Tuesday, 10 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.06.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 June 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      १४० कोटी भारतीयांच्या सामुहिक सहभागामुळे गेल्या ११ वर्षांत विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन-पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      मुंबईत उपनगरी रेल्वेतून पडून चार प्रवाशांचा मृत्यू-नऊ जखमी; राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत

·      प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली, मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करता येणार नसल्याचा निर्वाळा

·      ऊसाच्या पिकाच्या उत्पादनाकरता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये कर्ज मिळणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

आणि

·      १५ जूनपर्यंत मान्सून विखुरलेल्या स्वरुपात राहणार- हवामान विभागाची माहिती

****

१४० कोटी भारतीयांच्या सामुहिक सहभागामुळे गेल्या ११ वर्षांत देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात, पंतप्रधानांनी, गेल्या अकरा वर्षांत केंद्र सरकारने लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं नमूद केलं. जनधन योजनेतून ५५ कोटी जनतेला फायदा झाला, ही संख्या युरोपियन महासंघाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे, तर आतापर्यंत ८१ कोटी लोकसंख्येला मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात आला, ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येएवढी असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं.

****

गेल्या ११ वर्षातील प्रमुख क्षेत्रांत झालेल्या बदलांचा आढावा आकाशवाणी आपल्या श्रोत्यांसाठी दररोज घेऊन येत आहे. आजच्या भागात आपण पर्यावरण संवर्धन आणि विकास याविषयी जाणून घेणार आहोत.

‘‘गेल्या दशकात, देशानं पर्यावरण संरक्षण आणि समावेशक विकासाची सांगड घालणारे संयुक्तिक मॉडेल स्वीकारलं आहे. नद्यांच्या पुनरुज्जीवनापासून ते परिसंस्था पुनर्संचयित करण्यापर्यंत आणि हरित पायाभूत सुविधा निर्माण करण्यापर्यंत, देशानं पर्यावरण संवर्धनासाठी दृढ वचनबद्धता दर्शविली आहे.

नमामि गंगे हा जगातील सर्वात मोठ्या नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमांपैकी एक आहे. त्याने पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे, जैवविविधता वाढवली आहे आणि गंगेच्या पुनरुज्जीवनात स्थानिक सहभागाला प्रोत्साहन दिलं आहे. यासोबतच, स्वच्छ भारत मोहीम आणि गोबरधन योजनेनं स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनात बदल घडवून आणला आहे, विशेषतः ग्रामीण भागात. गोबरधन योजनेअंतर्गत सेंद्रिय कचऱ्याचं बायोगॅस आणि खतात रूपांतर करण्यात येतं, त्यामुळं स्वच्छता आणि ऊर्जा आत्मनिर्भरता दोन्ही बाबी साध्य होतात.

एक पेड माँ के नाम” यासारख्या मोहिमांनी नागरिकांना पर्यावरणीय कृतीसाठी एकत्रित आणले आहे. देशभरात १४२ कोटींहून अधिक झाडं लावण्यात आली आहेत.

 भारतानं वन्यजीव संवर्धनातही लक्षणीय प्रगती केली आहे. प्रोजेक्ट चित्ता, प्रोजेक्ट लायन आणि विस्तारित प्रोजेक्ट टायगर या उपक्रमातून अधिवास विकास आणि प्रजाती पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतात सध्या किमान ३,६८२ वाघ आहेत, जे जगातील वाघांच्या ७५ टक्क्यांहून अधिक आहेत.

देशात सध्या ९१ रामसर स्थळं आहेत, जी आशियातील सर्वाधिक आहेत. १३ सागरी किनाऱ्यांना मानाचं ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालं आहे. तर अमृत धरोहर आणि मिश्तीया सारख्या योजना पाणथळ जागा आणि खारफुटींच्या संवर्धनाला चालना देत आहेत.’’

****

मुंबईतल्या सर्व उपनगरी रेल्वेसाठी यापुढे तयार होणाऱ्या बोगींना स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येणार आहेत. काल मुंबईत झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतल्याचं, रेल्वेचे जनसंपर्क विभागाचे कार्यकारी संचालक दिलीपकुमार यांनी सांगितलं. उपनगरी रेल्वेच्या सध्या वापरात असलेल्या बोगींना दरवाजे बसवता येतील का, याबाबत व्यवहार्यता तपासून पाहण्यासाठी अभ्यास करण्यात येणार असल्याचंही रेल्वेकडून सांगण्यात आलं.

काल, दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान सकाळी साडे नऊच्या सुमारास झालेल्या या अपघातात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेतून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर नऊ प्रवासी जखमी झाले. रेल्वे विभागानं या अपघाताची चौकशी सुरु केल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदतीची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते काल या अपघातातल्या जखमींची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते...

बाईट – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

****

प्लास्टर ऑफ पॅरिस- पीओपीच्या गणेशमूर्तींवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठवली आहे. मात्र या मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातल्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत, पीओपी गणेशमूर्तींचं विसर्जन फक्त कृत्रिम तलावातच करण्याबाबत याचिकाकर्ते आणि प्रतिवादी दोन्ही पक्षांची सहमती झाली. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे पीओपी मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करावी, तसंच तीन आठवड्यांच्या आत त्याचा अहवाल सादर करावा, असंही न्यायालयानं सांगितलं आहे.

****

ऊसाच्या पिकाच्या उत्पादनाकरता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये कर्ज देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, या विषयावर काल झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. ऊस पिकाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी हेक्टरी २५ हजार रुपये देणार असून हे पीक ठिबक सिंचनावर घेण्यात येत असेल, तर हेक्टरी १० हजार रुपये बिनव्याजी कर्ज देणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

****

कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाच्या उंचीसंदर्भात केंद्र सरकारने कर्नाटकसह महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ४ लाभार्थी राज्यांची १८ जून रोजी बैठक बोलावली आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्री सी.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल.

कृष्णा पाणी वाटप लवादाने २०१३ साली कर्नाटकच्या मागणीवरुन, अलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ५२४ मीटर करण्याची अनुमती दिली. मात्र यामुळे सांगली आणि कोल्हापूर शहरात पूर येत असल्याच्या कारणावरुन महाराष्ट्र सरकारने धरणाची उंची वाढवायला विरोध केला. आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांनीही कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे.

****

कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी वळवण्यासंदर्भात आराखडे तयार करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झालं आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन- मित्र या संस्थेच्या निर्देशानुसार त्रयस्थ संस्थेकडून हे सर्वेक्षण केलं जाणार असल्याची माहिती, मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या योजनेमुळे धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील ८५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

****

येत्या २१ जून रोजी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. भारतीय योग संस्थानचे छत्रपती संभाजीनगर इथले विभागीय प्रधान संजय औरंगाबादकर यांनी दिलेली, नौकासनाविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया..

बाईट – संजय औरंगाबादकर

****

राष्ट्रीय अन्नरक्षा योजेनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब अन्न योजना तसंच अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना जून ते ऑगस्टपर्यंत तीन महिन्यांचं धान्य एकत्रितरित्या वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परभणी जिल्ह्यात पात्र लाभार्थींनी जूनअखेरपर्यंत रास्तभाव दुकानातून पावतीप्रमाणे धान्य स्वीकारण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा मृग बहार ही योजना अधिसूचित पिकांसाठी राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावं, असं आवाहन नांदेडच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयानं केलं आहे.

****

हवामान

राज्यात मान्सूनचं आगमन रखडलं आहे, त्यामुळं तापमानात वाढ होऊ शकते, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. १५ जून पर्यंत मान्सून विखुरलेल्या स्वरुपात असल्यामुळं तुरळक ठिकाणीच पाऊस पडेल, त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असं अवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.01.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 January 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती स...