Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 10
June 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० जून
२०२५ दुपारी १.०० वा.
****
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या
ग्रीन म्युनिसिपल बाँड चं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई शेअर बाजारात
लिस्टींग करण्यात आलं. हरित वाहतूक प्रकल्पांसाठीचा हा देशातील पहिला म्युनिसिपल ग्रीन
बॉण्ड असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिली. कार्यक्रमाला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची
उपस्थिती होती.
****
केंद्र सरकारनं विशेष आर्थिक
क्षेत्रासाठी धोरणात्मक सवलतींची घोषणा केली आहे. विशेषत: सेमिकंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक
घटकांसह, उच्च तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारनं हा
निर्णय घेतला आहे. या सवलतींमुळे या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित होऊन उत्पादन वाढेल
आणि त्यामुळे जागतिक सेमिकंडक्टर मूल्य शृंखलेत भारताची स्थिती मजबूत होईल. सेमिकंडक्टर
किंवा इलेक्ट्रॉनिक घटकांच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेली कमीत कमी जमिनीची सीमा घटवून
ती पन्नास हेक्टरवरून आता दहा हेक्टर इतकी करण्यात आली असून, अन्य काही
नियमांतही बदल करण्यात आले आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षात देशानं लक्षणीय प्रगतीचा काळ आणि सुशासन अनुभवलं असल्याचं
केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी म्हटलं
आहे. ते आज मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळा संदर्भात पुद्दुचेरी इथं आयोजित
पत्रकार परिषदेत बोलत होते. भ्रष्टाचार आणि कमकुवत प्रशासनाच्या काळातून देश पारदर्शक
आणि लोककेंद्रित प्रशासनाच्या काळात प्रवेश करत असल्याचे मुरुगन म्हणाले. भारत जगातली
चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि २७ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यात
यश आल्याचं मंत्री मुरुगन यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांना कृषी ओळखपत्र
अर्थात फार्मर्स आयडी मिळवून देण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी, शून्य प्रलंबितता
ही कामं वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
यांनी यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सर्व तालुकास्तरीय यंत्रणांची काल
आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या तक्रारींचा आढावाही घेतला. शून्य प्रलंबितता
अंतर्गत जुनी प्रकरणे, नागरिकांच्या तक्रारी, लोकप्रतिनिधींची पत्रं, यांचा निपटारा
करण्याचे निर्देशही स्वामी यांनी यावेळी दिले.
****
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही
हिंगोली जिल्ह्यातून आषाढी वारीसाठी जाणा-या
श्रीगजानन महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या दिंडीसह इतर पायी दिंड्या आणि पदयात्रेमधल्या
भक्तांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश हिंगोलीचे जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांनी सर्व संबंधित विभागांना दिले. काल यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत
ते बोलत होते. इतर अत्यावश्यक सुविधांसह पालखी मार्गावर फिरत्या रुग्णवाहिका ठेवण्याचे
निर्देशही हिंगोलीच्या जिल्हाधिका-यांनी दिले.
****
महाराष्ट्रासोबत सहकार्य वाढवण्याबाबत
पोर्तुगाल उत्सुक असल्याचं पोर्तुगालचे राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा, यांनी म्हटलं
आहे. त्यांनी आज मुंबईत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली, त्यावेळी ते
बोलत होते. भारताशी पर्यटन आणि व्यापारासह विविध क्षेत्रात सहकार्य वाढवणार असल्याचं
त्यांनी सांगितलं. आपल्या मुंबई भेटीत आपण शंभराहून अधिक उद्योग प्रतिनिधींना भेटणार
असल्याचंही राजदूतांनी सांगितलं. राज्यपालांनी यावेळी बोलताना, पोर्तुगाल
आणि भारतादरम्यानचा सध्याचा व्यापार १ पूर्णांक २ अब्ज डॉलर वरून किमान १० अब्ज डॉलर
वाढवण्याबाबत प्रयत्न करावा, अशी सूचना केली.
****
नांदेड जिल्ह्यात सोमवारी
रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागात फळबागांचं मोठ्या प्रमाणात
नुकसान झालं आहे. या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करावेत, अशी मागणी खासदार अशोक चव्हाण
आणि भोकर मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडं केली आहे. मुदखेड, अर्धापूर आणि
भोकर तालुक्यात केळीच्या बागा, पपई या पिकांचं मोठं नुकसान झालं असलं तरी, हा पाऊस खरिपाच्या
पेरणीसाठी उपयुक्त ठरणारा आहे.
दरम्यान, या पावसामुळं
झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांना माहिती दिल्याचं खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं तर, या नुकसानीचे
तातडीनं पंचनामे केले जातील, असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे.
****
प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय
ग्राम उत्कर्ष अभियानात छत्रपती संभाजीनगरमधल्या ११ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
आदिवासी समुदायांचे सशक्तीकरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना राबवली जाते. या
अभियानात सर्व संबंधित विभागांनी सक्रिय सहभागी होऊन, अभियानाचा लाभ आदिवासींपर्यंत
पोहोचवावा, असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
****
No comments:
Post a Comment