Tuesday, 12 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.11.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 November 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचे झंजावाती दौरे

·      महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक झाल्याचा भाजप नेते पंतप्रधान मोदी यांचा चिमुर इथल्या सभेत दावा

·      विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांच्या हाती

·      चालू आर्थिक वर्षात देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १५ पूर्णांक ४१ शतांश टक्क्यांची वाढ

आणि

·      छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या गुरुवारी सभांचा दिवस, पंतप्रधान मोदी यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांच्या सभांचं आयोजन

****

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी आता एक आठवडाच शिल्लक असल्यानं सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते झंझावाती दौरे करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेते राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा घेत आहेत. याशिवाय हरयाणा, उत्तरप्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील प्रचाराच्या मैदानात आहेत.

 

महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक झाली असून, विमानतळ, महामार्ग, डिजिटल कनेक्टिव्हीटी, सिंचन, लोहमार्ग, वंदे भारत ट्रेन असा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, असं प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमुर मतदारसंघात आयोजित प्रचारसभेला संबोधित करत होते. महायुती राज्यात सत्तेत आल्यावर विकासाचा वेग दुप्पट होणार असल्याचंही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या संकल्पपत्रात सर्व घटकांचा विचार केल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यात पुन्हा एकदा सत्ता आल्यास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हमीभाव दिला जाईल, असं आश्वासनही मोदी यांनी दिलं. त्यानंतर त्यांनी सोलापूर इथं प्रचारसभेला संबोधित केलं. पुण्यात मोदी यांचा रोड शो आणि सभा होणार आहे.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज मुंबईत दोन सभा झाल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज मराठवाडा दौऱ्यावर असून, लातूर आणि बीड जिल्ह्यात त्यांच्या सभा झाल्या. लातूर जिल्ह्यात देवणी इथल्या सभेत बोलताना त्यांनी, त्या परिसरातल्या रस्ते आणि दळणवळण विषयक कामांची माहिती दिली. किल्लारी, आंबेजोगाई आणि पाटोदा इथं देखील गडकरी यांच्या प्रचारसभा झाल्या.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांनी आज अकोला, अमरावती आणि नागपूर इथं सभा घेतल्या.

शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर इथं महायुतीचे उमेदवार डॉ संजय रायमूलकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी आज नागरीकांशी संवाद साधून प्रचार केला.

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज गोंदिया इथं सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी, काँग्रेसच्या जाहिरनाम्यात असलेल्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला. महाराष्ट्रातले अनेक उद्योग परराज्यात नेले जात असल्याचं सांगून त्यांनी, केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.

दरम्यान, राहुल गांधी यांची बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली मतदारसंघातली आजची नियोजित सभा रद्द झाली. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आपण चिखलीला येऊ शकलो नाही, असं राहुल गांधी यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला हमीभाव मिळत नाही, त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र राज्यात इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर सर्व समस्यांचं निराकरण केलं जाईल, असं आश्वासन गांधी यांनी या संदेशात दिलं.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाशिकच्या कळवण इथं सभा घेतली. संविधानात बदल करण्याचं भाजपचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आज नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांच्या आणखी प्रचारसभा होत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं सभेला संबोधित केलं. राज्यातल्या महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

****

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमधल्या काँग्रेस नेत्यांनी प्रत्यक्षात तिथल्या निवडणुकीत दिलेली कोणतीही आश्वासनं पूर्ण न करता त्या राज्यांमधल्या जनतेची कशी फसवणूक केली याचा पंचनामा त्या राज्यातल्या भाजप नेत्यांनी केला. तेलंगणातले भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, कर्नाटक राज्यातल्या भाजपा नेत्या केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे आणि हिमाचल प्रदेशातले खासदार माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, काँग्रेस नेत्यांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं.

****

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातला सहभाग वाढवण्यासाठी महिला नियंत्रित मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ४५ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असेल, यानंतर जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात - १३, बीड - आठ, जालना आणि लातूर प्रत्येकी सहा, नांदेड - नऊ, धाराशिव - चार, तर परभणी जिल्ह्यात आठ महिला नियंत्रित मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.

****

निवडणूक आचारसंहिता काळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १७ कोटी रक्कम जप्त केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी विकास मीना यांनी दिली.

१५ ऑक्टोबरपासून सात लाख निधी आपण कॅश आपण सीझ केलेला आहे. लीकर, ड्रग्ज हे सगळे कॅटेगरी जर आपण ॲड केली तर सतरा कोटीचं इतकं साहित्य या इतक्या निधीचं आपण सीझ केलेलं आहे.

 

विकास मीना यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली ही मुलाखत, उद्या बुधवारी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी आकाशवाणीवरच्या प्रासंगिक या कार्यक्रमात प्रसारित होईल. आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या यू ट्यूब चॅनलवरही आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल.

****

येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन गायक मिलिंद इंगळे यांनी केलं आहे.

बाईट – मिलिंद इंगळे

****

श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज पुणे जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.

****

 आज लोकसेवा प्रसारण दिन साजरा होत आहे. १९४७ मध्ये महात्मा गांधी यांनी यादिवशी आकाशवाणी स्टुडिओला भेट दिली होती. त्यांनी फाळणीनंतर हरियाणात कुरुक्षेत्र इथं तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये थांबलेल्या नागरिकांना आकाशवाणीच्या माध्यमातून संबोधित केलं होतं. आज दिल्ली इथं आकाशवाणी मुख्यालयात यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल, आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर यावेळी उपस्थित होते.

****

चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १५ पूर्णांक ४१ शतांश टक्क्यांची वाढ झाली आहे. हे संकलन १२ लाख १० हजार कोटी रुपयांहून अधिक झाल्याची माहिती सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे. कॉर्पोरेट कर संकलनातही किरकोळ वाढ झाली आहे. कॉर्पोरेट कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ होऊन हे संकलन यंदाच्या वर्षात पाच लाख १० हजार कोटी रुपये इतकं झाल्याचं सीबीडीटीनं म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या गुरुवारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिकलठाणा परिसरासह जालना इथंही सभा होणार असून, दोन्ही जिल्ह्यातले भाजपचे नेते, प्रमुख पदाधिकारी सभेच्या तयारीत व्यस्त आहेत.

याच दिवशी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी औरंगाबाद पूर्व, पश्चिम आणि मध्य अशा तिन्ही मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आज पार पडली.

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्याही गुरुवारी छत्रपती संभाजीनगर शहरासह कन्नड, वैजापूर, गंगापूर इथं प्रचारसभा होणार आहेत.

समाजवादी पार्टीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार डॉ अब्दुल गफार कादरी यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते इकरा हसन, सनाखान, मुक्ती अनस गुरूवारी शहरात प्रचारासाठी येत आहेत.

****

संत शिरोमणी नामदेव यांच्या ७५४ व्या जन्म सोहळ्यानिमित्त त्यांचं जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नर्सी नामदेव इथं आज ५००१ पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. नर्सी नामदेव इथं पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. भाविकांमधून अशोक घोंगडे आणि वंदना घोंगडे या दांपत्यास नामदेवाच्या वस्त्र समाधीची महापूजा करण्याचा मान मिळाला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...