Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 July 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०
****
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मानपूर्वक
प्रदान
· बार्टी,
सारथी, महाज्योती आणि आर्टी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना
गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश-रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर शासनाचा भर
· राज्यातल्या सर्व मॉलचं येत्या ९० दिवसांत संपूर्ण सर्वेक्षण-उद्योग मंत्री उदय
सामंत यांची घोषणा
· मराठवाड्यात आतापर्यंत खरीपाच्या ७७ टक्के पेरण्या-मशागतीला वेग
आणि
· बर्मिंगहम क्रिकेट कसोटीत दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताच्या सहा बाद ४१९ धावा
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना देशाच्या
Companion
of the Order of the Star of Ghana या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं
आज सन्मानित करण्यात आलं. घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी पंतप्रधानांना हा
पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त
केल्या, ते म्हणाले –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
घानाच्या अध्यक्षांशी पंतप्रधान मोदी यांनी
विविध विषयांवर चर्चा करत,
व्यापार, शेती, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत
सुविधा अशा विविध क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी वाढवण्याविषयी सहमती दर्शवली. यावेळी
विविध क्षेत्रांमधल्या चार सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.
****
बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी
या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी
प्रवेश देण्यात येणार असून विद्यार्थी संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी
शिष्यवृत्ती,
प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबवण्यात येईल, अशी
माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे, ते आज विधान परिषदेत
सदस्य संजय खोडके तसंच अभिजीत वंजारी यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत होते.
रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, असंही
उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
बाईट - उपमुख्यमंत्री
अजित पवार
****
राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १५ जुलैपर्यंत विशेष मोहीम राबवली जात आहे.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. आधार लिंकिंग आणि अपार
आयडी यामार्फत प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षण प्रवास ट्रॅक केला जाणार आहे. सध्या
राज्यात ८६% विद्यार्थ्यांची माहिती संकलित झालेली असून ९५% आधार लिंकिंग पूर्ण झाले
असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितलं. राज्यभरातल्या शाळांमध्ये आतापर्यंत नऊ हजार
उच्चशिक्षित शिक्षक नियुक्त झाले असून आणखी १० हजार शिक्षक भरती प्रक्रियेत असल्याचं
भुसे यांनी सांगितलं.
****
कृषीपंपांसाठी दिवसा वीज देण्याच्या उद्देशाने
सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर राज्यशासनाने भर दिला आहे. मात्र भौगोलिक परिस्थितीनुसार
सौर पंप व्यवहार्य नसल्यास,
त्या ठिकाणी पारंपरिक कृषी पंप देण्याबाबत शासन विचार करेल, अशी
माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. त्या विधानसभेत सदस्य
सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलत होत्या. शेतकऱ्यांसाठी कृषी
पंपांना वीज जोडणी देण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं
बोर्डीकर यांनी सांगितलं.
****
राज्यातील सर्व मॉलचं येत्या ९० दिवसांत
संपूर्ण सर्वेक्षण करण्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. मुंबईतील
विविध मॉलमध्ये आगीच्या घटना घडून त्यात जीवितहानी आणि वित्त हानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर
कोणती कारवाई केली,
याबाबत विधान परिषदेत आमदार कृपाल तुमाने यांनी विचारलेल्या
प्रश्नाला ते उत्तर देत होते. ज्या मॉलमध्ये नियमांचं पालन केलेलं नसेल, त्या
मॉलचं पाणी आणि विद्युत जोडण्या खंडित केल्या जातील, असा इशाराही सामंत यांनी
दिला.
****
वाळू वाहतुकीसाठी चोवीस तास परवानगी देण्याचा
निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी जीपीएस प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरा पद्धती लागू
करण्यात येणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधीमंडळात एका निवेदनाद्वारे
ही माहिती दिली. महाखनिज या पोर्टलवरून हा परवाना देण्यात येईल. घरकुलांना पाच ब्रास
वाळूची रॉयल्टी घरपोच दिली जाते, मात्र सदर वाळुची वाहतूक घरकुल बांधणाऱ्या
व्यक्तीला करावी लागते,
त्याचे पैसे कोण देणार, याबाबत याच अधिवेशनात निर्णय
घेतला जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली.
****
राज्यात थॅलेसीमिया रोगाची विवाहपूर्व चाचणी
बंधनकारक करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत
ही माहिती दिली. याबाबत विकास ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात बारा
हजार आठशे थालेसीमिया रुग्ण असल्याचं सांगत, प्रत्येक जिल्ह्यात या रोगाची
उपचार केंद्र सुरू करण्यात येतील अशी माहिती ही त्यांनी दिली.
****
राज्यातल्या घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात
सर्व स्तरांवरील अडचणी लक्षात घेऊन लवकरच व्यापक धोरण लागू करण्यात येईल, अशी
माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य प्रज्ञा सातव यांनी याबाबत
प्रश्न उपस्थित केला होता. डम्पिंग ग्राउंडऐवजी कचऱ्यावर आधारित वीज निर्मिती प्रकल्प
उभारण्यासाठी राज्य शासन विचाराधीन असल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितलं.
****
मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत
जवळपास ७७ टक्के हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी झाली असल्याचं कृषी विभागाच्या अहवालात
म्हटलं आहे. यात सर्वाधिक पेरणी लातूर जिल्ह्यात ८८ टक्के इतकी झाली असून हिंगोली जिल्ह्यात
६४ टक्के इतकी पेरणी झाली आहे. विभागातल्या इतर जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
८७ पूर्णांक ३५ टक्के,
जालना सुमारे ७० टक्के, बीड ६८ टक्के, परभणी
७१ पूर्णांक ३५,
नांदेड ८१ टक्के तर धाराशिव जिल्ह्यात ८३ पूर्णांक ५५ टक्के
क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या १२१ टक्के
पावसाची नोंद झाली असल्याचं हवामान विभागाच्या अहवालात म्हटलं आहे.
****
क्रिकेट
बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी
क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताच्या सहा बाद ४१९ धावा झाल्या
आहेत. रविंद्र जडेजा ८९ धावा काढून जोश टोंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर शुभमन गिल
१६८ आणि आणि वाशिंग्टन सुंदर एका धावेवर खेळेत आहेत.
****
नांदेड इथं आज गुरुद्वारा बचाव संघर्ष समितीच्या
वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. गुरुद्वारा अधिनियमातील
संशोधन रद्द करावं आणि अध्यक्ष निवडीचा अधिकार गुरुद्वारा बोर्ड सदस्यांकडे पुन्हा
देण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात या
मागणीबाबत निर्णय न झाल्यास ११ जुलै रोजी मुंबईत आझाद मैदानावरही आंदोलनाचा इशारा, समितीचे
अध्यक्ष जरनेल सिंग गाडीवाले यांनी दिला आहे.
****
बीड जिल्ह्यात कृत्रिम साहित्याचे वाटप करण्यासाठी
गाव पातळीवर १८ जुलैपासून शिबीरांचं आयोजन करण्यात येणार आहे. ३० जुलैपर्यंत चालणाऱ्या
या शिबिरांत पात्र लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी, नोंदणी प्रक्रिया आणि
आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप केले जाणार आहे.
****
शक्तिपीठ महामार्गासाठी लातूर जिल्ह्यात
शेतजमिनीची मोजणी सुरू आहे. रेणापूर तालुक्यात मोटेगाव आणि मोरवड गावात संयुक्त मोजणीसाठी
आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी मोजणी न करताच परत पाठवलं. मोजणीसाठी सक्ती केल्यास आंदोलनाचा
इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
****
परभणी इथं दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल
करून किंवा बनावट सायलेन्सर वापरून रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वरांवर वाहतूक
विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. आक्षेपार्ह १० बुलेट ताब्यात घेऊन त्यांचं सायलेन्सर
काढून घेण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील पंढरपूर इथं
आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतुक शनिवारी
रात्री आठ वाजेपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येणार आहे, वाहन
धारकांनी या काळात पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहनही पोलिस विभागाच्या वाहतुक
शाखेनं केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात ई-पीक पाहणीसाठी सहा जुलैपर्यंत
तसंच मोबाईल ॲपद्वारे पीक दुरूस्तीसाठी २१ जुलैपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
याबाबत सर्व महसूल,
कृषी अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आलं आहे.
****
हवामान
सिंधुदूर्ग जिल्ह्याला आज रेड अलर्ट तर कोकणातल्या
इतर जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक आणि जळगावसह मराठवाड्यात छत्रपती
संभाजीनगर आणि जालन्यासह इतर काही जिल्ह्यांना पाच जुलैपासून हवामान विभागाने यलो अलर्ट
दिला आहे.
****
No comments:
Post a Comment