Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 October 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला
वेग आला आहे. आज जवळपास सर्वच पक्षांचे अनेक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. २९ तारखेपर्यंत
उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.
बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे, कळमनुरी इथून शिवसेनेचे संतोष बांगर यांनी महायुतीकडून अर्ज
दाखल केला. येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, कोथरुड मधून भाजपचे चंद्रकांत पाटील, आंबेगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, शिर्डी इथून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईत मलबार हिल्स इथून भाजपचे मंगलप्रभात लोढा, तर कांदिवली पूर्व मधून भाजपचे अतुल भातखळकर हे देखील
आज अर्ज दाखल करत आहेत.
इंदापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे
महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज अर्ज दाखल केला. पक्षाच्या नेत्या
खासदार सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित होत्या. याशिवाय महाविकास आघाडीकडून कळवा -मुंब्रा
विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड, वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे, तर इस्लामपूर मतदातसंघातून जयंत पाटील अर्ज दाखल करणार आहेत
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या दुसऱ्या दिवशी १५३ उमेदवारांचे
१६४ अर्ज दाखल झाले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवल्या आहे.
****
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून, तसंच स्थानिक प्रशासनांनकडून विविध उपक्रम राबवले जात
आहेत. नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीनं काल प्रतिभा निकेतन महाविद्यालयात घेण्यात
आलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमात वैष्णवी साहू आणि गौरांक दरक या दोन नवमतदारांचं
कौतुक आणि अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदान करणं आवश्यक
असल्याचं ओळखून मतदार यादीत नाव नोंदवल्याबद्दल हा सत्कार केल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात ‘माझी सोसायटी
जागरूक सोसायटी’ या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
नवी मुंबईत दिघा इथल्या महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना
मतदानाचं महत्व सांगत त्यांच्यामार्फत पालकांना मतदान करण्याकरता प्रोत्साहित करण्याबाबत
आवाहन करण्यात आलं. तसंच मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, या विषयावर रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
****
राज्यात आचारसंहिता लागू असून, अनेक ठिकाणी कारवाया करुन अवैध वाहतुकीला आळा घातला जात
आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी काल रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यवाहतूक
करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करून एक कोटी सहा लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल
जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांजा तालुक्यातल्या देवधे तिठा इथं एका कारमधून ५९
लिटर विदेशी मद्य आणि ३० लिटर देशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याचं दिसून आलं. हा
मद्यसाठा आणि वाहन असा चार लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
****
जळगाव जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक
डॉ.महेश्वर रेड्डी यांनी ऑपरेशन ऑल आऊट, कोंबिंग नाकाबंदी करून एक कोटी ४५ लाख रुपये रोख रक्कम जप्त
केली. तर धुळे पोलिसांनी सहा पिस्तुलं, आठ जिवंत काडतुसं, १६ तलवारी, एक कोयता, गुप्ती अशी घातक शस्त्रे आणि अन्य वस्तू जप्त केल्या. पोलिसांनी
१७ फरार आरोपींना अटक केली असून, २४ लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११५वा
भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार उद्या २५ तारखेपर्यंत
एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, मायजीओव्ही ओपन फोरमवर किंवा नमो ॲप वर नोंदवण्याचं आवाहन
करण्यात आलं आहे.
****
अल्बानिया मध्ये सुरु असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक
कुस्ती स्पर्धेत भारताच्या विश्वजीत मोरे यानं कांस्य पदक जिंकलं. पुरुषांच्या ५५ किलो
वजनी गटात त्यानं हे पदक जिंकलं. तत्पूर्वी या स्पर्धेत महिलांच्या ५९ किलो वजनी गटात
भारताच्या अंजलीने अंतिम फेरीत प्रवेश केला. काल उपान्त्य फेरी तीने इटलीच्या खेळाडुचा
पराभव केला.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेतला दुसरा सामना पुणे इथं सुरु झाला असून, न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं
वृत्त हाती आलं तेव्हा त्यांच्या दोन बाद १३७ धावा झाल्या
होत्या.
****
महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला
पहिला सामना आज अहमदाबाद इथं होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
पूर्व मध्य बंगालच्या खाडी दरम्यान निर्माण झालेलं दाना
चक्रीवादळ आज रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत, भीतरकनिका आणि धामरा दरम्यान ओडिशा राज्याच्या तटिय क्षेत्रावर
धडकण्याची शक्यता असून, ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
यामुळे ओडिशातील केंद्रपाडा, बालासोर आणि भद्रक या जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान होण्याचा अंदाज, असून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment