Saturday, 30 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.11.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 30 November 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होत आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घघाटन झालं. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत विशिष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलिस पदकंही प्रदान करण्यात येणार आहेत.

****

दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रीवादळ आज दुपारपर्यंत उत्तर तामिळनाडू किनारपट्टी ओलांडून पुद्दुचेरीजवळच्या कराईकल आणि महाबलीपुरम् किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. काल मध्यरात्री हे वादळ नागापट्टिनमच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे २३० किलोमीटर आणि चेन्नईच्या २१० किलोमीटर आग्नेय दिशेला होतं. दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या खोल दाबाचं काल चक्रीवादळात रूपांतर झालं आहे. वादळाच्या प्रभावामुळं परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

****

राज्यात थंडीचा कडाका वाढत असून पुढच्या तीन दिवसात काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पुणे, आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दहा अंश सेल्सिअस इतकं निच्चांकी तापमान नोंदवलं गेलं. तर नाशिक जिल्ह्यात निफाड इथं सात अंश सेल्सियस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात अकरा अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काल सायंकाळनंतर किमान तापमान दहा पूर्णांक सहा अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

विदर्भातील अमरावती जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस तर धारणी-चिखलदरी येथे नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. कालचा दिवस मुंबईतील आठ वर्षांतील सर्वात थंड दिवस होता. किमान तापमान १६ पूर्णांक ८ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.

****

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी इथं होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी माहिती पुस्तिका तसंच पोस्टरचं अनावरण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल सायंकाळी राजभवनात करण्यात आलं. कार्यक्रमाला ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, लेखक तथा माजी खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

केंद्र सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या संकल्पनेनुसार, शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. www.mhfr.ॲग्रीस्टॅक.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन नागरिकांनी स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा तसंच शेतकरी ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रचार तसंच प्रसार करावा, असे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.

****

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा इथल्या साबरमती द ग्लोबल स्कूल या शाळेत १०० विद्यार्थी तसंच लातूर इथल्या स्वामी विवेकानंद इंटीग्रेशन इंग्लिश स्कूल या शाळेत १०० विद्यार्थांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पाच डिसेंबर २०२४ पर्यंत लातूर इथल्या इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक यांच्या कार्यालयात लेखी अर्ज करावेत, असं अवाहन करण्यात आलं आहे.

****

पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआय ठाम आहे. काल यासंदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी खेळाडूंची सुरक्षा सर्वोपरी असल्याचं नमूद केलं. या स्पर्धेसाठी भारताचे सामने त्रयस्त कोणत्याही देशात खेळवण्याच्या पद्धतीवर बीसीसीआय ठाम आहे, तर पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळानं या प्रकाराला विरोध दर्शवल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

लखनऊ इथं होत असेलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन करंडक स्पर्धेत आज उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. महिलांच्या एकेरी सामन्यात पी. व्ही. सिंधूचा सामना उन्नती हुड्डाशी होईल. पुरुषांच्या एकेरी सामन्यात लक्ष्य सेनचा सामना जपानच्या शोगो ओगावाशी तर प्रियांशु राजावतचा सामना सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होईल. दरम्यान, महिलांच्या मिश्र दुहेरी सामन्यात त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद तसच अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रेस्टो ही जोडी अंतिम चार मध्ये पोहोचली आहे.

**** 

No comments: