Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 April 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ एप्रिल २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी करण्यात रिझर्व्ह बँकेची भूमिका महत्त्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन
• वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडलं जाणार
• एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाइक टॅक्सीला परवानगी देण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय, बीड जिल्ह्यात बॅरेजला मंजूरी
• पश्चिम विभागाच्या विकासासाठी अधिकाधिक उद्योग आणण्याची सीआयआयची ग्वाही
आणि
• मराठवाड्यात अनेक भागात अवकाळी पाऊस, पुढील पाच दिवस ढगाळ हवामानाचा अंदाज
****
डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी बनवण्यात भारतीय रिझर्व्ह बँकेनं महत्त्वाची भूमिका बजावल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. मुंबईत काल रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या वर्षपूर्ती सोहळ्याचा समारोप राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. नाबार्ड, आयडीबीआय आणि नॅशनल हाऊसिंग बँक यासारख्या संस्था स्थापन करून रिझर्व्ह बँकेनं देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी दिल्याचं सांगत, बँकेच्या आर्थिक स्थैर्य राखण्याच्या कार्याचीही त्यांनी दखल घेतली.
****
घर, विवाह, शिक्षण आणि आरोग्यसंदर्भातल्या खर्चासाठी भविष्य निर्वाह निधीतली रक्कम मुदतपूर्व काढण्याची मर्यादा पाच लाख रुपये करण्यात आली आहे. ही मर्यादा पूर्वी एक लाख रुपये इतकी होती. या निर्णयाचा देशातल्या साडेसात कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. याशिवाय, आता पीएफची रक्कम यूपीआयद्वारे काढण्यासाठी नवीन प्रणाली सादर करण्यात येणार असून, साधारण जून अखेरपर्यंत ही रक्कम यूपीआय आणि एटीएमद्वारे काढता येऊ शकेल, असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत चर्चा आणि पारीत होण्यासाठी सादर केलं जाणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या विधेयकाबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यास सरकार तयार असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशातल्या कोणत्याही मुस्लीम बांधवाचं अहित होणार नाही, असं भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री शाहनवाज हुसैन यांनी म्हटलं आहे. या विधेयकाबाबत काही लोक जनतेमध्ये गैरसमज पसरवत असल्याचं हुसैन यांनी सांगितलं, ते म्हणाले...
बाईट - माजी मंत्री शाहनवाज हुसैन
दरम्यान, हे विधेयक सादर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या सर्व घटक पक्षांनी तसंच काँग्रेसनंही आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासंदर्भात व्हिप जारी केलं आहे.
****
राज्यात बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. यासह या बैठकीतल्या इतर निर्णयांची माहिती, आमचे प्रतिनिधी हर्षवर्धन दीक्षित यांच्याकडून,
बाईक टॅक्सी सेवा एक लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरात सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने काल मंजुरी दिली. नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रामध्ये स्वेच्छेने निष्कासित केलेल्या वाहनांच्या अनुषंगाने सुधारित कर सवलत लागू करण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बीड जिल्ह्यात सिंदफणा नदीवरचे तीन कोल्हापुरी बंधारे बॅरेजमध्ये विकसित करण्यासाठी सुमारे ५९ कोटी रुपये खर्चाला कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा आणि काम पूर्ण झाल्यावर केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या २००८ च्या पथकर धोरणानुसार सर्व प्रकारच्या वाहनांवर पथकर आकारण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी काल मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात काल सामंजस्य करार झाला. या भागीदारीअंतर्गत तीन ए.आय. उत्कृष्टता केंद्रं स्थापन केली जाणार आहेत.
****
पर्यावरणपूर्वक वीज निर्मितीची गरज असून, यासाठी सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं. काल गंगापूर तालुक्यातल्या रांजणगाव शेणपुंजी इथं, 'हर घर सोलर, घर घर उजाला,' पंतप्रधान सूर्यघर योजना’ याबाबतच्या मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी यावेळी बोलतांना, गावातल्या सर्व कुटुंबांनी आपापल्या घरांच्या छतांवर सोलर पॅनल बसवणं, ग्रामपंचायतीमार्फत सक्तीचं करणार असल्याचं सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं ‘जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी‘ या उपक्रमाची काल सुरुवात झाली. दूरदृष्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या या उपक्रमाद्वारे काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोयगाव, फुलंब्री आणि वैजापूर तालुक्यातल्या चाळीसहून जास्त नागरिकांचं म्हणणं ऐकून त्यातल्या सात तक्रारींवर तिथेच निर्णय दिला.
****
वेव्ह्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचा एक भाग असलेल्या, क्रिएट इन इंडियाच्या पहिल्या पर्वात ८५ हजारांच्या नोंदणीचा टप्पा गाठला आहे. यात ११०० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा समावेश आहे. विविध प्रकारच्या ३२ प्रकारांसाठी घेण्यात आलेल्या फेऱ्यांमधून ७५०हून अधिक स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे.
****
आयपीएलमधल्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या सात संशयितांना जालना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. हे सर्वजण, कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातल्या सामन्यावर सट्टा लावताना आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावरच्या एका हॉटेलवर छापा टाकून ही कारवाई केली. संशयितांकडून मोबाईल, रोख रक्कम, इतर साहित्य असा एकूण ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. क्रिकेट सट्टा प्रकरणी जालना पोलिसांनी आतापर्यंत तीन कारवाया केल्या असून, १६ सट्टेबाजांवर कारवाई केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारतीय उद्योग महासंघ अर्थात सी आय आय नं पश्चिम विभागामध्ये आर्थिक आणि औद्योगिक वाढीसाठी धोरण तयार केलं असून, छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण पश्चिम विभागात अधिकाधिक उद्योग आणण्याकडे लक्ष देणार असल्याचं, सीआयआय पश्चिम विभागाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऋषीकुमार बागला यांनी सांगितलं. काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले..
बाईट - ऋषीकुमार बागला
छत्रपती संभाजीनगर शहरात येत्या एक वर्षांत कौशल्य केंद्र उभारण्यात येणार असून, त्याचा अनेक बेरोजगार युवकांना कौशल्य आणि रोजगार मिळण्यासाठी उपयोग होईल, असा विश्वासही बागला यांनी वर्तवला.
****
धाराशिव जिल्ह्यात बारमाही वहिवाटीकरता शेतरस्ते आणि पाणंद रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी आणि पावसाळ्यापूर्वी जलसाठ्यांमधला गाळ काढण्यासाठी येत्या १५ एप्रिलपासून सर्व यंत्रणांनी मिशन मोडवर ही कामं पूर्ण करण्याचे निर्देश आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिले आहेत. काल यासंदर्भातल्या बैठकीत त्यांनी, या कामासाठी ४२ कोटी रुपये निधी उपलब्ध झाल्याची माहिती दिली.
****
बीड जिल्हा कारागृहात शनिवारी कैद्यांमध्ये झालेल्या मारामारीच्या पार्श्वभूमीवर आठवले गँगच्या तिघांची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात काल रवानगी करण्यात आली. अक्षय आठवले, ओंकार सवई आणि मनीष क्षीरसागर अशी या कैद्यांची नावं आहेत. गीते गँगच्या चार जणांची रवानगी छत्रपती संभाजीनगरमधल्या हर्सुल तुरुंगात करण्यात आली होती.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं असलेल्या औरंगजेबाच्या कबरीभोवती कोणतीही सजावट किंवा सुशोभीकरण असू नये, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर आणि पदाधिकाऱ्यांनी काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना याबाबतचं निवेदन सादर केलं. ही कबर दाखवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या सहली आणाव्यात, औरंगजेबाला इथं दफन केलं असल्याचं मुलांना सांगावं, असंही या निवेदनात म्हटलं आहे.
****
बीड तालुक्यातल्या बोरफडी गावामध्ये विहीर, पाईपलाईन आणि टाकीच्या कामांमध्ये गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमतानं मोठा भ्रष्टाचार केल्याच्या आरोप करत, गावकऱ्यांनी काल आत्मदहनाचा इशारा देत, आंदोलनाची तयारी केली, मात्र पोलिस आणि प्रशासनाने परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
याशिवाय, बीड जिल्ह्यात शिरूर कासार तालुक्यात दगडवाडी इथंही ग्रामस्थांनी गायरान जमिनीची विक्री थांबवण्याच्या मागणीसाठी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला.
****
मराठवाड्यात अनेक भागात काल अवकाळी पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यात घनसावंगी, तीर्थपुरी, तसंच बदनापूर तालुक्यातल्या दाभाडी परिसरात पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल पैठण तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे मका, गहू तसंच हरभरा पिकांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
धाराशिव शहर आणि परिसरातही काल रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणातली उष्णता कमी होऊन गारवा निर्माण झाला.
दरम्यान, राज्यात काही भागांत पुढचे पाच दिवस असंच हवामान राहण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात काल सर्वात जास्त ४२ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक चार अंश, परभणी इथं ४० पूर्णांक पाच तर बीड इथं ४१ अंश तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment