Wednesday, 11 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.06.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 June 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जगभरात मांडलेली भारताची भूमिका कौतुकास्पद-पंतप्रधानांचे गौरवोद्गार

·      केंद्र सरकारची ११ वर्ष म्हणजे विकसित भारताच्या संकल्पाकडून सिद्धीकडे जाण्याचा कार्यकाळ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

·      महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

आणि

·      देशातल्या पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती इथं मुहूर्तमेढ

****

दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जगभरात भारताची भूमिका उत्तमप्रकारे मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. ३३ देशांचा दौरा करून परतलेल्या या शिष्टमंडळांची पंतप्रधानांनी काल भेट घेऊन शिष्टमंडळांच्या या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला. एकूण पन्नास जणांच्या सात शिष्टमंडळांचं नेतृत्व सात खासदारांनी केलं, यामध्ये महाराष्ट्रातून खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश होता.

****

गेल्या ११ वर्षांत देशाच्या संरक्षण क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. वस्त्रोद्योग, क्रीडा, संरक्षण अशा विविध क्षेत्रातल्या प्रगतीबाबत भाष्य करत, देशानं आधुनिकीकरण आणि संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यावर लक्ष केंद्रित केलं असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

गेल्या ११ वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनमानात आमुलाग्र परिवर्तन घडून आलं आहे. यासंदर्भात विविध मान्यवरांनी घेतलेला हा आढावा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या अकरा वर्षात भारताच्या संरक्षण क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन झालं आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करत असल्याचं संरक्षणमंत्र्यांनी आपल्या याबाबतच्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

गेल्या ११ वर्षात देशानं लक्षणीय प्रगतीचा काळ आणि सुशासन अनुभवलं असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी म्हटलं आहे. ते काल पुद्दुचेरी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.

देशात उत्तम कामकाजातून राजकारण करण्याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जात असल्याचं, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. सुयोग्य सामाजिक तसंच आर्थिक धोरणं आणि युद्धनीतीचा अवलंब करताना मोदी सरकारनं साहसी आणि निर्णायक पावलं उचलल्याचं मल्होत्रा यांनी नमूद केलं.

मोदी सरकारची अकरा वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं नमो ॲपवर सुरू करण्यात आलेल्या जन-मन सर्वेक्षणात पहिल्याच दिवशी देशभरातून पाच लाखाहून जास्त लोकांच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. भारताच्या विकास यात्रेच्या या सर्वेक्षणात सामील होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केलं होतं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकाच्या ११ वर्षांचा कार्यकाळ, आत्मनिर्भर भारत ते विकसित भारताच्या संकल्पाकडून सिद्धीकडे जाण्याचा कार्यकाळ असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या सहकार्यानं महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची सहा लाख कोटी रुपयांची कामं सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले..

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा, तसंच आगामी विधिमंडळ अधिवेशनात यासंदर्भात विधेयक आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यातल्या शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ तर बी.एस्‍सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीनं उपाययोजना करण्याला तसंच महाराष्ट्र मेड लिकर, MML, हा धान्याधारित विदेशी मद्याचा नवीन प्रकार तयार करण्यास काल मान्यता देण्यात आली, फक्त महाराष्ट्रातले मद्य उत्पादकच असं उत्पादन करू शकतील.

मंत्रिमंडळानं या बैठकीत धरणाच्या जलाशयांमधला पाणी साठ्याचा आढावा घेतला. राज्यातल्या सर्व प्रमुख धरणांमधे गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी यावेळी दिली

****

ऑक्सियम-4 ही अंतराळ मोहीम स्थगित करण्यात आली आहे. तांत्रिक त्रुटीमुळे ही मोहीम स्थगित केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. १४ दिवसांच्या या मोहिमेसाठी भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यासह चार देशांचे अंतराळवीर आज रवाना होणार होते, या मोहिमेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती इथं समुद्र तळाशी स्थापित होणाऱ्या देशातल्या पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. या प्रकल्पामुळे सागरी संवर्धन तसंच पर्यटनाला चालना मिळणार आहे. केंद्र सरकारनं यासाठी नौदलाचं आयएनएस गुलदार हे निवृत्त जहाज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सोपवलं आहे.

****

येत्या २१ जून रोजी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या योग अभ्यासक आणि ज्येष्ठ प्रशिक्षक डॉ चारुलता रोजेकर यांनी दिलेली, जानुशिरासन या आसनाविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया..

बाईट -  योग अभ्यासक आणि ज्येष्ठ प्रशिक्षक डॉ चारुलता रोजेकर

****

छत्रपती संभाजीनगर इथले युवा उद्योजक अमित कुलकर्णी यांनी केंद्र सरकारच्या स्टार्टअप योजनेचा लाभ घेत, अन्नप्रक्रिया उद्योग उभारला आहे. आपल्या या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून देशविदेशात अंकुरित कडधान्यांची निर्यात करत असल्याचं, अमित कुलकर्णी यांनी सांगितलं, ते म्हणाले...

बाईट - युवा उद्योजक अमित कुलकर्णी

****

वट पौर्णिमेचा सण काल साजरा झाला. लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत वडाची पन्नास रोपं लावून, वटपौर्णिमा साजरी केली. वटपौर्णिमेचं औचित्य साधून प्रत्येक कुटुंबानं किमान दहा झाडं लावावीत, असं आवाहन वर्षा ठाकूर घुगे यांनी यावेळी केलं.

हरित धाराशिव अभियानांतर्गत येत्या १९ जुलै रोजी १५ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल सामाजिक वनीकरण विभागाच्या आळणी इथल्या रोपवाटिकेत मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवडीचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं.

छत्रपती संभाजीनगर इथंही जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने रोपांचं वाटप तसंच वृक्षारोपण करण्यात आलं.

****

तुळजापूर इथं तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देत असतानाचं,  १०८ उंचीचं भव्य शिल्प साकारलं जाणार आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं. यासाठी मान्यवर शिल्पकारांकडून शिल्पाचे नमुने मागवण्यात येणार आहेत.

****

जालना जिल्ह्यात काल एका तरुण शेतकऱ्यासह त्याच्या दोन मुलांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. जालना तालुक्यात वरुड इथं काल सकाळी ही दुर्घटना घडली.

****

परभणी जिल्ह्यात काल सर्वदूर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली, तसंच विद्युत खांब पडल्यानं वीज पुरवठा विस्कळीत झाला

दरम्यान, राज्यात पंधरा जूननंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असं आवाहन कृषि विभागानं केलं आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.01.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 January 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी...