहिबला
जाणा-या मार्गासंबंधीच्या, भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या कराराला पाच वर्षांची मुदतवाढ
देण्यात आली आहे. शीख समुदायाला आपल्या पवित्र स्थळाला भेटी देता याव्यात, यासाठी केंद्र सरकारचे सतत प्रयत्न सुरू असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
स्वतंत्र भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्तानं
देशभरात, २०२४ ते २०२६ अशी दोन वर्षं विशेष
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी आज ही माहिती दिली.
****
केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी
काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल गांधी
यांनी या जागेवरुन खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
****
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या पहिल्या
दिवशी, राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ अर्ज
दाखल झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे.
बीड जिल्ह्यात काल ४८३ अर्जाची विक्री झाली तर तीन अपक्ष
उमेदवारांचे अर्ज दाखल झाले.
लातूर जिल्ह्यात अहमदपूर मधून पाच अपक्ष उमेदवारांनी काल
अर्ज भरले. परभणी तसंच जिंतूर विधानसभा मतदार संघात काल पहिल्याच दिवशी प्रत्येकी एक
नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलं.
पाथरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र
पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
जालना जिल्ह्यात काल दोन जणांचे एकूण तीन अर्ज दाखल झाले.
घनसावंगी मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवाजीराव चोथे यांनी
दोन तर जालना विधानसभा मतदारसंघासाठी मिलिंद बोर्डे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला.
****
अवैधरीत्या उत्पादित होणारी गावठी दारू तसंच बनावट आणि
परराज्यातून कर बुडवून येणाऱ्या देशी आणि विदेशी दारू विरुद्ध पोलीस आणि राज्य उत्पादन
शुल्क विभाग आता संयुक्तपणे कारवाई करणार आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाचे
आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी नांदेड
इथं आढावा बैठक घेतली, त्यानंतर त्यांनी ही
माहिती दिली. परराज्यातून अवैधपणे दारू राज्यात येऊ नये, यासाठी तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमांवर पोलीस आणि उत्पादन
शुल्क विभागाचे चार संयुक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.
****
लातूर जिल्हा प्रशासनातर्फे आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी
सुरू आहे. या अंतर्गत लातूर पोलिसांनी औसा तालुक्यात एकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
दाखल केला असून १५ जणांवर अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
'फेक स्पीच' तसंच समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणीही
पाच गुन्हे दाखल झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पुणे जिल्ह्यातल्या रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात अवैधपणे
राहणा-या दहा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. काल एका गुन्हेगारी प्रकरणाच्या
तपासातून या नागरिकांबाबत ही माहिती मिळाली. या व्यक्तींकडे आधार कार्ड, मतदारपत्र आणि पॅन कार्डसुद्धा आढळलं. या दहा आरोपींना
न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे.
****
शासनानं ठरवून दिलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडं आकारणा-या
खाजगी बस सेवांच्या विरोधातल्या तक्रारी स्वीकारण्याची मोहीम प्रादेशिक परिवहन कार्यालयानं
सुरू केली आहे. येत्या नऊ नोव्हेंबरपर्यंत या तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. अशा
तक्रारी करू इच्छिणा-या नागरिकांनी आपलं नाव आणि बससेवेच्या तिकिटाचं छायाचित्र ८२
७५ ३३ ०१ ०१ या व्हॉट्स अप क्रमांकावर पाठवावं, असं आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयानं केलं आहे.
****
मुख्याध्यापक संघाचं एकसष्टावं राज्यस्तरीय अधिवेशन २८
आणि २९ डिसेंबर रोजी लातूरला होणार आहे. अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळाच्या राज्य कार्यकारिणीच्या लातूर मध्ये झालेल्या बैठकीत
हा ठराव मंजूर करण्यात आला.
****
भारत आणि जर्मनी यांच्यातल्या हॉकी मालिकेतला पहिला सामना
आज नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद मैदानावर होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरूवात
होईल. दहा वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा दिल्लीत होत असल्यानं ही मालिका विशेष
आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जर्मनीविरुद्ध दोन सामने खेळणार
आहे. हॉकी इंडियाने डिजिटल तिकीट प्रणालीद्वारे प्रेक्षकांना मोफतप्रवेश देण्याची घोषणा
केली आहे.
****
No comments:
Post a Comment