Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 19 December 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ डिसेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
विकसित भारत- रोजगार आणि उपजीविका हमी योजना विधेयकाला
संसदेची मंजूरी
·
नव्या योजनेतून महात्मा गांधीजींच्या आदर्शांना मूर्त
रूप देण्याचा सरकारचा प्रयत्न-शिवराजसिंह चौहान यांचं प्रतिपादन, योजनेला काँग्रेसचा
विरोध
·
अणु ऊर्जा विधेयक संसदेत मंजूर
·
काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांचा भारतीय जनता पक्षात
प्रवेश
·
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या पार्थिवावर शासकीय
इतमामात अंत्यसंस्कार
आणि
·
राज्यात पुढील दोन दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा
हवामान विभागाचा इशारा
****
विकसित
भारत- रोजगार आणि उपजीविका हमी योजना – ग्रामीण अर्थात ‘व्हीबी जी राम जी’ हे विधेयक संसदेनं पारित केलं.
लोकसभेत आणि राज्यसभेत काल सविस्तर चर्चेनंतर हे विधेयक पारित करण्यात आलं.
दरम्यान, काल लोकसभेत
या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी,
विकसित भारत जी राम जी योजनेतून महात्मा गांधीजींच्या आदर्शांना मूर्त
रूप देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगितलं. विरोधकांच्या प्रचंड गदारोळातच त्यांनी
हे उत्तर दिलं. विकसित भारतासाठी विकसित गाव ही संकल्पना या विधेयकाचं उद्दीष्ट असल्याचं
चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले….
बाईट – चौहान- व्ही बी जी राम जी
पूर्वी
या योजनेचा संपूर्ण निधी केंद्र सरकार देत असे, मात्र आता मोठ्या राज्यात ६० टक्के निधी
केंद्राचा आणि उर्वरित ४० टक्के वाटा हा राज्यांचा असेल. विहीत मुदतीत रोजगार न मिळाल्यास,
बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूदही या विधेयकात आहे. ईशान्येकडच्या तसंच
हिमालयातल्या राज्यांमध्ये केंद्राचा वाटा ९० टक्क्यांपर्यंत वाढेल, असं चौहान यांनी सांगितलं.
चौहान यांचं
भाषण सुरू असतांना, विरोधकांनी या विधेयकाच्या प्रती फाडून सदनात भिरकावल्या. अध्यक्ष
ओम बिर्ला यांनी आवाहन करूनही सदस्यांनी गदरोळ सुरू ठेवला.
राज्यसभेतही
कृषीमंत्र्यांनी हे विधेयक मांडलं. यावरच्या चर्चेत भाजपचे इंदुबाला गोस्वामी, काँग्रेसचे
मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय
जनता दलाचे मनोजकुमार झा आदींनी या विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेतला.
****
त्यानंतर
घेतलेल्या पत्रकार परिषदेत कृषीमंत्री चौहान यांनी, विरोधकांनी सदनात
केलेल्या गदारोळावर नाराजी व्यक्त करत, सदनाच्या मर्यादा पायदळी
तुडवल्याची टीका केली. लोकशाहीत विरोध पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांची भूमिका महत्त्वाची
असते, पण सध्याचा विरोधी पक्ष, हे महत्त्व
आपल्या कृतीतून कमी करत असल्याचं निरीक्षणही चौहान यांनी नोंदवलं.
काँग्रेसच्या
महासचिव खासदार प्रियंका गांधी यांनी या विधेयकाला विरोधाची भूमिका कायम असल्याचं सांगितलं.
संसद परिसरात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी या विरोधामागची भूमिका स्पष्ट केली. त्या
म्हणाल्या…
बाईट – प्रियंका गांधी- व्ही बी जी राम जी
****
अणु ऊर्जा
विधेयक काल राज्यसभेनं सविस्तर चर्चेअंती मंजूर केलं. अणु ऊर्जेचा विकास, अणुऊर्जा
निर्मितीमध्ये किरणोत्साराचं आयनीकरण, तसंच अणुऊर्जेच्या सुरक्षित
वापरासाठी मजबूत नियामक चौकट निर्माण करणं, हे या विधेयकाचं उद्दिष्ट
आहे. लोकसभेनं हे विधेयक परवाच मंजूर केलं.
दरम्यान, संसदेच्या
हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे.
****
काँग्रेस
नेत्या आणि विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी काल भाजपात प्रवेश केला. भाजपाचे
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित
होते. भाजपा प्रवेश करण्यापूर्वी प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे
यांच्याकडे सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. सोलापूर जिल्ह्यातले विधानसभेचे माजी
आमदार दिलीप माने यांनीही काल भाजपात प्रवेश केला.
****
जागतिक
कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र
अर्पण करून सुतार यांना श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास
आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी सुतार यांचं अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केलं.
सुतार यांचं
काल नोएडा इथं वृद्धापकाळाने निधन झालं, ते १०१ वर्षांचे होते. गुजरातमध्ये उभारलेल्या
स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्यासह देशभरात २०० हून
अधिक भव्य पुतळ्यांची उभारणी करुन, सुतार यांनी भारताच्या शिल्पकलेला
जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. शिल्पकलेतील योगदानाबद्दल त्यांना १९९९ साली
पद्मश्री आणि २०१६ साली पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारनेही
नुकताच सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, तसंच पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुतार यांना अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण
केली.
****
सदनिका
घोटाळ्यात शिक्षा झालेले माणिकराव कोकाटे यांनी काल पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे
आपला राजीनामा सादर केला. हा राजीनामा स्वीकारत असल्याचं पवार यांनी सामाजिक माध्यमावरून
सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी परवाच कोकाटे यांच्याकडची क्रीडा तसंच औकाफ ही खाती काढून
उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सोपवली आहेत.
****
अल्पसंख्यांक
दिन काल सर्वत्र साजरा झाला. संयुक्त राष्ट्राच्या जाहीरनाम्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांच्या
हक्कांची प्रभावी अभिव्यक्ती व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या
सूचनेनुसार दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
लातूर इथं
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात अल्पसंख्याक
समाजाचे हक्क, त्यांच्या विकासाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आलं.
****
शेतकऱ्यांचा
उत्सव असलेला वेळ अमावस्येचा सण आज साजरा होत आहे. लातूर, धाराशिव,
बीड तसंच सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात येळवस नावानं प्रसिद्ध असलेल्या
सणासाठी, स्नेही आणि आप्तजन आपापल्या शेतावर एकत्र येतात,
आणि पारंपरिक पद्धतीने उत्साहात हा सण साजरा करतात. याबाबत अधिक माहिती
देत आहेत, आमचे लातूरचे प्रतिनिधी…
बाईट – वेळ अमावस्या
****
नांदेड
जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माळेगाव इथल्या खंडोबा यात्रेला कालपासून प्रारंभ झाला.
काल दुपारी देवस्वारी आणि पालखी पूजन करण्यात आलं. २५ तारखेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत
कृषी प्रदर्शनासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच कृषी आणि पशुसंवर्धन विषयक स्पर्धांचं
आयोजन करण्यात आलं आहे
****
परभणी जिल्ह्यात
महिला आणि बाल विकास विभाग आणि बाल संरक्षण कक्षाने गेल्या अडीच महिन्यात १५ बालविवाह
रोखले. गेल्या ऑक्टोबरपासून १२ डिसेंबरपर्यंत बालविवाहाचे एकोणीस प्रकरणं हाताळल्याचं
विभागाच्या अधिकारी मोनिका रंधवे यांनी सांगितलं.
****
महसूलविषयक
प्रलंबित प्रकरणं तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर
यांनी दिले आहेत. काल हिंगोली इथं महसूल विभागाच्या सविस्तर आढावा बैठकीत ते बोलत होते.
शेतकरी तसंच नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये, याची जबाबदारी प्रशासनाने
घ्यावी, असं आयुक्तांनी नमूद केलं.
****
अंमली पदार्थयुक्त
औषध विक्री प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनानं नांदेड जिल्ह्यातल्या १३ औषध दुकानांचे
परवाने रद्द केले असून, ३२ दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत.डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही विक्री केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
****
धाराशिव जिल्ह्यात सर्व नगरपरिषदांची मतमोजणीची प्रक्रिया
शांततेत सुरळीत पार पडावी, या दृष्टीकोनातून
नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार परवा रविवारी मतमोजणीच्या दिवशी बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी
तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हे आदेश जारी केले.
****
राज्यात
येत्या दोन दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात टप्प्याटप्प्याने एक ते तीन अंशापर्यंत घट होईल, त्यापुढच्या
दोन दिवसांत तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
दरम्यान, राज्यात काल
सर्वात कमी आठ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल
अहिल्यानगर इथं साडे आठ, नाशिक इथं नऊ पूर्णांक आठ, पुण्यात सुमारे साडे, बीड – दहा
अंश, परभणी – दहा पूर्णांक आठ तर छत्रपती
संभाजीनगर इथं ११ पूर्णांक दोन दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment