Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 23
December 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
ज्येष्ठ पोलीस अधिकारी सदानंद
दाते यांना महाराष्ट्रात परत पाठवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं
मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. राज्याचे
पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यमान
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होणार आहे.
****
राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या
निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत
ही प्रक्रिया चालणार असून, अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल. दोन जानेवारीपर्यंत
अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी तीन
जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. या सर्व महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान
होणार असून, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर काल छत्रपती
संभाजीनगर आणि लातूरसह बहुतांश ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं पत्रकार परिषदा तसंच
बैठका घेऊन, निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.
****
‘विकसित भारत जी राम जी’ योजनेअंतर्गत
रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण विकासासाठी एक लाख ५१ हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची
तरतूद प्रस्तावित असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.
या योजनेत मजुरांना १०० ऐवजी १२५ दिवस रोजगाराची कायदेशीर हमी देण्यात आली आहे. काम
उपलब्ध नसल्यास बेरोजगारी भत्त्याची तरतूद अधिक मजबूत करण्यात आली आहे. जलसंवर्धन, ग्रामीण पायाभूत
सुविधा, उपजीविकेवर आधारित उपक्रम आणि आपत्ती निवारणावर भर देत विकसित आणि आत्मनिर्भर गावांची
निर्मिती हा या योजनेचा उद्देश असल्याचे चौहान यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं
आहे.
****
केंद्रीय दूरसंचार विभागाच्या
वित्तीय घोटाळे जोखीम निदर्शकामुळे आणि भारतीय रिझर्व्ह बँक तसेच नॅशनल पेमेंटक कॉर्पोरेशन
ऑफ इंडियाच्या पाठिंब्यामुळे डिजिटल बुद्धिमत्ता मंचावर एक हजारपेक्षा अधिक बँका, थर्ड पार्टी
ऍप आणि पेमेंट ऑपरेटर यांची नोंद झाली आहे. 22 मे 2025 पासून अवघ्या
6 महिन्यांत या सर्वांच्या एकत्रित उपक्रमाच्या मदतीने संशयित व्यवहार रोखून किंवा
इशारे देऊन सायबर घोटाळे रोखले आहेत. यात होणारे सुमारे सहाशे साठ कोटी रुपयांचे संभाव्य
नुकसान टाळण्यात आल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्रालयानं दिली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
जननी–शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गरोदर माता आणि शून्य ते एक वर्षे वयोगटातील नवजात
अर्भकांना सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत आरोग्य सेवा दिली जात आहे. मोफत प्रसूती, औषधं, तपासण्या, आहार, रक्त संक्रमण
आणि मोफत रुग्णवाहिका सेवांचा समावेश आहे. नागरिकांनी १०२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क
साधून आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.
****
पालघर जिल्ह्यात जिल्हा मानसिक
आरोग्य कार्यक्रमांतर्गत ‘संवेदना’ प्रकल्पाद्वारे विविध ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून
मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. बसस्थानक, शाळा आणि ग्रामीण भागात सादर
करण्यात आलेल्या पथनाट्यांतून मानसिक आजारांबाबतचे गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्यात
येत आहेत. मानसिक आजार हा वैद्यकीय आजार असून योग्य उपचाराने बरा होऊ शकतो, हा संदेश देण्यात
येत आहे.
****
यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्ममय
पुरस्कार २०२५ साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील
प्रकाशित प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र असून येत्या १ ते ३० जानेवारी
दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे पुस्तकं पाठविण्याचं आवाहन
मंडळानं प्रसिद्धीपत्रकातून केलं आहे.
****
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या
जालिंदरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं राबवलेल्या अभिनव उपक्रमांची जागतिक पातळीवर
नोंद घेण्यात आली आहे. अनुभवाधारित शिक्षण, सृजनशील उपक्रम,प्रयोगशील
अध्यापन पद्धती अशा अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे या शाळेनं ग्रामीण भागातील शाळाही
जागतिक दर्जाचं शिक्षण देऊ शकतात, शाळेनं सिद्ध केलं असून जागतिक पातळीवर शाळेनं नावलौकिक
मिळवला असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं
देशांतर्गत महिला क्रिकेटपटू तसेच सामना अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मान्यता
दिली आहे. भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयानंतर हा निर्णय घेण्यात आला
आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अधिक समन्यायी आणि समान वेतनरचना निर्माण करणे हा यामागचा
उद्देश असल्याचं बीसीसीआयनं म्हटलं आहे. नवीन वेतन रचनेनुसार, वरिष्ठ महिला
क्रिकेटपटूंना देशांतर्गत स्पर्धांसाठी आता दररोज ५० हजार रुपये मानधन मिळणार असून, यापूर्वी हे
मानधन २० हजार रुपये होते. तसेच राखीव महिला क्रिकेटपटूंना आता १० हजार रुपयांऐवजी
दररोज २५ हजार रुपये मानधन मिळणार आहे.
****
No comments:
Post a Comment